मुंबई : ज्येष्ठ लेखिका नयनतारा सहगल यांचं निमंत्रण मराठी साहित्य संमेलन आयोजकांनी रद्द केल्यानंतर त्याचे पडसाद उमटायला सुरुवात झाली आहे. साहित्य क्षेत्रातून संमेलनावर बहिष्काराची मालिका सुरु झाली आहे. सहगल यांच्या अपमानामुळे अनेकांनी संमेलनाला हजेरी न लावण्याची भूमिका घेतली आहे. एका दिवसात महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून साहित्यिकांनी या भूमिकेला पाठिंबा देत चळवळ सुरु केली आहे.

ज्येष्ठ लेखिका नयनतारा सहगल यांचं निमंत्रण रद्द केल्यानंतर आता साहित्य संमेलनावर बहिष्काराची मालिका सुरु झाली आहे. आत्तापर्यंत अनेक मान्यवरांनी आयोजकांनी घेतलेल्या निर्णयाचा विरोध केला आहे.

साहित्य क्षेत्राचीच नव्हे तर मराठी समाजाचीही बदनामी : राजीव खांडेकर

ज्या प्रकारे आयोजकांनी नयनतारा सहगल यांना आंमत्रण दिलं आणि नंतर दहशतीखाली येऊन निमंत्रण रद्द केलं. त्यामुळे साहित्य क्षेत्राचीच नव्हे तर मराठी समाजाचीही बदनामी झाली आहे. महाराष्ट्राच्या कन्येला आमंत्रण देणं आणि नंतर त्यांना अपमानित करणं ही शरमेची बाब आहे. आयोजकांना अजूनही संधी आहे, त्यांनी आपली चूक सुधारावी. सहगल यांना संमेलनात परत बोलावलं जात नाही तोपर्यंत समेलनाला जाणार नाही अशी भूमिका एबीपी माझाचे संपादक राजीव खांडेकर यांनी घेतलीय.

शुद्रातील शुद्र घटना : गिरीश कुबेर

कोणीतरी धमकी देतो म्हणून निमंत्रण मागे घेणे ही शुद्रातील शुद्र घटना आहे. एक कवियत्री संमेलनाची अध्यक्ष असताना, दुसऱ्या लेखिकेला असं अपमानित करणं महाराष्ट्राच्या मराठी मातीसह अरुणा ढेरे यांचाही हा अपमान आहे. असे प्रकार सुरुच राहिले तर संमेलनाला जाण्यात अर्थ नाही, अशी भूमिका लोकसत्ताचे संपादक गिरीश कुबेर यांनी घेतली.

ही घटना अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर घाला : ज्येष्ठ कवियञी सिसिलिया कार्व्हालो

ज्येष्ठ लेखिका नयनतारा सहगल यांचं निमंत्रण मराठी साहित्य संमेलन आयोजकांनी रद्द करणे म्हणजे अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर घाला घातल्याची टीका ज्येष्ठ कवियञी सिसिलिया कार्व्हालो यांनी केली आहे. तसेच आपण या मराठी साहित्य संमेलनाला जाणार नसल्याची प्रतिक्रियाही त्यांनी दिली.

मराठी साहित्य संमेलन बंदच करावं : ज्येष्ठ कवी वर्जेश सोलंकी

ख्यातनाम लेखिका नयनतारा सहगल यांचं निमंत्रण मराठी साहित्य संमेलन आयोजकांनी रद्द केल्यानंतर त्याचे पडसाद उमटायला सुरुवात झाली आहे. ज्येष्ठ कवी वर्जेश सोलंकी त्यांनी तर मराठी साहित्य संमेलन बंदच करावं अशी प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. अशा प्रकारे निमंत्रण रद्द करणे म्हणजे अभिव्यक्ती स्वातंत्र्याची गळचेपी असल्याचं त्यांनी म्हटलं आहे. तसेच त्यांनी आपणही या मराठी साहित्य संमेलनाला जाणार नसल्याची प्रतिक्रिया एबीपी माझाला दिली.

देशातील राजकीय झुंडशाहीमूळे नयनतारा सहगल यांचा अपमान : साहित्यिक डॉ. विठ्ठल वाघ

देशातील राजकीय झुंडशाहीमूळे नयनतारा सहगल यांचा अपमान झाल्याचा आरोप जेष्ठ कवी आणि साहित्यिक डाँ. विठ्ठल वाघ यांनी केला आहे. तर साहित्य संमेलनावर डाँ. विठ्ठल वाघही बहिष्कार घालणार आहेत.

सहगलांना सन्मानपूर्वक बोलावले तरच आपण संमेलनात सहभागी होऊ : डॉ शरद निंबाळकर

संमेलनाच्या आयोजकांनी साहित्य संमेलनाच्या उदघाटनात सहगल यांना सन्मानपूर्वक बोलावले तरच आपण संमेलनात सहभागी होण्याची भूमिका ज्येष्ठ कृषी तज्ज्ञ आणि डॉ पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाचे माजी कुलगुरू डॉ शरद निंबाळकर यांनी मांडली आहे.

सहगल याचं अपमान म्हणजे माझा अपमान : चंद्रकांत वानखेडे

ख्यातनाम लेखिका नयनतारा सहगल यांचं निमंत्रण मराठी साहित्य संमेलन आयोजकांनी रद्द केल्यानंतर शेतकरी नेते चंद्रकांत वानखेडे यांनी आपली भूमिका स्पष्ट केली आहे. तसेच नयनतारा सहगल यांचा अपमान म्हणजे माझा अपमान असल्यचं मतं  चंद्रकांत वानखेडे यांनी व्यक्त केलं आहे.

सगळ्या साहित्यिकांनी संमेलनावर बहिष्कार टाकावा :  ज्येष्ठ समाजसेविका विद्या बाळ

सहगलांना सन्मानानं परत बोलवा अन्यथा बहिष्कार : आशुतोष जावडेकर

एका लेखिकेचा अशा प्रकारे उपमर्द होणं ही एक प्रकारे संतापजनक गोष्ट आहे : आसाराम लोमटे

नयनतारा सहगलांचं निमंत्रण रद्द करणं हा सगळ्या साहित्यिकांनी अपमान आहे : बालाजी सुतार

संबंधित बातम्या

नयनतारा सहगल यांच्या अपमानाचे साहित्य विश्वात पडसाद

मराठी साहित्य संमेलनात वाचलं न जाणारं नयनतारा सहगल यांचं 'ते' भाषण