प्रकाश आंबेडकरांवर विश्वास नसल्याचेही माने यांनी कबूल केले आहे. भाजप शिवसेना युतीला लोकसभा निवडणुकीत आपल्यामुळे (वंचित आघाडीमुळे) 10 जागा अधिकच्या मिळाल्याचा गौप्यस्फोटही लक्ष्मण माने यांनी केला आहे.
एबीपी माझाशी बोलताना माने यांनी थेट वंचितचे महासचिव गोपीचंद पडळकर यांच्यावर निशाणा साधला. राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि भाजपशी संबंधित असलेला व्यक्ती आंबेडकरवादी पक्षात कसा असू शकतो? असा सवालही माने यांनी उपस्थित केला आहे.
पाहा काय म्हणाले आहेत लक्ष्मण माने
माने यांनी दावा केला आहे की, गोपीचंद पडळकर संघाचे कार्यकर्ते होते. त्यांच्या हातात आजही संघाचा धागा बांधलेला आहे. संघाच्या गणवेशातील पडळकरांचे फोटो व्हायरल झाल्याचे आपण सर्वांनी पाहिले आहे. तसेच पडळकर शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे संस्थापक संभाजी भिडे यांच्या संपर्कात असतात.
याप्रकरणी वंचितचे महासचिव गोपीचंद पडळकर यांच्याशी बातचित केली असता, लक्ष्मण माने हे राष्ट्रवादी काँग्रेसचे हस्तक असल्याचा पलटवार पडळकर यांनी केला आहे. शिवाय पडळकर यांनी माध्यमांऐवजी पक्ष कार्यकारिणीसमोर हा मुद्दा उपस्थित करण्याचा सल्लाही माने यांनी दिला आहे.