औरंगाबाद :  औरंगाबादच्या वामन हरी पेठे ज्वेलर्सच्या शाखेत चोरी झाल्याचा प्रकार समोर आहे. तब्बल 58 किलो दागिन्यांची चोरी झाली आहे. औरंगाबाद समर्थ नगर शाखेतील ही घटना असून शाखेच्या मॅनेजरनेच ही चोरी केली आहे.


वामन हरी पेठे ज्वेलर्सच्या शाखेत चोरी केलेल्या 58 किलो दागिन्यांची किंमत जवळपास 21 कोटीच्या घरात आहे. विशेष म्हणजे शाखेचा मॅनेजर अंकुर राणे याने शहरातील साडी व्यापारी लोकेश जैन आणि राजेंद्र जैन या दोघांच्या मदतीनं ही चोरी केली आहे.



साडी व्यापारी लोकेश जैन याने मॅनेजर अंकुर राणेला हाताशी धरुन खोटी बिलं भरुन ही चोरी करण्यात आली. गेल्या सहा महिन्यांपासून हा प्रकार चालू होता. या दोघांनी चोरी केलेले दागिने वेगवेगळ्या ठिकाणी विकले. या वामन हरी पेठे ज्वेलर्स शाखेच्या मालकांनी जेव्हा शाखेची पाहणी केली तेव्हा त्यांना काही दागिन्यांचा ऐवज कमी झालेला आढळला. त्यांनी ताबडतोब पोलिस आयुक्तांची भेट घेऊन हा सगळा प्रकार सांगितला.  त्यानंतर पोलिस आयुक्तांनी हे प्रकरण आर्थिक गुन्हे शाखेकडे सापवले.

आर्थिक गुन्हे शाखेने  या प्रकरणी गुन्हा नोंदवत चौकशी सुरु केली. याप्रकरणी मॅनेजर अंकुर राणे, शहरातील साडी व्यापारी लोकेश जैन आणि त्याचा भाचा राजेंद्र जैन यांना अटक केली.