मुंबई : लोकशाही पद्धतीने मध्यप्रदेश आणि कर्नाटकमध्ये सरकार निवडून आलं होतं. परंतु केंद्र सरकारने या दोन्ही राज्यात पेगॅसेसचा वापर केला आणि या दोन्ही राज्यातील सरकार पाडलं, असा गंभीर आरोप काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर केला आहे. त्यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी पॅगेसेस बाबतच्या कोणत्याही प्रश्नाला उत्तर देत नाहीत. त्यांना याचं उत्तर द्यावं लागेल. काँग्रेस सातत्याने याबाबत आवाज उठवत राहील आशा शब्दात काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर सडकून टीका केली.
याबाबत अधिक बोलताना नाना पटोले म्हणाले की,पंतप्रधान लोकशाहीचा अपमान करत आहेत. आमचं काम आहे आवाज उठवणे आणि पंतप्रधान मोदींच काम आहे त्याला उत्तर देण. मात्र याला उत्तर ते देत नाहीत. पेगॅसेस बाबत त्यांनी उत्तर द्यायला हवं. ज्या संस्थांनी पेगॅसेसचा वापर केला त्या संस्थानी सांगितलं आहे आम्ही सरकारच्या माध्यमातून हे काम करत होतो. आता आमची मागणी आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी समोर येऊन याला उत्तर द्यायला हवं. पत्रकार असतील, न्यायाधीश असतील, राहुल गांधी असतील. जवळपास 300 लोकांची हेरगिरी यांनी केली आहे. हे कुणाच्या माध्यमातून यांनी केलं. आपल्या लोकशाहीमध्ये व्यक्ती स्वातंत्र्य आहे. असं असताना असे प्रयोग होत असतील तर हे गंभीर आहे. लोकशाही पद्धतीने निवडून आलेली मध्यप्रदेश आणि कर्नाटक मधील सरकार यांनी पाडलं आहे. त्यामुळे त्यांना उत्तर तर द्यावंचं लागेल. उलटा चोर कोतवाल को दाटे, चोर के दाडी में तिनका या पंतप्रधान मोदींच्या वक्तव्याचा निषेध आम्ही करतो आहोत. कर्नाटक मध्ये पेगॅसेसचा वापर करण्यात आला होता त्यामुळेचं मोदी उत्तर देत नाहीत. महागाई, बेरोजगारी मोठ्या प्रमाणात वाढत आहे. याविरोधात आम्ही सातत्याने आवाज उठवत आहोत. पेगॅसेसचा विषय देखील महत्त्वपूर्ण आहे. आम्ही याविरोधात आवाज उठवणार आहोत.
दरमान्य राहुल गांधी आणि संजय राऊत यांची आज दिल्लीत भेट झाली याबाबत बोलताना नाना पटोले म्हणाले, आगामी काळातील आम्ही रणनीती ठरवली आहे. राज्यात देखील याचा फायदा होईल. शिवाय आज मुंबईत देखील काँग्रेसच्या जिल्हाध्यक्षांच्या बैठका पार पडल्या आहेत. या बैठकीला काँग्रेसचे प्रमुख नेते उपस्थित होते. यानंतर आम्ही आमच्या सर्व मंत्र्यांच्या बैठका घेतल्या आहेत. यामध्ये आम्ही आमची संघटना मजबूत करण्याबाबत चर्चा करणार आहोत. कार्यकर्त्यांच्या अडचणी सोडवण्याचं काम आम्ही यानिमित्ताने करणार आहोत.
राज्यपाल भगतसिह कोश्यारी यांनी तीन जिल्ह्यात बैठका लावल्या आहेत. याबाबत बोलताना पटोले म्हणाले, राज्यपाल भगतसिंह कोशियारी राज्यपाल कमी भाजपचे कार्यकर्ते जास्त वाटतात.मंत्री पदावरून दूर झाल्यानंतर देखील अनिल देशमुख, संजय राठोड आणि तुम्ही स्वतः अजूनही शासकीय निवास्थान सोडलं नाही याबाबत बोलताना नाना म्हणाले, आमच्यावर विरोधकांनी आरोप करण्यापेक्षा त्यांनी देखील काय केलं हे पहावं. दरमान्य जिल्ह्याध्यक्षच्या बैठकी मध्ये अजित पवार स्थानिक समित्यांच्या निवडीमध्ये स्थान देत नाहीत अशी तक्रार काँग्रेस चे पुणे शहराध्यक्ष रमेश बागवे यांनी नाना पटोले यांच्याकडे केली.
याबाबत बोलताना नाना पटोले म्हणाले की, राज्यात महाविकास आघाडीचं सरकार आहे. त्यामुळे सर्व खात्यांची समसमान वाटप होणं गरजेचं आहे. मात्र तसं होत नाही. त्यामुळे आम्हाला गरज पडली तर आम्ही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे जाऊ आणि याबाबत त्यांच्याकडे जाऊन चर्चा करू.