सातारा : टोकियो ऑलिम्पिक स्पर्धेमध्ये तिरंदाजी चांगली कामगिरी केलेल्या सातारा जिल्ह्यातील प्रविण जाधववर कौतुकाचा वर्षाव होत आहे. गरीब कुटुंबातून प्रचंड संघर्ष करत प्रवीणनं देशपातळीवर नाव कमावलं मात्र त्याच्या कुटुंबाचीमात्र साताऱ्यातील त्याच्या गावी अवहेलना होतेय. एवढंच नाही तर गावातील काही लोकांनी दिलेल्या त्रासामुळे प्रवीण जाधवचं कुटुंब बारामतीला कायमच स्थायिक होण्याच्या तयारीत आहे.
सातारा जिल्ह्यातील फलटण तालुक्यातील सरडे या गावात छोट्याशा घरात प्रवीणचे आईवडिल संगिता आणि रमेश जाधव राहतात. प्रवीणही याच घरात लहानाचा मोठा झाला. दगड मातीत खेळता खेळता त्याने स्पोर्टमध्ये असं काही नावलौकिक मिळवला की संपुर्ण देशाचं लक्ष प्रविणकडं लागलं. टोकियो ऑलिम्पिक पर्यंत त्यानं मजल मारली तिथं कामगिरीही चांगली केली. मात्र इकडे त्याच्या कुटुंबाची जेसीबीने घरच उद्ध्वस्त करण्याची धमकी काही गाव गुंडांनी दिली.
प्रवीणचे आजोबा शेतीमहामंडळात कामाला होते. नोकरी गेल्यानंतर त्यांचा संसाराचा कोठेच ठाव ठिकाणा नव्हता. शेती महामंडळाकडून आज ना उद्या राहायला घर मिळेल जमिन मिळेल या आशेवर प्रवीणचे वडील शेती महामंडळाच्या जागेत पाल टाकून रहात होते. पाच बाय सातच्या पालात राहणाऱ्या रमेश जाधव यांचा मुलगा असलेला प्रवीण खेळात चपळ होता. शिक्षकांनी ते हेरलं आणि प्रविणला मिळालेल्या मार्गदर्शनावर तो आज या ऑलिम्पिकपर्यंत पोहोचला.
प्रतिकुल परिस्थितीवर मात करत इथवर पोहोचलेल्या प्रविणचं कौतुक संपूर्ण देश करत होताच शिवाय पंतप्रधानांकडूनही त्याचं खास कौतुक झाले. एका बाजूला कौतुकाचा वर्षाव होत असताना दुसरीकडे मात्र प्रविणचे घर पाडण्यासाठी गावातले गावगुंड तयारीला लागले होते. या कुटुंबाला शेतजमीन देण्याच्या अनुषंगाने जिल्हाधिकारी यांच्या पातळीवर काम करत असतानाच यांना नव्याने मिळत असलेल्या जागेवर घर बांधू न देण्यासाठी धमकी देण्यात आली. या बाबत जेव्हा फलटण तालुका पोलिस ठाण्याचे वरिष्ठ नितिन सावंत यांना माहिती मिळाली त्यावेळी त्यांनी गावात जाऊन दोन गाव गुंडांना बरड ओपी पोलिस ठाण्यात आणत त्यांची समजूत काढली.. पोलिसांचा दंडुका बघितल्यावर दोघेही नरमले. आपण प्रविणच्या आईवडिलांना त्रास देणार नसल्याचे पोलिसांना लेखी दिले. सावंत यांच्या सोबत फोनवर संपर्क साधल्यानंतर हा वाद संपुष्टात आला असल्याचे त्यांनी सांगितले. वाद संपुष्टात आला असला तरी प्रशासकिय यंत्रणेने या कुटुंबावर खऱ्या आर्थाने लक्ष देऊन नुसती जागा न देता त्यांना ते बांधूनच द्यावे अशी मागणी सर्वच स्तरातून होताना दिसत आहे.
काय आहे नेमका वाद
रमेश जाधव यांनी पहिल्यांदा राहायला सुरवात केली. त्या झोपडीच्या वरच्या बाजूला त्यांनी दोन खोल्या अनाधिकृत बांधल्या. झोपडीत जेवण बनवले जायचे. दोन खोल्यांमधील एका खोलीत प्रविणची चुलती आणि दुसऱ्या खोलीत प्रविणचे आई वडिल राहायचे. प्रविणने या अगोदर त्या खोल्यांच्या समोरच्या बाजूला पत्र्याचे शेड वजा घर बांधायचे ठरवले. ते बांधत असताना त्या जागेच्या मागच्या बाजूला शेती असणारे दादा बेलदार, बळीराम बेलदार या दोन भावांनी त्यांचे बांधकाम थांबवले. कारण होते ते म्हणजे त्यांच्या शेतीकडे जाण्यासाठी ते अनाधिकृतपणे त्या जागेचा वापर करत होते. बेलदार बंधू ज्या जागेतून वहिवाट करत होते ती जागा शेती महामंडळाची आहे. त्याच जागेत रमेश जाधव यांना घर बांधायचे होते. काही दिवसापूर्वी त्यांनी पुन्हा त्याच जागेत घर बांधायचा प्रयत्न केला तेव्हा त्यांची पुन्हा अडवणूक झाली. तेव्हाही बांधकाम थांबवले. दोन दिवसापुर्वी फलटणचे प्रांताधिकार शिवाजीराव जगताप यांनी त्यांना शेती महामंडळाच्या जागेतील त्याच ठिकाणी तीन गुंठे जागा मोजून दिली. काल त्या जागेला प्रविणचे वडिल कंपाऊंड घालत असताना आलेल्या कामगारांना आरेरावी करत या बेलदार कुटुंबाने हाकलून लावले आणि रमेश जाधव त्यांची पत्नी आणि बेलदार कुटुंब यांच्यात जोरदार वादावादी झाली. झालेला वाद हा फलटण ग्रामीणचे पोलिस निरिक्षक नितीन सावंत यांना समजल्यानंतर सावंत आणि फलटण प्रांताधिकारी तेथे गेले. परिस्थिती समजून घेतली आणि त्यांनी बेलदार बंधूंना बरड ओपी पोलिस ठाण्यात बोलावून घेतले. प्रविण जाधव यांना आणि बेलदार कुटुंबाला समोरा समोर बसवले आणि नंतर वाद मिटवला. मी त्यांच्या बांधकामात कुठेही अडथळा आणणार नाही असे लिहून दिल्यावर हा वाद समझोत्यातून मिटला.
संबंधित बातम्या :