मुंबई : राज्यात आज मराठवाड्यासह विदर्भातील काही जिल्ह्यामध्ये अवकाळी पावसाने जोरदार तडाखा दिला. यामुळे फळबागांसह शेतीमालाचे मोठे नुकसान झाले. कोरोना व्हायरसच्या संकटामुळे अनेक कृषी उत्पन्न बाजार समित्या बंद आहे. त्यामुळे बहुतांश शेतकऱ्यांचा शेतीमाल शेतातचं पडून आहे. परिणामी अशा शेतकऱ्यांच्या चिंता वाढल्या आहेत. लॉकडाऊनमुळे घरात बसावे लागणाऱ्या नागरिकांना काहीसा दिलासा या पावसामुळे मिळाला आहे. कारण, पावसामुळे वातावरणात थोडासा गारवा निर्माण झाला आहे.
गेल्या अनेक दिवसांपासून मराठवाड्यासह विदर्भात तापमानाचा पारा वाढतचं चालला आहे. आजच्या पावसामुळे लोकांना काहीसा दिलासा मिळाला. मात्र, शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. सोलापुरात मागील 3 दिवसात 43 अंशवर पारा पोहोचला होता. आज अचानक पावसाने हजेरी लावल्याने घरात बसणाऱ्या नागरिकांना मोठा दिलासा मिळाला आहे. सोलापूर शहरात रिमझिम पाऊस झाला तर बार्शी, पंढरपुरात पावसाने जोरदार बॅटिंग केली. माढा तालुक्यातील उपलाई बुद्रुक येथे गारांचा तुफानी पाऊस बरसला. यावेळी विजांचा कडकडाट आणि सोसाट्याच्या वाऱ्यात गारांच्या पावसाने पिकांचे मोठे नुकसान केले. या पावसामुळे वातावरण पसरलेल्या गारव्यामुळे सुखद वातावरण निर्माण झाले.
यंदा 20 दिवस हाय टाईड, जास्त पाऊस झाल्यास शहर तुंबण्याची भीती : पंचांगकर्ते दा. कृ. सोमण
औरंगाबाद जिल्ह्यात काही ठिकाणी वादळी वाऱ्यासह पाऊस झाला. तर काही भागात तुरळक गारपीटही झाली. सोसाट्याच्या वाऱ्यामुळे झाडे उन्मळून पडली होती. विजेची खांबही खाली कोसळले. दुपारी चार साडेचारच्या दरम्यान वादळी वाऱ्यासह पावसाने औरंगाबाद जिल्ह्यात हजेरी लावली. चंदगड तालुक्यातही भागात वळीवाने झोपडले. सोसाट्याच्या वाऱ्यामुळे वृक्ष उन्मळून पडल्याने वाहतुकीला व्यत्यय आला.
विदर्भात गारांचा तडाखा
विदर्भातील काही जिल्ह्यामध्येही पावसाने हजेरी लावली. अमरावती जिल्ह्यातील अचलपूर, परतवाडासह तालुक्यात अनेक भागात गारपीटीसह अवकाळी पाऊस बरसला. यामुळे उन्हाने लाही लाही झालेले अचलपूर तालुकावासी काही काळासाठी सुखावले. चंद्रपूरमधील वादळी पावसाने शेतकरी संकटात आला आहे. तर जिवंत विजेच्या तारा जमिनीवर पडून 5 जनावरांचा मृत्यू झाल्याने शेतकऱ्याचे मोठं नुकसान झालं. राजुरा तालुक्यातील गोयगाव येथे ही घटना घडली. शेतात पडलेल्या तारांचा स्पर्श झाल्याने 3 बैल आणि 2 गाईंचा जागेवरचं मृत्यू झाला. स्थानिक प्रशासनाने या घटनेचा पंचनामा केला असून नुकसान भरपाईची मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.
पुण्यात विविध भागात वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसाची हजेरी
अकोल्यात देखील आज पावसाने हजेरी लावल्याने गेल्या आठवडाभरापासून वातावरणातील उकाडा कमी होण्यास मदत झाली. तर, जालन्यातील बदनापूर येथे गारांचा तडाखा बसला. गारपीटीने अनेक घरांचे नुकसान झाले. आंबा, मोसंबीच्या फळबागांना याचा फटका बसला. लिंबाच्या आकारा एवढ्या गारा बरसल्या. जालना शहर आणि बदनापूर तालुक्यात पावसाने जोरदार हजेरी लावली. बदनापूर तालुक्यातील अकोला निकळक, पाडळी, धोपटेश्वर, रामखेडा इत्यादी ठिकाणी वादळी वाऱ्यांसह गरपीट झाली. धुळे जिल्ह्यातील नेर, मोहाडी प्र. डांगरी, न्याहळोद, परिसरात वादळी वाऱ्यासह पाऊस बरसला.
Uncertain Rain | ऐन उकाड्यात परभणी आणि चंद्रपुरात अवकाळी पाऊस