कोल्हापूर : एकच धून 6 जून म्हणत छत्रपती शिवाजी महाराज यांचा राज्याभिषेक सोहळा होणारचं असा विश्वास खासदार छत्रपती संभाजीराजे यांनी व्यक्त केला आहे. परंपरेप्रमाणे सहा जूनला रायगडावर महाराजांचा राज्याभिषेक सोहळा पार पाडला जाईल, त्यात कुठलाही खंड पडणार नसल्याचं त्यांनी म्हटलं आहे. मात्र, सध्या देशावर असलेले कोरोना व्हायरसचं संकट पाहता या सोहळ्याचे स्वरुप कसे असेल यावर विचार सुरू असल्याचे त्यांनी सांगितले.




असे असले तरी राजसदरेतील राज्याभिषेक सोहळा सर्व शिवभक्तांना थेट पाहता येईल, याविषयी सुद्धा उपाय योजना करण्याचा माझा मानस असल्याचे खासदार छत्रपती संभाजीराजे म्हणाले. कोरोना व्हायरसच्या संकटामुळे राज्यातील अनेक सांस्कृतिक सोहळे रद्द करण्यात आले आहे. पंढरपूरच्या आषाढी वारीवरही अशाच प्रकारचं संकट आहे. दरवर्षी सहा जूनला रायगडावर छत्रपती शिवाजी महाराज यांचा राज्याभिषेक सोहळा पार पडतो. मात्र, यंदा या सोहळ्यावर कोरोनाचे संकट आहे. त्यामुळे शिवभक्तांच्या मनात संभ्रम आहे. या पार्श्वभूमीवर खासदार छत्रपती संभाजीराजे यांनी फेसबुक पोस्ट लिहली आहे.


'चला हवा येऊ द्या' वादाच्या भोवऱ्यात; डोक्यात हवा गेल्याचा संभाजीराजे छत्रपती यांचा आरोप


काय आहे पोस्ट
एकच धून 6 जून असं म्हणत महाराष्ट्राच्या अन देशाच्या कानाकोपऱ्यातून लाखो शिवभक्त कशाचीही पर्वा न करता दरवर्षी रायगडावर पोहोचत असतात. फक्त महाराजांचा राज्याभिषेक सोहळा डोळ्यांत साठवून घेण्यासाठी हजारो किलोमीटरचा प्रवास करुन शिवभक्त गडावर येत असतात.


गेली 14 वर्षं आपण हा सोहळा अगदी राजवैभवात संपन्न करत आहोत. शिवराज्याभिषेक सोहळा आता लोकोत्सव झाला आहे. देशभर किंवा खऱ्या अर्थाने तो आता आंतरराष्ट्रीय स्तरावर पोहोचला आहे. गेल्या वर्षी 5 देशांचे राजदूत त्या त्या देशाचे अधिकृत प्रतिनिधी म्हणून राजसदरेवर महाराजांना मुजरा करण्यासाठी दाखल झाले होते. हे आपण सर्वांनी पहिलेच आहे.


यावर्षी सुद्धा माझ्या मनात अजून मोठं अन् आगळं वेगळं नियोजन होतं. परंतु, जगाला महामारीरूपी शत्रू ने वेढले आहे. देशात, त्यातल्या त्यात महाराष्ट्रात परिस्थिती अजूनही गंभीर आहे. कॉरोनामुळे, दरवर्षीप्रमाणे शिवभक्तांना इच्छा असूनही लाखोंच्या संख्येने गडावर येता येणार नाही. संसर्ग टाळण्याच्या दृष्टीने ते योग्यही आहे.


कोरोनाचा संसर्ग अजून किती प्रमाणात वाढेल? लॉकडाऊनचा कालावधी अजून किती दिवस असेल? किती शिवभक्तांना गडावर जाण्याची परवानगी मिळेल? त्याबाबत स्पष्टता येत नाही आहे. या संदर्भात माझी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याशी चर्चा झाली आहे. या महिना अखेरपर्यंत परिस्थिती पाहून योग्य तो निर्णय घेण्यात येईल. आणि तो सर्वांना कळवण्यात येईल.


गेल्या काही दिवसांपासून मी महाराष्ट्रातील विविध भागांतील शिवप्रेमी, इतिहासकार, शिवराज्याभिषेक महोत्सव समिती चे सदस्य, अनेक दुर्गप्रेमी संस्थांचे सदस्य, संबंधित विविध संघटना, शासकीय अधिकारी, लोकप्रतिनिधी, पत्रकार या सर्वांशी चर्चा करत आहे.


सर्व शिवभक्तांना मी एकच शब्द देतो, की महाराजांचा राज्याभिषेक विधिवत पार पाडला जाईल. त्या परंपरेमध्ये खंड पडू देणार नाही. राजसदरेतील राज्याभिषेक सोहळा सर्व शिवभक्तांना थेट पाहता येईल याविषयी सुद्धा उपाय योजना करण्याचा माझा मानस आहे.

सहा जूनचा सोहळा होणार हे नक्की. मात्र, सर्व शिभक्तांना गडावर येता येईल की नाही याबद्दल आणखी निर्णय झालेला नाही.


Pandharpur Wari | पंढरीचा राजा यंदा भक्तांविनाच? यंदाची आषाढ वारी रद्द होणार का? स्पेशल रिपोर्ट