पुणे : पुणे शहरासह उपनगर भागात शुक्रवारी दुपारी 4 वाजेनंतर जोरदार अवकाळी पाऊस झाला. गुरुवारीही शहरातील काही भागात पाऊस झाला होता. त्यातच आज दुपारी पुन्हा अवकाळी सरी कोसळल्या आहेत. यावेळी शिवाजीनगर भागात गारांचा पाऊस झाल्याचीही माहिती आहे.


पुणे वेधशाळेने दिलेल्या अंदाजानुसार, पुढील दोन दिवस शहर व ग्रामीण भागात अवकाळी पावसाचा इशारा देण्यात आला होता. वेधशाळेचा अंदाज खरा ठरला असून शहरातील विविध पेठांसह कोथरूड, हडपसर, कोंढवा, बिबवेवाडी या उपनगर भागातही पावसाने हजेरी लावली. यावेळी मोठ्या प्रमाणावर विजांच्या कडकडाट पाऊस जोरदार बरसला. पुण्यात सिंहगड रस्ता, बुधवार पेठ, हडपसर, कोथरूड, शिवाजीनगर, कात्रज, वारजे भागात तर ग्रामीण भागात मुळाशी, भूगाव, बावधन पट्ट्यात पावसाने हजेरी लावली.



मुसळधार पाऊस व सुसाट वारा यामुळे संपूर्ण शहराच्या विविध भागात किमान 50 ठिकाणी झाडे पडल्याच्या घटनांची अग्निशमन दलाकडे नोंद झाली आहे. तर मंगळवार पेठ येथे इमारतीवरील मोठा टॉवर व शिवाजीनगर येथे होर्डिंग्स पडल्याची माहिती आहे. सुदैवाने या घटनांमध्ये जखमी कुणीही जखमी नाही.


शिवाजीनगर भागातील संचेती हॉस्पिटल जवळील दिशादर्शक कमान वादळी वाऱ्याने कोसळली आहे. त्यामुळे शिवाजीनगरहून पुणे रेल्वे स्टेशन आणि डेक्कनकडे जाणारा रस्ता बंद झाला आहे. ही लोखंडी कमान लवकरात लवकर हटवण्यासाठी महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी प्रयत्न सुरु केले आहेत. लॉकडाऊनमुळे आधीच शहरातील काही रस्ते बंद आहेत. अशात शिवाजीनगरचा मुख्य रस्त्या बंद झाल्याने जीवनावश्यक वस्तूंची वाहतूक करणारी वाहनांवर त्याचा परिणाम होणार आहे.