Unseasonal Rain News : सध्या राज्यात काही ठिकाणी अवकाळी पाऊस पडत असल्याचे चित्र दिसत आहे. अचानक होत असलेल्या या पावसामुळे नागरिकांची चांगलीच तारंबळ उडाली आहे. दरम्यान, शनिवारी मध्यरात्रीच्या सुमारास सांगली शहरासह परिसरात वादळी वाऱ्यासह पाऊस झाला. पावसासोबत जोरदार वारा सुटलेल्या रस्त्यावर झाडे उन्मळून पडल्याची घटना घडली आहे. तर दुसरीकडे सोलापूर जिल्ह्यातही काही ठिकाणी अवकाळी पावसाने हजेरी लावली. सोलापूरमध्ये रात्री 1  वाजल्यापासून विजांच्या कडकडटासह मुसळधार पावसाला सुरुवात झाली होती. तसेच मराठवाड्यातही काही ठिकाणी पावसाने हजेरी लावली.




दरम्यान, सांगलीत मोठमोठी झाडे रस्त्यावर उन्मळून पडल्याने सांगली-तासगाव रोडवरील वाहतूक सध्या बंद करण्यात आली आहे. सांगली-तासगाव रोडवरील माधवनगर हद्दीतील रस्त्यावर  2 मोठी झाडे पडली आहेत. त्यामुळे वाहतुकीवर परिणाम झाला आहे. तर अहमदनगरमध्येही अवकाळी पावसाने हजेरी लावली. पारनेरमध्ये वीज पडून तीन जनावरे दगावल्याची घटना घडली आहे.


वादळी वारे आणि जोरदार पावसाने हळदीचे मोठे नुकसान होण्याची शक्यता 


राज्यासह मराठवाड्यातील काही भागात  वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस पडणार असल्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तविला होता. हा अंदाज रात्री खरा ठरला. हवामान विभागाने वर्तवलेल्या अंदाजानुसार वातावरणात कमालीचा बदल झाला असून हिंगोली जिल्ह्यात मागील दोन दिवसापासून ढगाळ वातावरण आहे. शनिवारी रात्री अकरा ते बाराच्या दरम्यान गर्जना व विजांच्या कडकडाटासह हिंगोली शहरासह जिल्ह्यातील अनेक भागांमध्ये दोन तास अवकाळी पाऊस झाला. अचानक पडलेल्या पावसामुळे शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे. कारण शेतामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये शिजवून टाकलेल्या हळदी या पावसामुळे भिजण्याची शक्यता आहे. सध्या जिल्ह्यात सर्वत्र ढगाळ वातावरण असून पाऊस पुन्हा  पडेल असा अंदाज आहे. गेल्या काही दिवसापासून तापमानाचा पारा चढल्याने उष्णतेच्या झळा सोसाव्या लागत होत्या. त्यात हवामान खात्याने वर्तवण्यात आलेल्या अंदाजानुसार अवकाळी पाऊस पडायला सुरुवात झाली आहे. रत्नागिरी जिल्ह्यातील काही भागात विजांच्या कडकडाटासह जोरदार पाऊस झाला आहे. तसेच पहाटेपासून उस्मानााबाद परिसरातही मेघगर्जनेसह पाऊस सुरु आहे. उस्मानाबाद जिल्ह्यात पावसामुळे आंबा पिकाचे नुकसान होण्याची शक्यता आहे.


रात्री सिंधुदुर्ग जिल्ह्यात गडगडाटासह अवकाळी पाऊस झाला. कणकवली, कुडाळ, सावंतवाडी, दोडामार्गमध्ये अवकाळी पाऊस झाला आहे. पहाटे झालेल्या सोसाट्याच्या वाऱ्याचा फटका मालवणमधील दांडी समुद्र किनाऱ्यावरील पर्यटन नौकांना बसला आहे.  समुद्रात नांगरुन ठेवलेल्या तीन पर्यटन नौका जोरदार वाऱ्यामुळे किनाऱ्यावर येऊन टेकल्या तर मालवण बंदर किनाऱ्यावर एक मासेमारी नौका (फायबर बल्याव) किनाऱ्यावर वाहून आली. मात्र, या नौकांचे नुकसान झाले नाही.


तसेच आज पहाटेपासून पंढरपूर परिसरात मेघगर्जनेसह पाऊस सुरु आहे. परभणीत पहाटेच्या सुमारास विजांच्या गडगडाटासह हलका पाऊस झाला आहे. सध्या जिल्ह्यात अनेक ठिकाणी ढगाळ वातावरण आहे. रत्नागिरी जिल्ह्यातील बहुतांश भागात सध्या जोरदार पावसाचे वातावरण निर्माण झाले आहे. ढगाची दाटी झाली असून विजांच्या कडकडाटासह आणि ढगाच्या गडगडाटासह जोरदार पाऊस कोळसळण्याचा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे. सध्या जिल्ह्यातील संगमेश्वर, देवरुख या भागात जोरदार पाऊस कोसळत आहे. तर रत्नागिरी तालुक्यात काही ठिकाणी झिमझिम तर काही ठिकाणी सरींवर पाऊस पडत आहे. यावेळी विजा मात्र जोरदार कडाडत आहेत. तर, लांजा, राजापूर भागात रिमझिम आणि हलक्या स्वरूपाचा पाऊस असून खेड, दापोली, चिपळूण आणि मंडणगड याभागात वातावरण ढगाळ आहे. पुढील 3 ते 4 तासात जोरदार पावसाचा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे.


महत्त्वाच्या बातम्या: