Kisanputra Andolan : शेतकरी स्वातंत्र्यासाठी पुण्यात एक पदयात्रा निघणार आहे. ही पदयात्रा किसानपुत्र आंदोलनाच्या वतीनं 18 जूनला काढण्यात येणार आहे. 8 जून 1951 रोजी पहिला घटनाबिघाड करुन भारतीय राज्य घटनेत नसलेले परिशिष्ट 9 जोडण्यात आले. या परिशिष्टात समाविष्ट करण्यात आलेल्या कायद्यांविरुद्ध न्यायालयात जाता येणार नाही, अशी तरतूद करण्यात आली आहे. आज या परिशिष्टातील 284 कायद्यांपैकी 250 कायदे थेट शेतकऱ्यांशी संबंधित असल्याची माहिती किसानपुत्र आंदोलनाच्या वतीनं देण्यात आली आहे.


सिलिंग, आवश्यक वस्तू आदी कायद्यांमुळे शेतकरी गुलाम बनला आहे. आत्महत्या करु लागला आहे. या कायद्यांना परिशिष्ट 9 चे संरक्षण आहे. कायदे हे विषारी साप आहेत. परिशिष्ट 9 हे या सापांचे घर आहे.
संविधान विरोधी असलेले हे कायदे रद्द व्हावे आणि शेतकऱ्यांना स्वातंत्र्य मिळावे अशी मागणी किसानपुत्र आंदोलनाच्या वतीनं करण्यात आली आहे.


18 जूनला पुण्यात निघणारी पदयात्रा ही महात्मा गांधी पुतळा (रेल्वे स्टेशन) ते महात्मा फुले वाडा (भवानीपेठ) यादरम्यान काढण्यात येणार आहे. दरम्यान, शेतकरी विरोधी कायद्या संदर्भात भूमिका मान्य असलेला कोणीही व्यक्ती या पदयात्रेत सहभागी होऊ शकतो असे किसानपुत्र आंदोलनाच्या वतीनं सांगण्यात आले आहे. बाहेरचे लोकही या पदयात्रेत सहभागी होऊ शकतात. पण जे सहभागी होऊ शकणार नाहीत, त्यांनी पुण्यातील त्यांच्या संबंधीतांना फोन करुन, मॅसेज करुन यामध्ये सामील होण्यासाठी सांगावे, असे आवाहनही करण्यात आले आहे.


दरम्यान, सरकारे बदलली पण शेतकरीविरोधी नरभक्षी कायदे तसेच कायम राहिले. गळफास असलेल्या कायद्यांविरुद्ध कोणी आवाज उठवीत नाही. स्वातंत्र्याचा संकोच करणारा, संविधान विरोधी परिशिष्ट-9 रद्द करण्यासाठी कोणीही प्रयत्न करीत नाही. इतिहासाने ही जबाबदारी तुमच्या आमच्यावर टाकली आहे. शेतकरी वाचवू, देश वाचवू! छोट्या कृतीतून मोठा परिणाम साधू. म्हणून 18 जूनला पुण्यात होणाऱ्या पदयात्रेत सहभागी होण्याचे आवाहन करत असल्याचे सांगण्यात आले आहे.


महत्त्वाच्या बातम्या: