Rain Update : अरबी समुद्रात (Arebian Sea) कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्याने राज्यात (Mararashtra) पावसाची शक्यता (Rain Alert) आयएमडी (IMD) ने वर्तवली होती. भारतीय हवामान विभाग (India Meteorological Department) ने कोकणात ढगांच्या गडगडाटासह मुसळधार पाऊस कोसळणार असल्याचा अंदाज दिला होता. त्यानुसार सिंधुदुर्ग जिल्ह्यातील बहुतांश भागात मंगळवारी रात्रीपासून पावसाची संततधार सुरू आहे. काही ठिकाणी संततधार तर, काही ठिकाणी मुसळधार पाऊस कोसळत असल्याने बळीराजा चिंतातूर झाला आहे. हातातोंडाशी आलेलं भात पीक वाया जाण्याची भीती बळीराजाला आहे. ऐन भात कापणीच्या हंगामात पाऊस पडत असल्याने बळीराजा विवंचनेत सापडला आहे.
कोकणात विजांच्या कडकडाटासह पाऊस
सिंधुदुर्ग जिल्ह्याला आज यलो अलर्ट देण्यात आला आहे. तर पुढील चार ते पाच दिवस जिल्ह्यात पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील बहुतांश भागात अवकाळी पाऊस सुरु आहे. अवकाळी पावसामुळे बळीराजा संकटात अडकला आहे. भातशेतीला अवकाळी पावसाचा फटका बसण्याची चिंता आहे. कुडाळ, सावंतवाडी, वेंगुर्ले तालुक्यातील अनेक ठिकाणी विजांच्या कडकडाटासह अवकाळी पावसाची हजेरी पाहायला मिळत आहे.
मध्य महाराष्ट्रात पावसाची हजेरी
कोल्हापूर जिल्ह्याच्या ग्रामीण भागामध्ये रिमझिम पावसाची हजेरी पाहायला मिळत आहे. राधानगरी, भुदरगड तालुक्यात रिमझिम पाऊस सुरु आहे. भात पिकाच्या कापणीला पावसाचा फटका बसत असल्याने बळीराजा चिंतेत आहे. रात्रीपासून सिंधुदुर्गात अवकाळी पावसाची संततधार सुरूच आहे, यामुळे भातशेती धोक्यात आली आहे. सांगली जिल्ह्यातील वातावरणातही लक्षणीय बदल झाला आहे. जिल्हाभर ढगाळ वातावरण तर, काही भागात पावसाच्या जोरदार सरी कोसळत आहेत. पलूस भागात पहाटेपासून मुसळधार पाऊस सुरु असून जत तालुक्यातील उमदी भागात देखील पाऊस झाला आहे. या अवकाळी पाऊसाने द्राक्ष बागांसह अन्य पिकांवर रोगाचा धोका निर्माण झाला आहे.
गोव्यालाही अवकाळी पावसाने तडाखा
गोव्याला अवकाळी पावसाने तडाखा दिला आहे. पहाटे पासून सुरू झालेल्या गडगडाटासह पावसाची रिपरिप आताही सुरूच आहे. ढगांचा गडगडाट, विजांचा कडकडाट आणि जोरदार वाहणाऱ्या वाऱ्यासह पाऊस पडत आहे. गोवा वेधशाळेच्या अंदाजानुसार, दिवसभर पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. तसेच, आगामी तीन ते चार तासांमध्ये उत्तर गोवा आणि दक्षिण गोवा या जिल्ह्यांमध्ये गोव्यात गडगडाटासह मध्यम ते जोरदार पाऊस होऊ शकतो. या काळात 40 ते 60 किलोमीटर प्रतीतास वेगाने वारे वाहतील असाही अंदाज गोवा वेधशाळेने वर्तवला आहे. मात्र अचानक आलेल्या या पावसामुळे भात शेतीचे मोठे नुकसान होणार आहे.
अवकाळी पावसाचा भात पिकाला फटका
बेळगावात बुधवारी सकाळी झालेल्या अवकाळी पावसामुळे भात पिकाचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले असून पावसाळा सदृश्य वातावरण निर्माण झाले आहे. सकाळपासूनच आकाशात ढग दाटून आले होते. त्यामुळे सूर्यदर्शन झालेच नाही. सुरुवातीला काही वेळ पावसाचे थेंब पडण्यास सुरुवात झाली. अर्ध्या तासाहून अधिक काळ पावसाच्या हलक्या सरींनी हजेरी लावली. त्यानंतर मात्र ढगांचा गडगडाट सुरू झाला आणि आकाश अंधारून आले. लगेच पावसाला जोरदार सुरुवात झाली. दीड तासाहून अधिक काळ अवकाळी पाऊस सुरू होता. सकाळी शाळा, कॉलेजला जायची वेळ असल्याने विद्यार्थ्यांची मात्र तारांबळ उडाली. जोरदार पावसामुळे सखल भागात पाणी साठल्याचे पाहायला मिळाले. सध्या भात पिकाची कापणी सुरू झाली आहे.भात कापून शेतात ठेवलेल्या भात पिकाचे नुकसान झाले आहे. अद्याप शेतात असलेल्या भातपिकाचे भात पावसामुळे झडून गेल्याने शेतकऱ्याला नुकसान सहन करावे लागणार आहे.