बुलढाणा :  बुलढाणा जिल्ह्यात कृषी विभागाने जाहीर केलेल्या यादीमुळे शेतकऱ्यांना नाहक मनस्ताप सहन करावा लागत आहे. ज्या शेतकऱ्यांकडे बियाणेच नाही अशा शेतकऱ्यांची नावे या यादीत आहेत.  पण याहूनही अधिक गंभीर बाब म्हणजे त्या बियाण्यांची उगवण क्षमता देखील यात नमूद केल्याने शेतकरी संतप्त झाले आहेत. कृषी विभागाने कोणत्याही प्रकारची शहानिशा न करता ही नावे कशी दिली आणि आमच्या या बियाण्याची उगवण क्षमता यांनी तपासणी तरी कधी केली? असा प्रश्न शेतकऱ्याकडून विचारला जातोय. विशेष म्हणजे या शेतकऱ्यांना बियाणे उपलब्धतेबद्दल विचारणा करण्यासाठी इतर शेतकऱ्यांचे सतत फोन येत असतात. त्यामुळे मात्र या शेतकऱ्यांना नाहक मनस्ताप सहन करावा लागत आहे.


बुलढाणा जिल्ह्यातील शेतकरी बंधूंकडे उपलब्ध असलेल्या बियाण्यांची यादी समोर आली आहे. जिल्ह्यातील बुलढाणा, मेहकर, सिंदखेड राजा, देऊळगाव राजा, संग्रामपूर, चिखली, जळगाव जामोद, मलकापूर या तालुक्यातील शेतकऱ्यांची नावे या कृषी विभागाच्या यादीमध्ये नमूद आहे. अंदाजे तयार केलेल्या यादीमुळे मात्र शेतकऱ्यांना नाहक त्रास सहन करावा लागतोय. बियाणे विकत घेण्यासाठी अनेकांचे फोन येत आहेत. परंतु यादीमधील शेतकऱ्यांकडे स्वतःकडचे बियाणे उपलब्ध नसून देखील या फोन कॉल्सला कंटाळलेल्या शेतकरी आता मात्र संतप्त झाले आहे. बुलढाणा जिल्ह्यातील साखळी बुद्रुक या गावात सर्वाधिक बियाणं दाखवण्यात आलेल आहे. ज्या शेतकऱ्यांची नावे या यादीत होती त्यांना विचारणा केली असता त्यांनी आपल्या प्रतिक्रियेतून कृषी विभागाला चांगलेच फटकारले आहे.


याहूनही अधिक गंभीर प्रकार असा की यादीतील शेतकऱ्यांकडे उपलब्ध असलेल्या बियाण्यांची उगवण क्षमता देखील कृषी विभागाने नमूद केल्याने सगळा घोळ झाला आहे. एकतर कृषी विभागाने ही यादी अंदाजे बनवली आणि बनवलेल्या यादीमध्ये बियाणांची उगवण क्षमता देखील अंदाजे टाकली आहे. जर एखाद्या शेतकऱ्याने हे बियाणे विकत घेऊन पेरलं आणि ती उगवलच नाही तर याला जबाबदार कोण असणार? असा प्रश्न शेतकरी विचारत आहेत.


शेतकऱ्यांकडे बियाणे होते मात्र त्यांनी ते विकले असा दावा तालुका कृषी अधिकारी करत आहेत. तर हे सरकार शेतकऱ्यासोबत लबाडी करतंय. अधिकारी आणि सरकारच्या या लबाडपणाला सर्व शेतकरी कंटाळले आहेत, अशी तिखट प्रतिक्रिया राज्याचे माजी कृषिमंत्री अनिल बोंडे यांनी दिली आहे.