मुंबई : 7 नोव्हेंबरपर्यंत सत्ता स्थापन झाली नाही तर राज्यात राष्ट्रपती राजवट लागू होईल, असं म्हणत भाजपचे नेते सुधीर मुनगंटीवार यांनी शिवसेनेला सूचक इशारा दिला. एबीपी माझाशी बोलताना सुधीर मुनगंटीवार यांनी हे वक्तव्य केलं. त्यामुळे सत्ता स्थापनेसाठी भाजप शिवसेनेवर दबाव आणत असल्याची चर्चा आहे. दिवाळीमुळे चर्चेला उशीर झाला, असा दावा सुधीर मुनगंटीवार यांनी केला आहे. तसंच येत्या एक-दोन दिवसात चर्चेला सुरुवात होईल, असंही त्यांनी सांगितलं.


पाच वर्षांपूर्वी 31ऑक्टोबर 2014 रोजी देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली आणि ते महाराष्ट्रातील भाजपचे पहिले मुख्यमंत्री झाले होते. यंदा विधानसभेत लोकांनी महायुतीच्या बाजूने कल दिला होता. निकाल लागून नऊ दिवस उलटले तरी शपथविधीचा मुहूर्त अद्याप ठरलेला नाही. शिवसेना आणि भाजपमध्ये मंत्रिपदावरुन रस्सीखेच सुरु आहे. दोन्ही बाजूने ताणून धरलं जात आहे. परिणामी नवं सरकार स्थापन होण्यासाठी उशीर होत आहे.

Maharashtra Govt Formation | पाच वर्षांपूर्वी 31 ऑक्टोबरला शपथविधी, यंदा मुहूर्त कधी?

विधानसभा अध्यक्षपदाच्या निवडणुकीत शिवसेना, काँग्रेस राष्ट्रवादी एकत्र?
विधानसभा अध्यक्षपदाच्या निवडणुकीत नवीन राजकीय समीकरणं जुळून येण्याची शक्यता आहे. विधानसभा अध्यक्षपदाच्या निवडणुकीत शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेस एकत्र येण्याच्या तयारीत आहेत. अध्यक्षपदाच्या निवडणुकीत भाजपच्या उमेदवाराला शिवसेनेसह इतर पक्ष विरोध करण्याची शक्यता आहे. शिवसेनेशिवाय सरकार स्थापन केल्यास नवीन सभागृहात हंगामी अध्यक्ष आधी सर्व नवनिर्वाचित आमदारांना शपथ देतील आणि त्यानंतर नवीन अध्यक्षपदासाठी निवडणूक होईल. अध्यक्षपदाच्या या निवडणुकीत भाजपच्या उमेदवाराला शिवसेनेसह इतर पक्ष विरोध करू शकतात. या निवडणुकीत राष्ट्रवादीने उमेदवार दिल्यास शिवसेना आणि काँग्रेसचा पाठिंबा मिळण्याची शक्यता आहे. त्यामुळे भाजपच्या अध्यक्षपदाचा उमेदवार पराभूत होऊन भाजपच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे.

...तर मुख्यमंत्री शिवसेनेचाच होईल : संजय राऊत
उद्धव ठाकरेंनी ठरवलं तर राज्याचा मुख्यमंत्री शिवसेनेचाच होणार, असा दावा शिवसेना खासदार संजय राऊतांनी केला आहे. शिवाय, शिवसेनेनं ठरवलं तर शिवसेना आवश्यक ते बहुमत सिद्धही करु शकते, असं वक्तव्य संजय राऊत यांनी केलं आहे. मुंबईत पत्रकार परिषदेत संजय राऊत यांनी शिवसेनेची भूमिका मांडली आहे. संजय राऊतांनी काल (31 ऑक्टोबर) शरद पवारांची भेट घेतल्यानंतर चर्चाला उधाण आलं होतं. त्यानंतर आज राऊतांनी पुन्हा एकदा आक्रक पवित्रा घेत भाजपला इशाराच दिला आहे.

Maharashtra Government Formation | ...तर राज्यात राष्ट्रपती राजवट : सुधीर मुनगंटीवार | ABP Majha