मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसनंतर काँग्रेसनेदेखील सत्तास्थापनेसाठी शिवसेनेला मदतीचा हात पुढे केला आहे. शिवसेनेला पाठिंबा देण्यासंदर्भात काँग्रेस नेते सकारात्मक असल्याची माहिती सुत्रांकडून मिळाली आहे. यासाठी राज्यातील काँग्रेसच्या नेत्यांचं एक शिष्टमंडळ लवकरच दिल्लीत जाऊन पक्ष अध्यक्षा सोनिया गांधी यांची भेट घेणार असल्याची माहिती मिळाली आहे.


दरम्यान, काल (31 ऑक्टोबर) राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस नेत्यांची एक संयुक्त बैठक झाली. या बैठकीला दोन्ही पक्षातील महत्त्वाचे नेते उपस्थित होते. शरद पवारांसोबत झालेल्या बैठकीतदेखील काँग्रेस नेत्यांनी शिवसेनेला पाठिंबा देण्याबाबत चर्चा केल्याची माहिती मिळाली आहे.

राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष विरोधी पक्षाच्या बाकावर बसणार असल्याचे शरद पवारांनी याआधीच स्पष्ट केले असले तरी राष्ट्रवादी आणि काँग्रेसमधल्या एक गटाची शिवसेनेसोबत हातमिळवणी करुन सत्तास्थापन करण्याची इच्छा आहे. शिवसेनेला पाठिंबा देण्यासंदर्भात काँग्रेसने आधी स्वतःची ठाम भूमिका ठरवावी, असे मत शरद पवारांनी कालच्या बैठकीत मांडल्याचे सांगितले जात आहे.

काँग्रेसने शिवसेनेला पाठिंबा देण्याबाबत भूमिका ठरवावी, असा सल्ला शरद पवारांनी दिल्यानंतर याबाबत चर्चा करण्यासाठी राज्यातल्या काँग्रेस नेत्यांचे एक शिष्टमंडळ काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांची भेट घेणार आहे. ही भेट ठरल्यानंतर राज्यात भारतीय जनता पक्षाला सत्तेपासून दूर ठेवण्याच्या राजकीय हालचालींना वेग आल्याचे बोलले जात आहे.

दरम्यान, शिवसेनेला पाठिंबा देण्याबाबत काँग्रेस हायकमांड काय निर्णय घेतं? याकडे राजकीय वर्तुळाचं लक्ष लागलं आहे. काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस शिवसेनेला पाठिंबा देत सरकार स्थापन करणार असल्याच्या शक्यता बळावू लागल्यामुळे भाजपच्या गोटात चिंतेचे वातावरण आहे.

व्हिडीओ पाहा



संजय राऊत आणि शरद पवारांची गुप्त बैठक | ABP Majha



सत्तास्थापनेसाठी काँग्रेस शिवसेनेला पाठिंबा देण्यास उत्सुक? | Mumbai | ABP Majha



भाजप शिवसेनेने सत्ता स्थापन केली तर कोण असतील महाराष्ट्रातील संभाव्य मंत्री |ABP Majha