सोलापूर : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सर्वत्र लॉकडाऊनची स्थिती आहे. सर्व व्यवसाय, उद्योग हळूहळू पूर्वपदावर येत आहेत. मात्र शाळा अद्याप सुरु झालेल्या नाहीत. अशा स्थितीवर मात करत काही शाळांनी ऑनलाईन शिक्षण सुरू केले. मात्र ग्रामीण भागात विद्यार्थ्यांना ऑनलाईन शिक्षण देताना बऱ्याच अडचणींना सामोरे जावं लागतं. यावर अक्कलकोटमधील बादोले गावातील शाळेने एक भन्नाट आयडिया शोधली आहे.
अक्कलकोटमधील बादोले गाव. गावात जवळपास पाच हजार लोक राहतात. गावात अनेक कष्टकरी आणि गरीब कुटुंबिय राहतात. गावात विद्यार्थ्यांसाठी दोन प्राथमिक आणि केवळ एक हायस्कूल आहे. त्यामुळे पाचवी ते दहावी पर्यंतचे शिक्षण गावातील विद्यार्थ्यांना याच शाळेत घ्यावं लागतं. कोरोनामुळे अनेक गोष्टी बंद पडल्या तसं शाळांना देखील कुलूप लागले. मात्र विद्यार्थ्यांचे शिक्षण बंद होऊ नये यासाठी शाळेतील शिक्षकाने एक भन्नाट कल्पना राबविली.
शाळा बंद असल्याने राज्यातील अनेक शाळांनी ऑनलाईन शिक्षण सुरु केलं. मात्र शाळेतील शिक्षकांनी गावचा सर्व्हे केला. तेव्हा गावातील केवळ तीस टक्के लोकांकडेच स्मार्ट फोन असल्याचे त्यांच्या लक्षात आले. त्यामुळे इतर विद्यार्थ्यांना शिक्षण कसं द्यायचं हा प्रश्न त्यांच्यासमोर पडला. त्यातूनच शाळेत कला शिक्षक असलेल्या मयूर दंतकाळे या शिक्षकाच्या डोक्यातून वेगळी कल्पना समोर आली. गावातील मंदिर, समाज मंदिर, भजनी मंडळांशी त्यांनी संपर्क केला. अन् थेट मंदिरांच्या ध्वनिक्षेपकांवरुनच शाळेचे पाठ शिकवायला सुरुवात केली.
ग्रामस्थ आणि मंदिर समितीतील लोकांनी देखील मोठ्या आनंदात या उपक्रमाचे स्वागत केले. के. पी. गायकवाड शाळेतील शिक्षकांनी पाचवी ते आठवीपर्यंतच्या कविता, पाढे इतर शैक्षणिक अभ्यासक्रम ऑडियो फॉरमॅटमध्ये संकलित केलं आणि "शाळा बंद, शिक्षण चालू" या उपक्रमाला सुरुवात झाली. शाळेतील शिक्षकेतर कर्मचारी मंदिरात जातात आणि गावातील विद्यार्थी सकाळी 7 ते 9 या वेळेत भोंग्यावरून सुरू झालेल्या कविता आणि धडे ऐकून ते गिरवू लागले. शिक्षकांच्या या प्रयत्नांचे गावातील विद्यार्थी आणि पालक देखील मोठ्या उत्साहात स्वागत करत आहेत.
शाळा बंद, शिक्षण चालू या उपक्रमाला चांगला प्रतिसाद मिळत आहे. मुख्याध्यापक सुनील गुमास्ते, अध्यक्ष मल्लिनाथ बगले, सचिव माधव बगले, महादेव सोनकर, कैलास गायकवाड, नागनाथ धर्मसाले यांच्या सहकार्यामुळे हे उपक्रम सुरु होऊ शकले. विद्यार्थ्यांच्या शालेय शिक्षणाच खंड पडू नये, हा या उपक्रमामागचा मुख्य हेतू आहे. या उपक्रमामुळे संपूर्ण गावात शैक्षणिक वातावरण निर्माण झाले आहे. गावकऱ्यांचे सहकार्य असल्याने हे शक्य झाल्याची प्रतिक्रिया शिक्षक मयुर दंतकाळे यांनी एबीपी माझाशी बोलताना दिली.
कोरोनाच्या महामारीने अख्या देशाची परिस्थिती बदलली. सारं काही बंद आहे. त्यात देवाची दारं देखील अपवाद नाहीयेत. मात्र मयूर दंतकाळे सारखे शिक्षक असतील तर शिकणाऱ्या विद्यार्थ्यांच्या पंखाना आणखी बळ मिळेल यात शंका नाही.
अक्कलकोटमधील शाळेची भन्नाट कल्पना, मंदिराच्या भोंग्यावरुन विद्यार्थ्यांना शिक्षणाचे धडे
आफताब शेख, एबीपी माझा
Updated at:
07 Aug 2020 02:17 PM (IST)
ग्रामीण भागात विद्यार्थ्यांना ऑनलाईन शिक्षण देताना बऱ्याच अडचणींना सामोरे जावं लागतं. यावर अक्कलकोटमधील बादोले गावातील शाळेने एक भन्नाट आयडिया शोधली आहे.
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -