परभणी : परभणीच्या पाथरीतून बीड जिल्ह्यातील माजलगाव येथे जाण्यासाठी, पाथरीमधील नागरिक चेकपोस्ट टाळून थेट गोदावरी नदीपात्रातून जीवघेणा प्रवास करत असल्याची बाब समोर आली आहे.


परभणी आणि बीडच्या सीमेवर पाथरी तालुक्यातील ढालेगाव येथे कोरोना आणि लॉकडाऊनमुळे चेक पोस्ट उभारण्यात आलेला आहे. त्याचप्रमाणे बीड जिल्ह्यातील माजलगाव सीमेवरही अशाच प्रकारची चेकपोस्ट उभारण्यात आला आहे. त्यामुळे जाण्या-येण्यासाठी होणारा त्रास पाहता पाथरीतील नागरिकांनी माजलगावला जाण्यासाठी थेट गुंज खुर्द गावाच्या गोदावरी पात्रातून रस्ता काढला आहे. याच मार्गातून अनेक जण आपले कुटुंब, लहान मुले घेऊन जात आहेत.



अनेक वेळा या गोदावरी पात्रात गाडी बंद पडतात. त्यातच ढालेगावचा बंधारा भरल्याने केव्हाही या बंधाऱ्यातून पाणी सोडण्यात येत आहे. त्यामुळे अशाप्रकारे प्रवास करणाऱ्या नागरिकांचा जीव धोक्यात येऊ शकतो. म्हणून हा धोकादायक प्रवास थांबवण्याची मागणी काही नागरिकांनी केली आहे.