संगमनेर: सम आणि विषम तिथीच्या सूत्रातून अपेक्षित संततीप्राप्तीचा मंत्र सांगून अडचणीत सापडलेल्या समाज प्रबोधनकार निवृत्ती महाराज देशमुख इंदोरीकर यांना संगमनेरच्या जिल्हा व सत्र न्यायालयाने मोठा दिलासा दिला आहे. प्रथमवर्ग न्यायदंडाधिकार्‍यांच्या निर्णयाविरोधात इंदोरीकरांनी जिल्हा सत्र न्यायालयात धाव घेतली होती. त्यानुसार न्यायालयाने त्यांना 20 ऑगस्टची तारीख देत खालील न्यायालयाच्या आदेशाला स्थगिती दिल्याने इंदोरीकरांना मोठा दिलासा मिळाला आहे. आज निवृत्ती महाराज देशमुख इंदोरीकर न्यायालयात येणार असल्याने त्यांच्या चाहत्यांसह राज्यभरातील माध्यमांच्या प्रतिनिधींनी न्यायालयाबाहेर मोठी गर्दी केली होती, मात्र सत्र न्यायालयाच्या स्थगितीने त्या सर्वांचा हिरमोड झाला.

समाज प्रबोधनकार निवृत्ती महाराज देशमुख इंदोरीकर यांनी पुणे जिल्ह्यातील उरण व नगर तालुक्यातील एका ठिकाणी आपल्या कीर्तनातून सम आणि विषम तिथीचे सूत्र मांडतांना त्यातून अपेक्षित संततीची प्राप्ती होते असे वादग्रस्त विधान केल्याचा आरोप करीत अंधश्रद्ध निर्मुलन समितीने जिल्हा शल्यचिकित्सकांकडे त्यांच्या विरोधात तक्रार दाखल केली होती. त्यानुसार संगमनेरच्या ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ.भास्कर भंवर यांनी संगमनेरच्या प्रथमवर्ग न्यायदंडाधिकार्‍यांच्या न्यायालयात इंदोरीकरांच्या विरोधात तक्रार दाखल केली होती, न्यायालयाने इंदोरीकरांना म्हणणे सादर करण्यासाठी पुरेसा वेळ देत जवळपास महिन्याभरानंतर आजची तारीख दिली होती.

मात्र त्या दरम्यान प्रथमवर्ग न्यायदंडाधिकार्‍यांच्या निर्णयाला इंदोरीकरांनी संगमनेरच्या जिल्हा व सत्र न्यायालयात आव्हान दिले. वरिष्ठ न्यायालयाने त्यांना 20 ऑगस्ट रोजी सुनावणीची तारीख देत खालच्या न्यायालयाच्या निर्णयाला स्थगिती दिली होती. आज सकाळी न्यायालयीन कामकाज सुरु होताच इंदोरीकरांचे वकील  के.डी.धुमाळ यांनी प्रथमवर्ग न्यायदंडाधिकार्‍यांसमोर हजर होत त्यांना जिल्हा न्यायालयाच्या आदेशाची व स्थगितीची माहिती दिली.

वादग्रस्त वक्तव्य भोवलं, अखेर इंदोरीकर महाराजांविरोधात गुन्हा दाखल

निवृत्ती महाराज इंदोरीकर महाराज काय बोलले होते?

'स्त्रीसंग सम तिथीला झाला तर मुलगा होतो, विषम तिथीला झाला तर मुलगी होते आणि स्त्री संग जर अशीव वेळेला झाला तर ती रांगडी, बेवडी आणि खानदान मातीत मिळवणारी होतात. जर टायमिंग हुकला की क्वॉलिटी खराब. पुलश्य नावाच्या ऋषींनी कैकसी नावाच्या स्त्रीशी सूर्य अस्ताला जाताना संग केला तर रावण, बिभीषण, कुंभकर्ण जन्माला आला तर आदिती नावाच्या ऋषीने पवित्र दिवशी संग केला तर त्याच्या पोटी हिराण्यक्ष नावाचा राक्षस जन्माला आला. हिरण्यकक्षपूने नारायण म्हणून संग केला तर भक्त प्रल्हाद जन्माला आला.'

जगा अन् जगू द्या..! इंदोरीकर विरोधकांना सिंधुताई सपकाळ यांची भावनिक साद

इंदोरीकरांनी मागितली होती माफी
अपत्यप्राप्तीसाठी केलेल्या वादग्रस्त वक्तव्याप्रकरणी निवृत्ती महाराज इंदोरीकर यांनी वाद टोकाला गेल्यावर दिलगिरी व्यक्त केली होती. इंदोरीकर महाराज यांनी पत्रक जाहीर करुन दिलगिरी व्यक्त केली होती. माझ्या वक्तव्यामुळे कोणाच्या भावना दुखावल्या असतील तर मी दिलगिरी व्यक्त करतो, असं त्यांनी पत्रकात म्हटलं होतं. माझ्या कीर्तनरुपी सेवेतील ज्या वाक्यामुळे सोशल मीडिया व इलेक्ट्रॉनिक मीडियासह इतर समाजमाध्यमांत माझ्या अभ्यासानुसार मी केलेल्या वक्तव्याचा विपर्यास केला जात आहे. तरी मी वारकरी सांप्रदायाचा पाईक असून मी माझ्या 26 वर्षांच्या कीर्तनरुपी सेवेत समाजप्रबोधन, समाजसंघटना, अंधश्रद्धा निर्मूलन व विविध जाचक रुढी परंपरा यावर भर दिला होता. माझ्या कीर्तनरुपी सेवेतील या वाक्याने कुणाच्या भावना दुखावल्या गेल्या असतील तर मी दिलगिरी व्यक्त करतो व माझ्यावरील प्रेम वृद्धिंगत व्हावे ही सदिच्छा, असं त्यांनी म्हटलं होतं.



संबंधित बातम्या

इंदोरीकर महाराजांच्या समर्थनार्थ अकोले कडकडीत बंद, बाईक रॅली काढत युवकांचा इंदोरीकरांना पाठिंबा

इंदोरीकर महाराजांवर गुन्हा दाखल झाला तर रस्त्यावर उतरु, संभाजी भिडेंच्या शिवप्रतिष्ठानचा इशारा