सोलापूर : आषाढी एकादशीचा सोहळा अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपला आहे, महाराष्ट्राच्या अध्यात्मिक संस्कृतीची वर्षानुवर्षांची परंपरा असलेल्या पंढरीच्या वारीचा ( Pandharichi wari) उत्साह दिवसेंदिवस वाढत आहे. महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून दिंडी, पालख्या आणि भक्तांची रांग पंढरीच्या दिशेन पाऊले टाकत आहे. ऊन, पाऊस आणि वाऱ्याची तमा न बाळगता वारकरी (Varkari) पांडरंगाच्या भक्तीत तल्लीन झाली आहेत. संत तुकाराम महाराज, संत ज्ञानेश्वर, बुलडाण्यातून श्री क्षेत्र गजानन महाराजांच्या पालखींसह शेकडो पालख्या हजारोंच्या संख्येने वारीत सहभागी होत असतात. या वारीचा उत्साह, भक्ती आणि जल्लोष आपल्या कॅमेऱ्यात कैद करण्यासाठी फोटोग्राफर्सही पंढरीच्या वारी भक्तीत मग्न होऊन आपलं काम करत असतात. मात्र, आज पुरंदावडे येथील रिंगण सोहळ्यात एका फोटोग्रार्फचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना घडली.  


संत ज्ञानेश्वर महाराज माऊलींच्या पुरंदावडे येथील रिंगण सोहळ्यात एक दुर्दैवी घटना घडली. येथील अश्वांचे रिंगण सुरू असताना एका अश्वाच्या गळ्यातील पट्ट्यात पुढील अश्वाचा पाय अडकल्याने तो घोडा रिंगणासमोर खाली बसलेल्या लोकांच्या अंगावर पडला. याच वारकरी आणि भक्तांमध्ये बसलेले फोटोग्राफर या अपघातात जखमी झाले होते. रिंगण सोहळ्यात जखमी झालेल्या कल्याण चटोपाध्याय यांचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली. त्यामुळे, वारकऱ्यांचा उत्साह आणि वारीच्या जल्लोषावर काही क्षणासाठी दु:खाचं सावट पसरल्याचं पाहायला मिळालं.  


श्री संत ज्ञानेश्वर महाराज पायीवारी पालखी सोहळ्यातील माळशिरस तालुक्यात माऊलींच्या पालखीचे पहिले गोल रिंगण पुरंदावडे सदाशिवनगर येथे होत असते. लाखो भाविक हा रिंगण सोहळ्यासाठी या गावी उपस्थित राहत असतात. विशेष म्हणजे काही दिवसांपूर्वीच माऊलींच्या पहिल्या रिंगण सोहळ्यासाठी पुरंदावडे गावच्या हद्दीतील रिंगण सोहळ्याचे मैदान मुरुम भरून मोठ्या रोलरने उत्कृष्टपणे तयार करण्यात आले होते. त्यानुसार , आज मोठ्या उत्साहात आणि भक्तीमय वातावरणात हा रिंगण सोहळा पार पडला. मात्र, या रिंगण सोहळ्यात झालेल्या दुर्दैवी अश्वांच्या अपघातात फोटोग्राफर्सचा जीव गेल्यामुळे सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे. 


दरम्यान, 17 जुलै रोजी आषाढी वारीचा उत्सव साजरा होत असून राज्याच्या कानाकोपऱ्यातून लाखो भाविक या एकादशीच्या सोहळ्यासाठी चंद्रभागेच्या तिरी विठु-रकुमाईच्या दर्शनाला येतात. त्यासाठी, सोलापूर जिल्हा प्रशासनाकडून तयारीही करण्यात येत आहे. तसेच, राज्य सरकारनेही जिल्हा प्रशासनाला महत्त्वाच्या सूचना दिल्या आहेत.


हेही वाचा


मुंबईत निकाल, परळीत गुलाल; निवडणूक जिंकल्यानंतर पंकजा मुंडेंची बोलकी प्रतिक्रिया, विजय केला समर्पित