Maharashtra Rain Update : गेल्या कित्येक दिवसांपासून दांडी मारून बसलेल्या वरुणराजाने अखेर विदर्भातील (Vidarbha Weather Update) काही जिल्ह्यांना अक्षरक्ष: झोडपून काढले आहे. नागपूर प्रादेशिक हवामान विभागानं (IMD) वर्तवविलेले अंदाजानुसार आजपासून पुढील पाच दिवस देखील विदर्भात मुसळधार पावसाचा (Heavy Rain)अंदाज आहे. तर मागील दोन दिवसांमध्ये भंडारा (Bhandara) जिल्ह्यात झालेल्या दमदार पावसामुळे (Heavy Rain) सर्वत्र जनजीवन विस्कळीत झाल्याचे बघायला मिळाले. अशातच या पावसाचा सर्वाधिक फटका शेतीला देखील बसला आहे.


पाण्याच्या प्रवाहातून नागरिकांचा जीवघेणा प्रवास 


तर दुसरीकडे भंडारा जिल्ह्यातील लाखांदूर ते पवनी या मार्गावरील जुनोना गावाला जोडणाऱ्या मार्गावरील रस्ता अक्षरशः पाण्यात वाहून गेला आहे. पवनी तालुक्यातील आसगाव परिसरातील जुनोना आणि परिसरातील पाच ते सहा गावांना जोडणाऱ्या मार्गावर लहान पुलं असल्यानं दरवर्षी पावसाळ्यात जोरदार पावसानंतर हा मार्ग बंद पडत होता. त्यामुळं सार्वजनिक बांधकाम विभागाच्या माध्यमातून इथं मोठ्या पुलाची निर्मिती करण्यात येत आहे. मात्र, काम संथगतीनं असल्यानं अद्यापही काम रखडलेलं आहे. अशात रहदारीसाठी तयार करण्यात आलेला रस्ता दोन दिवसात पडलेल्या जोरदार पावसाच्या प्रवाहात वाहून गेलाय. आज सकाळी रस्ता वाहून गेल्याची बाब नागरिकांच्या लक्षात आली. मात्र, नागरिकांना शेती कामाकरिता जाणं गरजेचं असल्यानं अनेकांनी या प्रवाहित पाण्यातून जीवघेणा प्रवास करून पैलतीर गाठलं आहे.


पुढील पाच दिवस विदर्भाला पावसाचा येलो अलर्ट


भारतीय हवामान खात्यानं विंदर्भातील बहुतांश जिल्ह्यात पुढील पाच दिवस पावसाचा अंदाज व्यक्त केला आहे. आज भंडारा, गोंदिया नागपूर, चंद्रपुर, गडचिरोलीला यलो अलर्ट तर उद्या 13 जुलैलीला  पुढील बुलढाणा, वाशिम अकोला वगळता उर्वरित विदर्भला पावसाचा यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. तसेच त्यानंतर पुढील तीन दिवस संपूर्ण विदर्भात पावसाचा यलो अलर्ट कायम असणार आहे. मागील दोन दिवसांपासून भंडारा जिल्ह्यात पावसानं जोरदार हजेरी लावलेली आहे. पुढील पाच दिवस कुठं हलक्या, कुठं मध्यम तर कुठं विजांच्या कडकडाटासह जोरदार पावसाची हजेरी राहणार असल्याचा अंदाज वर्तविण्यात आला आहे. असे असले तरी विदर्भात अद्याप दमदार पावसाची प्रतिक्षाच असल्याने बळीराजा मोठ्या चिंतेत अडकला आहे.


गोंदियात सलग दुसऱ्या दिवशी दमदार पावसाची हजेरी


गोंदिया जिल्ह्यात आज दुसऱ्या दिवशीही पावसानं जोरदार हजेरी लावलेली आहे. मागील काही दिवसांपासून दडी मारलेल्या पावसामुळं उकडा निर्माण झाला होता. मात्र, दुसऱ्या दिवशीही सुरू असलेल्या जोरदार पावसाच्या हजेरीनं जिल्ह्यातील वातावरणात गारवा निर्माण झालेला आहे. गोंदिया जिल्ह्यात सर्वच तालुक्यात पावसाच्या सरी बरसल्यात. या पावसामुळे शेतीच्या कामाला आता वेग येणार असल्याने बळीराजा आनंदी असल्याचे चित्र आहे.


इतर महत्त्वाच्या बातम्या