बीड : भाजपने विधानपरिषद निवडणुकांसाठी 5 उमेदवारांची यादी जाहीर केली, त्यामध्ये लोकसभा निवडणुकीतील भाजपच्या पराभूत उमेदवार पंकजा मुंडेंनाही (Pankaja Munde) उमेदवारी देण्यात आली आहे. त्यामुळे, पंकजा मुंडेंचा राजकीय वनवास संपुष्टात आला असून आज झालेल्या विधानपरिषद निवडणुकांत त्यांच्यावर विजयाचा गुलाल पडल आहे. संसदीय राजकारणात विजयाचा गुलाल पुन्हा उधळण्यासाठी पंकजा मुंडेंना तब्बल 10 वर्षांची वाट पाहावी लागली. यापूर्वी, 2019 च्या विधानसभा निवडणुकीत भाऊ धनंजय मुंडे यांच्याकडून पंकजा मुंडेंचा पराभव झाला होता. त्यानंतर, भाजपने (BJP) 2024 मध्ये त्यांना लोकसभेच्या मैदानात उतरवले. मात्र, तिथेही त्यांना पराभवाचा सामना करावा लागला. अखेर, विधानपरिषदेच्या (Vidhanparishad) निवडणुकीतून त्या पुन्हा एकदा विधिमंडळ सभागृहात पोहोचल्या आहेत.
पंकजा मुंडेंच्या विजयाचा मुंडे कुटुंबीयांसह मुंडे समर्थकांनाही अत्यानंद झाला आहे. मुंडे कुटुंब आज विधानपरिषदेच्या निकालावेळी सभागृहात दिसून आलं. यावेळी, प्रीतम मुंडेंच्या डोळ्यात आनंदाश्रू तरळल्याचं दिसून आलं. दुसरीकडे पंकजा मुंडेंच्या मूळगावी म्हणजे परळीतही मुंडे समर्थकांनी विजयाचा गुलाल उधळत जल्लोष केला. परळीतील यशश्री निवासस्थानी मुंडे समर्थकांनी पंकजा मुंडेच्या विजयानंतर घोषणाबाजी करत आनंद व्यक्त केला. तर, आपला विजय कार्यकर्त्यांना समर्पित करत असल्याचं पंकजा यांनी म्हटलं.
''काल-परवापासून माझे लोकं इथं येऊन थांबले आहेत. माझं सर्व राजकारण हे माझ्या या सर्व लोकांना समर्पित आहे, त्यांचा आज आनंद झालाय,'' असे म्हणत पंकजा मुंडेंनी आपला विजय त्यांच्या कार्यकर्त्यांना समर्पित केला आहे. तसेच, आज आनंद वाटतोय, मी जिथं जास्त परफॉर्म करु शकेल. पक्षासाठी जास्त काही करु शकेन. आता, राज्यात काम करण्याची संधी मिळाली आहे, या निवडणुकीत ज्यांनी मदत केली त्या सर्वांचे आभार मानते, असे पंकजा मुंडेंनी विजयानंतर प्रतिक्रिया देताना म्हटले.
परळीत यशश्री निवासस्थानी जल्लोष
पंकजा मुंडे यांच्या विजयानंतर बीडच्या परळी येथील यशश्री निवासस्थानी मुंडे समर्थकांनी जल्लोष केला आहे. परळीतील पंकजा मुंडे यांच्या यशश्री निवासस्थानी कार्यकर्त्यांचा उत्साह दिसून आला. गुलाल आणि फटाक्यांची आतिषबाजी करत मुंडे समर्थक आनंद व्यक्त करत आहेत. गेल्या 5 वर्षांपासून पंकजा मुंडे यांचं राजकीय पुनर्वसन करावे अशी मागणी मुंडे समर्थकांमधून होत होती. अखेर आज विधानपरिषदेवर पंकजा मुंडे निवडून आल्यामुळे कार्यकर्त्यांची इच्छा पूर्ण झाली आहे. गेल्याच महिन्यात लोकसभा निवडणुकीत पंकजा यांचा पराभव झाला होता, त्यानंतर महिनाभरातच पंकजा मुंडेंच्या गळ्यात विजयाची माळ पडली.
बुलडाण्यात जल्लोष
भाजपा नेत्या पंकजा मुंडे यांचा विधान परिषद निवडणुकीत विजय झाल्यामुळे बुलढाणा जिल्ह्यातील देऊळगावराजा येथे पंकजा मुंडे समर्थकांनी जल्लोष केला. यावेळी समर्थकांनी फटाके फोडून मिठाई वाटून पंकजा मुंडे यांच्या समर्थनार्थ घोषणाबाजी देखील केली.
नारायण फुकेंच्या घरासमोर कार्यकर्त्यांचा जल्लोष
नागपुरात परिणय फुके यांच्या घरासमोर कार्यकर्त्यांनी जल्लोष केला आहे. विधानपरिषद निवडणुकीमध्ये परिणय फुके यांचा विजय झाल्याचे समजताच कार्यकर्त्यांनी जल्लोष सुरू केला. विधान परिषदेच्या निवडणुकीत भंडारा-गोंदियाचे माजी पालकमंत्री डॉ. परिणय फुके यांनी 26 मतं घेत विजय मिळविला. त्यानंतर, भाजप पदाधिकाऱ्यांनी भंडाऱ्यात विजयाचा जल्लोष केला. भंडारा शहरातील गांधी चौकात भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी ढोल ताशांचा गजर आणि फटाक्यांची आतषबाजी करीत एकमेकांना पेढा भरवून फुके यांच्या विजयाचा जल्लोष केला.
परभणीत राजेश विटेकरांच्या समर्थकांचा जल्लोष
विधानपरिषद निवडणुकीत अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे उमेदवार राजेश विटेकर यांचा विजय झाल्यानंतर, राजेश विटेकर यांच्या सोनपेठ येथे कार्यकर्त्यांकडून फटाके फोडत गुलाल उधळत जल्लोष साजरा करण्यात आला. दरम्यान, राजेश विटेकर यांचे कुटुंबीय मुंबई येथे आहे. मात्र, कार्यकर्त्यांकडून विजयाचा जल्लोष साजरा करण्यात आला.
पिंपरी चिंचवडमध्ये जल्लोष
विधान परिषदेच्या निवडणुकीत भाजपचे उमेदवार अमित गोरखेंची आमदारपदी वर्णी लागली. गोरखेंच्या या विजयाचा आनंदोत्सव पिंपरी चिंचवडमध्ये साजरा झाल्याचं पाहायला मिळालं. फटाके फोडत उपस्थितांना गोरखे समर्थकांनी पेढे भरवले आहे.