कोल्हापूर : औषधोपचाराचा खर्च परवडत नसल्याने वडिलांनी मुलाला नदीत फेकल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. कोल्हापूरच्या हातकणंगले तालुक्यातील कबनूर येथे ही धक्कादायक घटना घडली आहे. आरोपी बापानं मुलाला फेकलेल्या कृत्याची कबुली इचलकरंजी पोलिसांसमोर दिली आहे.


घरातील किरकोळ वाद आणि औषधांचा खर्च परवडत नाही म्हणून सिकंदर मुल्ला या निर्दयी बापानं अफान मुल्ला या पाच वर्षाच्या मुलाला थेट पंचगंगा नदीच्या पात्रात फेकून दिलं. या घटनेने परिसरात हळहळ व्यक्त केली जातेय, तर दुसऱ्या बाजूला सिकंदरला कठोर शिक्षा होण्याची मागणी होत आहे. सिकंदर हा अपंग आहे. गेल्या काही महिन्यापासून त्यांच्या घरात वाद सुरु होते. दारूच्या नशेत तो अनेक वेळा घराबाहेरच असतो. अफान याला  फिट येण्याचा आजार, त्यात आर्थिक परिस्थिती हलाखीची असल्याने औषधोपचाराच्या खर्चाचे कारणावरूनही घरात सतत वाद होत असत. दोन दिवसांपूर्वी देखील औषध खर्चावरून घरात वाद झाला आणि पुढे हे घडलं.


रात्री घरी आल्यानंतर त्याने मुलाला पंचगंगा नदीत फेकल्याची माहिती नातेवाईकांना दिली. काही वेळात नातेवाईक आणि नागरिकांनाही त्याच्या बोलण्यावर विश्वास बसला नाही. मात्र त्याला शिवाजीनगर पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आणि कसून चौकशी करता त्याने अफान यास पंचगंगा नदीवरील मोठ्या पुलावरून फेकून दिल्याचे सांगितले. रात्री उशिरापर्यंत अफान याचा शोध घेण्याची मोहीम सुरू होती. आज पहाटेपासून पुन्हा त्याचा शोध घेण्यात येतोय.


अफान आणि त्याच्या वडिलाचा एकमेकांवर खूप जीव होता. अफान सिकंदर शिवाय राहत नव्हता. त्यामुळे खरंच अफानला नदीत फेकलं आहे का? की उगाचच फेकल्याचं सिकंदर सांगत आहे याचा पोलीस आता शोध घेत आहेत.


इतर संबंधित बातम्या


Nagpur : सिगारेटच्या तुकड्यावरुन आरोपीचा माग; पत्नीच्या हत्येबद्दल पतीला जन्मठेप


विरारमध्ये राहत्या घरात पतीने केली पत्नीची हत्या, हत्या करुन पती फरार