नवी दिल्ली : राज्यातल्या सत्तासंघर्षावरुन सध्या सर्वोच्च न्यायालयात रणकंदन सुरु असून आजची सुनावणी संपली आहे. उद्या या सुनावणीचा शेवटचा दिवस आहे. दोन्ही बाजूंकडून जोरदार युक्तीवाद करण्यात येत असून उद्या पुन्हा शिंदे गटाच्या वतीनं नीरज किशन कौल युक्तीवाद करणार आहेत. शिवसेनेच्या 39 आमदारांसोबत आता मविआच्या 16 आमदारांचाही ठाकरे सरकारवर विश्वास नव्हता असा युक्तीवाद आज शिंदे गटाचे वकील नीरज किशन कौल यांनी केला. ही सुनावणी याच आठवड्यात संपवणार असल्याचं सर्वोच्च न्यायालयानं स्पष्ट केलं आहे.
आज शिंदे गटाच्या वतीनं युक्तीवाद करताना नीरज किशन कौल यांनी न्यायालयाला सांगितलं की, नवीन सरकार स्थापन करण्यामागे केवळ शिवसेना विधीमंडळ पक्ष नाही तर राजकीय पक्षही सामिल होता. मविआ सरकारमधून जरी 39 आमदार बाहेर पडले नसते किंवा ते अपात्र ठरले असते तरी ते सरकार कोसळलं असतं.
महाविकास आघाडीचे 16 आमदार गैरहजर, शिंदे सरकारच्या पथ्यावर पडणार का?
विधानसभा अध्यक्षपदाच्या निवडीवेळी, म्हणजे राहुल नार्वेकर यांच्या निवडीवेळी मतदान घेण्यात आलं होतं, त्यावेळी महाविकास आघाडीचे 16 आमदार गैरहजर होते. नेमक्या याच गोष्टीचा संदर्भ घेत नीरज किशन कौल यांनी आज युक्तीवाद केला. ते म्हणाले की, शिवसेनेचे 39 आमदार बाहेर पडले नसते, किंवा ते अपात्र जरी ठरले असते तरीही ते सरकार पडलं असतं. कारण अध्यक्षपदाच्या निवडीवेळी महाविकास आघाडीचे 16 आमदार गैरहजर होते. या लोकांचं मत ठाकरे सरकारला नव्हतं, कारण त्यांनाही सरकारवर विश्वास नव्हता, सरकारने त्यांचा विश्वास गमावला होता.
सरन्यायाधीश काय म्हणाले?
दहाव्या सुचीनुसार विचार केला तर तुम्ही जरी म्हणत असाल की आम्हीच शिवसेना आहोत, तरी दोन गट तर आहेतच, फुट पडल्यावर दरवेळी पक्ष सोडलाच जातो असा नाही असं सरन्यायाधीशांनी नीरज किशन कौल यांना सांगितलं. दोन्ही गट पक्षातच असले तरी दहावी सूची लागू होईलच, कोणत्या गटाकडे बहुमत आहे याने दहाव्या सूचीच्या तरतुदींवर परिणाम होत नाही असंही ते म्हणाले. देवेंद्र फडणवीस राज्यपालांना भेटले आणि त्यानंतरच ठाकरे सरकारवर विश्वास दर्शक ठराव मांडण्याचे निर्देश दिले असं न्यायालयानं म्हटलं. तसेच नंतर सरकार स्थापन करण्यासाठी एकनाथ शिंदे यांनाच का बोलावलं असा सवालही न्यायालयाने विचारला.
उद्या या सुनावणीचा शेवटचा दिवस असून तुषार मेहता राज्यपालांच्या वतीनं युक्तीवाद करतील. त्यानंतर नीरज किशन कौल 45 मिनीटे युक्तीवाद करतील. त्यानंतर कपिल सिब्बल आणि अभिषेक मनू सिंघवी युक्तीवाद करतील.
नीरज किशन कौल यांचा युक्तीवाद काय?
3 जुलै 2022 रोजी बारा वाजता राहुल नार्वेकर यांची अध्यक्षपदी निवड झाली. निवड झाल्यानंतर 12 वाजून 2 मिनिटांनी नार्वेकरांना पदावरुन हटवण्याची नोटीस विरोधकांकडून देण्यात आली. त्याच दिवशी पुन्हा एकदा 39 आमदारांच्या अपात्रतेबाबत नोटीस देण्यात आली. 3 जुलैलाच भरत गोगावले आणि शिंदे यांच्या नेमणुकीला नार्वेकरांनी मान्यता दिली. 4 जुलै 2022 रोजी नार्वेकरांवर सदनातर्फे पूर्ण विश्वास दाखवला गेला. चार तारखेलाच सदनात शिंदेंनी बहुमत चाचणीत बहुमत सिद्ध केले. 164 विरुद्ध 99 अशा आकडेवारीसह बहुमत सिद्ध झाले.
30 जूनला ठाकरे गटाने निवडणूक आयोगाला पत्र पाठवलं आणि पक्षातीला बदलांबाबत माहिती दिली, शिंदेंना हटवल्याची माहिती आयोगाकडे दिली गेली. त्यांना पक्षातून हटवलं नाही तर विधानसभेच्या नेतेपदावरुन हटवण्यात आलं. पुन्हा 3 तारखेला ठाकरे गटाचे प्रतोद प्रभूंकडून व्हिप जारी करण्यात आला. बहुमत चाचणी आणि अध्यक्ष निवडीबाबत व्हिप जारी केला. मात्र त्यांना तो अधिकारच नव्हता, असे नीरज किशन कौल म्हणाले.
ही बातमी वाचा :