Pune Temperature : पुण्यात (Pune) फेब्रुवारीमध्ये 147 वर्षांतील सर्वाधिक तापमानाची नोंद झाली आहे. मागील काही दिवसांपासून (Pune Temperature) सकाळी थंडी आणि दुपारी कडाक्याचं ऊन असं वातावरण आहे. त्यामुळे पुणेकरांनी चांगलीच दमछाक होत आहे. यामुळे अनेक पुणेकरांना ताप, सर्दी, खोकल्याचा त्रास होत आहे. त्यामुळे निम्मे पुणेकर काही प्रमाणात आजारी असल्याचं दिसून आलं आहे. त्यात पुण्यात उन्हाचं प्रमाणही चांगलंच वाढलं आहे.
भारतीय हवामानशास्त्र विभागाने (IMD) दिलेल्या माहितीनुसार, पुण्यात फेब्रुवारीमध्ये 147 वर्षांतील सर्वाधिक तापमान नोंदवलं गेलं. येत्या काळात उष्णतेची लाट येण्याची शक्यता आहे. येत्या काही दिवसांत शहराचे तापमान 38 अंश सेल्सिअसपर्यंत वाढण्याची शक्यता आहे, असं आयएमडी अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे. देशाच्या उत्तरेकडील भागातून उष्ण वारे महाराष्ट्राच्या दिशेने वाहताना वाऱ्याची दिशा बदलल्याने तापमानात अचानक वाढ झाली आहे.
नागरिकांनी कोणती काळजी घ्यावी?
IMD अधिकार्यांनी लोकांना उष्माघात आणि इतर उष्णतेशी संबंधित आजार टाळण्यासाठी आवश्यक खबरदारी घेण्याचा सल्ला दिला आहे. वृद्ध आणि मुले विशेषतः उष्णतेशी संबंधित आजारांना बळी पडतात आणि दिवसाच्या सर्वात उष्ण भागात बाहेर जाणे टाळावे. लोकांनीही भरपूर पाणी प्यावे आणि शक्यतो थंड, सावलीच्या ठिकाणी राहावे. उष्णतेच्या लाटेत पिकांची आणि जनावरांची काळजी घेण्याचे आवाहन करुन आयएमडीने शेतकऱ्यांना इशाराही दिला आहे. त्यांनी शेतकर्यांना दिवसाच्या उष्णतेच्या काळात त्यांच्या शेतात काम करणे टाळावे आणि त्यांच्या जनावरांना पुरेसे पाणी आणि सावली मिळेल याची खात्री करावी असा सल्ला दिला आहे.
तापमानात झालेली ही अचानक वाढ केवळ पुण्यापुरती मर्यादित नाही. कारण महाराष्ट्राच्या अनेक भागांमध्ये उष्णतेची लाट आली आहे. या उष्णतेच्या लाटेत आरोग्याशी संबंधित कोणत्याही समस्या टाळण्यासाठी लोकांनी आवश्यक ती खबरदारी घेणे महत्त्वाचे आहे. IMD ने लोकांना हवामानाच्या परिस्थितीबद्दल माहिती ठेवण्याचा आणि सुरक्षित राहण्यासाठी अधिकाऱ्यांनी जारी केलेल्या मार्गदर्शक तत्त्वांचे पालन करण्याचा सल्ला दिला आहे.
पुण्यात सर्दी, खोकल्याचे रुग्ण वाढले
पुण्यात सध्या वातावरणात सातत्याने बदल होत आहे. याचा परिणाम अनेकांच्या आरोग्यावर होत आहे. अनेकांना ताप, सर्दी आणि खोकल्याच्या समस्या जाणवत आहेत. मात्र खोकला फार काळ टिकत असल्याने नागरिक त्रस्त झाले आहेत. शिवाय लहान मुलांनाही खोकल्याचा त्रास होत असल्याने पालकही त्रस्त झाले आहे. या सगळ्यांच नीट निरीक्षण करा आणि तातडीने डॉक्टरांचा सल्ला घेण्याचं आवाहन करण्यात येत आहे. कोणताही ताप दोन ते तीन दिवसांपेक्षा जास्त वेळ असेल, बाळाला श्वासोच्छवास घेण्यास त्रास होत असेल, तीव्र सर्दी खोकला असेल आणि घरातील इतर लोक आजारी असतील तर त्वरीत डॉक्टरांचा सल्ला घेणं आवश्यक आहे, असंही डॉक्टरांनी सांगितलं.