Abdul Sattar On Sanjay Raut: विधीमंडळ हे तर 'चोर'मंडळ आहे, असं वक्तव्य ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी केल्याने याचे पडसाद आता विधीमंडळात उमटताना पाहायला मिळत आहे. दरम्यान राऊत यांच्या वादग्रस्त विधानानंतर भाजप आणि शिवसेना गटाच्या आमदारांनी आक्रमक भूमिका घेतली आहेत. तर संजय राऊत यांच्यावर गुन्हा दाखल करुन, त्यांना अटक करण्याची मागणी शिंदे गटाचे नेते तथा कृषिमंत्री अब्दुल सत्तार (Abdul Sattar) यांनी केली आहे. 'एबीपी माझा'ला प्रतिक्रिया देताना सत्तार यांनी ही मागणी केली आहे. 


संजय राऊत यांच्यावर हक्कभंग आणण्याची मागणी


संजय राऊत यांच्या वक्तव्यानंतर शिवसेना गट आणि भाजपच्या (BJP) आमदारांनी आक्रमक भूमिका घेतली आहे. राऊतांच्या वक्तव्यावरुन अर्थसंकल्पीय अधिवेशनात (Maharashtra Budget Session) गदारोळ सुरु आहे. राऊत यांच्या वादग्रस्त विधानानंतर भाजप आणि शिवसेना गटाचे आमदार आक्रमक झाले असून, हक्कभंगाची कारवाई करण्याची मागणी केली आहे. त्यामुळे विधीमंडळात सुरु असलेल्या गोंधळानंतर सभागृह आज दिवसभरासाठी स्थगित करण्यात आले आहे. तर अब्दुल सत्तार यांनी संजय राऊत यांच्यावर गुन्हा दाखल करून, त्यांना अटक करण्याची मागणी केली आहे. 


काय म्हणाले होते संजय राऊत? 


संसदेत पक्षनेतेपदावरुन काढून टाकण्यासंदर्भात प्रश्न विचारल्यावर बोलताना संजय राऊत म्हणाले की, "टाकू द्या. बनावट शिवसेना आहे, डुप्लिकेट. चोरांचं मंडळ... विधीमंडळ नाही 'चोर'मंडळ आहे. त्यांनी आम्हाला पदावरुन काढलं तरी आम्ही पक्ष सोडणार नाही. अशी अनेक पदं आम्हाला पक्षाने, बाळासाहेब ठाकरे आणि उद्धव ठाकरेंनी दिली. जी आम्ही ओवाळून टाकतो पक्षासाठी. आम्ही लफंगे नाही. पदं गेली तरी परत येतील, आमचा पक्ष महत्त्वाचा आहे." 


भाजप-शिंदे गट आक्रमक! 


दरम्यान संजय राऊतांच्या या वक्तव्यावरुन राजकीय वातावरण तापले आहे. तर भाजप आणि शिंदे गटाच्या आमदारांनी आक्रमक भूमिका घेतली आहे. संजय राऊत यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची मागणी केली जात आहे. तर विधीमंडळ परिसरात शिंदे गटाच्या आमदारांकडून निदर्शने केले जात आहे. यावेळी संजय राऊत यांच्याविरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात येत आहे. त्यामुळे विधीमंडळ परिसरात सध्या गोंधळाचे वातावरण आहे. तर भाजप आणि शिंदे गटाचे आमदार एकत्रित येऊन राऊत यांच्यावर कारवाई करण्याची मागणी करत घोषणा देत आहे. 


इतर महत्वाच्या बातम्या: 


संजय राऊतांनी 'चोर'मंडळ म्हणताच सभागृहात हक्कभंग आणण्याची मागणी; भरत गोगावलेंकडून राऊतांना अपशब्द