मुंबई : शिवसेना भवन येथे ठाकरे गटाच्या राज्यातील सर्व जिल्हाप्रमुख, संपर्कप्रमुखांची बैठक पार पडली. या बैठकीमध्ये ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray ) यांनी जिल्हाप्रमुखांना संबोधित करताना सत्तासंघर्षाच्या संदर्भातील सर्वोच्च न्यायालयाच्या निकालाची प्रत देऊन या निकालातील महत्त्वाचे मुद्दे तळागाळातील कार्यकर्त्यांपर्यंत पोहोचवून संभ्रम दूर करण्याच्या सूचना केल्या आहेत. मुंबई महापालिकेसह राज्यभरातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या  निवडणुका कधीही जाहीर होऊ शकतात त्यामुळे तयार रहा, गाफील राहू नका, असे आदेश पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांनी या बैठकीत दिले आहेत.


सेना भवन येथील बैठकीत सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर निर्माण झालेले जिल्हाप्रमुखांच्या मनातील संभ्रम दूर करण्यात आले असून आता राज्यभरातील कार्यकर्त्यांच्या मनातील संभ्रम दूर करण्याची जबाबदारी या जिल्हाप्रमुखांकडे असणार आहे. तर 18 जून रोजी मुंबईतील वरळी एनएससीआय डोम येथे भव्य पदाधिकारी मेळावा ठाकरे गटाकडून आयोजित करण्यात आला आहे. 19 जून रोजी षण्मुखानंद सभागृहात दरवर्षीप्रमाणे यावर्षीसुद्धा शिवसेनेचा वर्धापन दिन मोठ्या उत्साहात साजरा केला जाणार आहे. 


शिवसेना पदाधिकाऱ्यांचा 18 जून रोजी भव्य मेळावा मुंबईत होणार आहे. तर 19 जून शिवसेनेचा वर्धापन दिन हा आनंदोत्सव साजरा केला जाणार. शिवसेना भवन येथे झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. सत्तासंघर्षाच्या निकालानंतर शिवसेना शिंदे गट आणि भाजप हे निकालावरून संभ्रम निर्माण करत असल्याचं ठाकरे गटाच्या बैठकीत सांगण्यात आले. त्यामुळे या निर्णयातील आपल्या बाजूने असलेले सकारात्मक मुद्दे जनसामान्यांपर्यंत पोहोचवण्याच्या कामाची जबाबदारी या जिल्हाप्रमुखांकडे असेल. जिल्हा प्रमुखांच्या शंकांचं निरसन आणि प्रश्नांची उत्तर सुद्धा या बैठकीत देण्यात आली. 


कर्नाटकात काँग्रेसचा दणदणीत विजय मिळाल्यानंतर, इकडे महाराष्ट्रातही महाविकास आघाडीला उभारीची आशा निर्माण झालीय. त्यासाठी महाविकास आघाडीने कंबर कसायला सुरूवात केलीय. त्याचाच भाग म्हणून, रविवारी महाविकास आघाडीची सिल्वर ओक निवासस्थानी बैठक पार पडली आणि या बैठकीमध्ये आगामी लोकसभा निवडणुकांमध्ये एकत्रित सामोरे जाण्याचा निर्णय करण्यात आल्याचं कळतंय. 


एबीपी माझाला मिळालेल्या माहितीनुसार सध्या राज्यात काँग्रेसचा एक, राष्ट्रवादीचे चार तर शिवसेनेचे पाच खासदार आहेत. त्यामुळे ठाकरे गट आणि राष्ट्रवादीचा आपल्या पदरात जास्त जागा पाडून घेण्याचा प्रयत्न असल्याचं कळतंय. त्याचसोबत, काँग्रेस समसमान जागावाटपाठी आग्रही असल्याचं सूत्रांनी सांगितलंय.