Chhatrapati Sambhaji Nagar News : छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेच्या (Chhatrapati Sambhaji Nagar Municipal Corporation) आयुक्त पदाचे सूत्र हाती घेताच जी श्रीकांत यांनी वेगवेगळ्या उपाययोजना राबवण्यास सुरुवात केली आहे. दरम्यान शहरातील कचरा संकलित करणाऱ्या घंटागाडीबाबत देखील त्यांनी आता महत्वाचा निर्णय घेतला आहे. घंटागाडी घराजवळ आलेली आहे किंवा तुमच्या घरातून किती अंतरावर आहे हे ट्रॅक करण्यासाठी एक ॲप्लिकेशन तयार करण्याची सूचना जी श्रीकांत यांनी दिल्या आहेत. मंगळवारी (16 मे) त्यांनी पडेगाव येथील कचरा प्रक्रिया केंद्राची पाहणी केली या निमित्त त्याच ठिकाणी घेण्यात आलेल्या एका बैठकीत ते बोलत होते. 


घंटागाडीवर गाणे वाजवणे किंवा शिट्टी वाजवण्याऐवजी अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करुन एक अॅप्लिकेशन तयार करावे, जेणेकरुन नागरिकांनी ते ॲप डाऊनलोड केल्यावर घंटागाडी त्यांच्या घराच्या किती जवळ आलेली आहे, किती अंतरावर आहे, तसेच घंटागाडी आपल्या घरापर्यंत पोहोचण्यासाठी किती वेळ आहे आणि घंटागाडी आपल्या घरातून किती मीटरच्या अंतरावर आहे हे कळेल. 


फोन करताच घंटागाडी घरासमोर 


तसेच ज्या कुटुंबात सगळे सदस्य नोकरी किंवा कामावर जातात. घंटागाडीत त्यांना कचरा टाकता आला नाही त्यांच्यासाठी टू व्हीलरवर कचरा संकलन करुन तो कचरा ट्रान्सफर स्टेशनपर्यंत पोहोचवण्यासाठी प्रशिक्षण करावे अशी संकल्पना त्यांनी यावेळी मांडली. तसेच या सेवासाठी शुल्क आकारण्यात यावे अशी सूचना त्यांनी यावेळी केली. याशिवाय त्यांनी घनकचरा व्यवस्थापन विभागाच्या कामाच्या आढावा घेतला आणि कचरा संकलन तसेच वाहतुकीबाबत माहिती घेतली. 


दरम्यान कचरा प्रक्रिया केंद्राची पाहणी करताना ते म्हणाले की, "हा परिसर स्वच्छ असावा जेणेकरुन इकडे काम करणारे कर्मचारी आणि कचरावेचकांची काम करण्याची इच्छा देखील वाढेल. यावेळी उपआयुक्त तथा घनकचरा व्यवस्थापन कक्ष प्रमुख सोमनाथ जाधव, आपत्ती व्यवस्थापन कक्ष प्रमुख स्वप्नील सरदार, उपअभियंता यांत्रिकी अमोल कुलकर्णी, माहिती व जनसंपर्क अधिकारी तौसीफ अहमद, वॉर्ड अधिकारी संजय सुरडकर, असदउल्ला खान, गिरी आणि इतर स्वच्छता निरीक्षक आदींची उपस्थिती होती.


नवनवे उपक्रम राबवण्यास सुरुवात 


महापालिकेचे प्रशासक जी. श्रीकांत यांनी पदभार स्वीकारल्यापासून नवनवे उपक्रम राबवण्यास सुरुवात केली आहे. यात प्रामुख्याने त्यांनी नागरी सोयीसुविधांवर लक्ष केंद्रित केले आहे. आतापर्यंत नागरिकांसाठी 9 झोन कार्यालयांमध्ये जनता दरबार, नागरी समस्या अडचणींसाठी व्हॉट्सअॅप क्रमांक, फोनवर संपर्क साधून तक्रार देण्याची सुविधा त्यांनी सुरु करण्याचे आदेश मनपाच्या विविध विभागांना दिले आहेत. त्यानुसार सेवा सुरु देखील करण्यात आली आहे. यानंतर आता शहरातील घनकचरा संकलनाकडे प्रशासकांनी लक्ष केंद्रित केले आहे. मंगळवारी त्यांनी पडेगाव भागातील मनपाच्या कचरा संकलन डेपोला भेट देऊन तेथे होत असलेल्या प्रक्रियेची पाहणी केली.


इतर महत्वाच्या बातम्या: 


...तोपर्यंत छत्रपती संभाजीनगर नव्हे औरंगाबादच; जिल्हाधिकाऱ्यांनी काढला आदेश