मुंबई : मुंबई काँग्रेसच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या राजीव गांधी सद्भावना दिवस कार्यक्रमात आज वेगळंच चित्र पाहायला मिळालं. या कार्यक्रमात आलेल्या उद्धव ठाकरे आणि संजय राऊतांच्या गळ्यात काँग्रेसचे उपरणं असल्याचं दिसलं. काही वेळाने उद्धव ठाकरेंनी गळ्यातील उपरणं बाजूला काढलं आणि स्पष्टीकरणही दिलं. काँग्रेसचे उपरणं गळ्यात घातल्याचा माझा फोटो येईल, त्यासाठीच मी ते घातलेलं असं उद्धव ठाकरे म्हणाले. 


नेमकं काय घडलं? 


काँग्रेसच्या आजच्या सद्भावना दिवस कार्यक्रमात उद्धव ठाकरे आणि संजय राऊत यांनी उपस्थिती लावली. त्यावेळी काँग्रेस नेत्यांनी उद्धव ठाकरेंच्या गळ्यात काँग्रेस पक्षाचे उपरणं घातलं. काही वेळ ते उपरणं उद्धव ठाकरेंनी तसंच ठेवलं. पण नंतर शरद पवारही त्या कार्यक्रमात आले. सुरूवातीला शरद पवारांनी काँग्रेसचे उपरणे घालण्यास नकार दिला. त्यानंतर उद्धव ठाकरेंनीही त्यांच्या गळ्यातील उपरणं काढलं आणि बाजूला ठेवलं. 


त्यावेळी काँग्रेसचे आमदार भाई जगतापांनी ते उपरणं गळ्यातच ठेवावं असा आग्रह उद्धव ठाकरेंना केला. मात्र उद्धव ठाकरे यांनी हसत हसत त्याला नकार दिला. मात्र संजय राऊतांनी त्यांच्या गळ्यातील उपरणं कायम ठेवलं.  काही वेळाने शरद पवारांनीही काँग्रेस पक्षाचं उपरणं गळ्यात घातलं. 


फोटो यावा यासाठी जाणूनबूजून उपरणं घातलं


उद्धव ठाकरे ज्यावेळी भाषणासाठी उभे राहिले त्यावेळी त्यांनी यावर भाष्य केलं. ते म्हणाले की, काँग्रेसच्या कार्यक्रमाला असल्याने मी गळ्यात गमछा घातला. तुमचा आदर ठेवला, मान ठेवला. पण उद्या याचा नक्की फोटो येणार. तो फोटो यावा यासाठीच मी काँग्रेसचे गमछा गळ्यात घातला होता. मी इकडे तिकडे काय करतो त्यांच्याकडे त्यांचं जास्त लक्ष असतं. कारण समोरच्यांचं काही कर्तृत्व नाही. दाखवा काय दाखवायचं ते.