नवी दिल्ली: जेव्हा एखादी संवेदनशील घटना घडते तेव्हा मोठ्या नेत्यांनी राजकीय न वागता स्टेटसमन सारखे वागले पाहिजे. मात्र, उद्धव ठाकरे आणि सुप्रिया सुळे यांना जनतेशी काहीही देणेघेणे नाही. ते केवळ आपली राजकीय पोळी भाजून घेण्याचा प्रयत्न करत आहेत, अशी टीका राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली. बदलापूरच्या शाळेत लहान मुलीवर झालेली अत्याचाराची घटना ही मन हेलावून टाकणारी आहे. मात्र, याप्रकरणात दोषींना कठोर शासन करण्यासाठी राज्य सरकार आणि पोलीस यंत्रणा अत्यंत वेगाने आणि शक्य ते सर्व प्रयत्न करत असल्याची ग्वाही देवेंद्र फडणवीस यांनी दिली. ते मंगळवारी दिल्लीत प्रसारमाध्यमांशी बोलत होते.


यावेळी देवेंद्र फडणवीस यांनी बदलापूर लैंगिक अत्याचार (Badlapur School sexual assault) प्रकरणावरुन राज्य सरकारला कोंडीत पकडण्याचा प्रयत्न करणाऱ्या विरोधकांना खडे बोल सुनावले. मला एका गोष्टीचं दुर्दैवी वाटतं की, विरोधी पक्ष केवळ राजकीय पोळी भाजण्याचा प्रयत्न  करतात. राज्यातील विरोधी पक्ष संवेदनाहीन आहे. अशा घटना घडतात तेव्हा राजकारण करायचे नसते. मन विरोधकांच्या मनात केवळ राजकारण आहे. उद्धव ठाकरे यांच्यासारखी व्यक्ती राज्याचा मुख्यमंत्री राहिली आहे. त्यांच्यासारख्या व्यक्तीने इतक्या खालच्या थराला जाऊन राजकारण करणे शोभत नाही. अशाप्रकारच्या अशाप्रकारच्या संवेदनशील घटना घडतात तेव्हा मोठ्या नेत्यांनी राजकीय न वागता स्टेटसमन सारखं वागलं पाहिजे. जनतेला काय दिलासा देता येईल, पीडितांना न्याय कसा मिळवून देता येईल, यादृष्टीने सूचना करायच्या असतात. पण सुप्रिया सुळे आणि उद्धव ठाकरे यांना केवळ राजकारण करायचे आहे. त्यांना जनतेशी काहीही देणंघेणं नाही, असे देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले.


राज्य सरकार आणि पोलिसांकडून वेगाने हालचाली: देवेंद्र फडणवीस


बदलापूर लैंगिक अत्याचार प्रकरणाच्या चौकशीसाठी आयजी दर्जाच्या अधिकारी आरती सिंग यांची नियुक्ती करण्यात आली आहे. एखाद्या महिला आयपीएस अधिकाऱ्याच्या नेतृत्त्वात चौकशी व्हावी, अशी भावना आहे. इतर कारवाईही तातडीने करण्यात आली आहे. पोलीस आणि राज्य सरकारकडून याप्रकरणात तात्काळ आरोपपत्र दाखल करण्यासाठी प्रयत्न सुरु आहेत. याशिवाय, फास्ट ट्रॅक कोर्ट स्थापन करण्याचे प्रयत्न सुरु आहेत. नराधमांना तात्काळ शिक्षा व्हावी, यासाठी राज्य सरकार आणि पोलीस विभाग प्रयत्नशील आहे. या कारवाईची वेगाने सुरुवात झाली आहे, अशी माहिती देवेंद्र फडणवीस यांनी दिली.


आंदोलकांचा जमाव स्वयंस्फुर्तीने आला की कोणाच्या सांगण्यावरुन, देवेंद्र फडणवीस म्हणाले...


बदलापूर प्रकरणातील आंदोलकांचा जमाव हा स्वयंस्फुर्तीने आला आहे का, असा प्रश्न देवेंद्र फडणवीस यांना विचारण्यात आला. यावर त्यांनी म्हटले की, हा जमाव स्वयंस्फुर्तीने आला किंवा नाही, याबाबत मी आता काही बोलणार नाही. आंदोलक आरोपीला फाशी देण्याची मागणी करत आहेत. मात्र, राज्य सरकार कायदेशीरदृष्ट्या जे-जे शक्य आहे, ते सर्व करत आहे. यासंदर्भात ज्या संवेदनशीलपणे कारवाईची गरज आहे, ते पोलीस करत आहेत. ही घटना 13 ऑगस्टला उघडकीस आली. त्यानंतर तात्काळ कारवाई झाली. मात्र, त्यानंतर कोणी दिरंगाई किंवा लपवाछपवी केली आहे का, याचा तपास एसआयटी पथक करेल. दोषी अधिकाऱ्यांवर अत्यंत कठोर कारवाई करण्यात येईल. ही चौकशी वेगाने होईल, कारण आम्हाला लगेच कोर्टात आरोपपत्र दाखल करायचे आहे, असे देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले. 


आणखी वाचा


नराधमानं कोवळ्या जीवांना ओरबाडलं, बदलापूर हादरलं, अत्याचाराची A टू Z कहाणी!