Badlapur Case : बदलापूर : बदलापूर पूर्व मधील एका नामांकित शाळेत दोन चिमुरड्यांवर झालेल्या लैंगिक अत्याचार प्रकरणानं आज अख्खा महाराष्ट्र हादरला. अगदी अजाणत्या वयातच दोन चिमुकल्यांना सोसाव्या लागलेल्या या वेदनांमुळे आज बदलापुरातील प्रत्येकजण हळहळला आणि चिमुरड्यांना न्याय मिळवून देण्यासाठी रस्त्यावर उतरला. बदलापूरकरांनी प्रशासनाला धारेवर धरलं आणि चिमुकल्यांवर अत्याचार करणाऱ्या क्रूर नराधमाला फासावर लटकवा असा एकच सूर लावून धरला. याप्रकरणी मुख्यमंत्र्यांनी खटला फास्ट ट्रॅकवर चालवण्याचं आश्वासन दिलं असून आरोपीला कठोरात कठोर शिक्षा दिली जाईल, असंही सांगितलं आहे. तरीदेखील बदलापूरकरांचा रोष काही कमी होण्याचं नाव घेत नाही. शाळेबाहेर नागरिकांनी आंदोलन केलंच, पण बदलापूरकरांनी रेल रोकोही केला. बदलापूर स्थानकाच्या ट्रॅकवर उतरून नागरिकांनी आपला रोष व्यक्त केला. आज रस्त्यावर उतरलेला, रेल रोको केलेला प्रत्येक बदलापूरकर चिमुकल्यांसाठी न्याय मागतोय. जाणून घेऊयात प्रकरण नेमकं काय? 


बदलापूर पूर्व येथील एका नामांकित शाळेत दोन चिमूरड्यांवर झालेल्या लैंगिक अत्याचार झाल्यानंतर पालकांचा उद्रेक झाला आहे. संतापलेल्या पालकांनी आज शाळेबाहेर जोरदार आंदोलन सुरू केलं आहे. तर संतप्त जमाव बदलापूर रेल्वे ट्रॅकवर उतरला आहे. आज बदलापूर बंदची हाक देण्यात आली आहे. या प्रकरणानंतर आता कारवाई करण्यात आली आहे. शाळेनं माफीनामा जाहीर केला आहे. याप्रकरणी शाळेतील संबंधित मुख्याध्यापिकेला निलंबित करण्यात आलं असून मुलांची जबाबदारी असलेल्या दोन सेविकांना सेवेतून कमी करण्यात आलं आहे. सजग नागरिकांकडून शाळेविरुद्ध आंदोलन करण्यात येत आहे. आता प्रशासनाकडून याप्रकरणाची गंभीर दखल घेण्यात आली आहे. 


'त्या' दिवशी नेमकं घडलं काय? 


बदलापूरमधील नामांकीत शाळा. या शाळेत घडलेल्या घटनेनं संपूर्ण शहर हादरलं. बदलापूरमध्ये एका शाळेत सफाई काम करणाऱ्या कामगारानं दोन चिमुरड्या मुलींचं लैंगिक शोषण केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. यातील आरोपीला अटक करण्यात आली असून गुन्हा दाखल करण्यास दिरंगाई करणाऱ्या पोलिसांवरही कारवाई करण्यात आली आहे. तसेच, शाळा प्रशासनानं माफीनामा जाहीर केला असून मुख्याध्यापकांसह चौघांचं निलंबन करण्यात आलं आहे. बदलापुरात चार वर्षांच्या दोन मुलींवर शाळेतच अत्याचार करण्यात आला. माणुसकीला काळीमा फासणारी घटना उघडकीस आल्यानंतर पालकांचा उद्रेक झाल्याचं पाहायला मिळालं. संतप्त नागरिकांनी एकत्र येत शाळेबाहेर आंदोलन सुरू केलं. शेकडो पालक रस्त्यावर चिमुकल्यांना न्याय मिळवून देण्यासाठी रस्त्यावर उतरल्याचं पाहायला मिळालं. 


मीडिया रिपोर्ट्सनुसार, बदलापूरमधील नावाजलेल्या शाळेत शिकणाऱ्या दोन मुलींवर अत्याचार झाला. यातील एक चिमुकली चार वर्षांची, तर दुसरी सहा वर्षांची असल्याची माहिती मिळत आहे. शाळेत नुकत्याच सफाई कामगार म्हणून रूजू झालेल्या अक्षय शिंदे नावाच्या 23 वर्षांच्या नराधमानं चिमुकल्यांच्या अजाणतेपणाचा फायदा घेऊन त्यांच्यासोबत पाशवी कृत्य केलं. ही घटना 12 ऑगस्टची आहे. त्या दिवशी सकाळचे वर्ग सुरू असताना घडली. 


बदलापूरमधील एका शाळेत आरोपी अक्षय शिंदे 1 ऑगस्ट रोजी कंत्राटी पद्धतीनं कामावर रूजू झाला होता. मुलींच्या स्वच्छतागृहांची सफाई करणाऱ्या आरोपीनं त्याच्या कामाचाच गैरफायदा घेतला. या हैवानानं याच बहाण्यानं चिमुकल्यांचा गैरफायदा घेतला. दरम्यान, शाळेनं मुलींच्या स्वच्छतागृहांच्या सफाईसाठी शाळेनं महिला कर्मचाऱ्यांची नियुक्ती केली नाही. 


12 ऑगस्टच्या दिवशी एका मुलीनं शाळेतून घरी परतल्यानंतर तिच्या पालकांकडे तक्रार केली. आई मला शुच्या जागी मुंग्या चावतायत, असं चिमुकलीचं वाक्य होतं. तिला समजलंही नव्हतं की, तिच्यासोबत काय घडलंय... सातत्यानं मुलीनं पालकांकडे तक्रार केल्यानं पालकांना संशय आला. त्यांनी मुलीला विश्वासात घेऊन विचारणा केली, त्यावेळी प्रकार उघडकीस आला. शौचालयात गेली असता अक्षय शिंदे नावाच्या नराधमानं तिच्या प्रायव्हेट पार्टला स्पर्श केल्याचं उघड झालं. चिंतेत असलेल्या पालकांनी त्याच वर्गातील दुसऱ्या मुलीच्या पालकांशी संपर्क साधला. नुकतीच त्यांची मुलगीही शाळेत जायला घाबरत असल्याचं त्यांना समजलं. दोन्ही मुलींची अवस्था संशयास्पद वाटल्यानं पालकांनी तात्काळ स्थानिक डॉक्टरांकडे तपासणी करण्याचं ठरवलं. तपासणीनंतर ज्या नराधमानं त्यांच्यावर लैंगिक अत्याचार केल्याचं उघडकीस आलं. 


पोलिसांकडून प्रकरण दाबण्याचा प्रयत्न 


संतप्त पालकांनी घडलेल्या प्रकरणाची सामाजिक कार्यकर्त्यांच्या मदतीनं बदलापूर पूर्व पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. मात्र, वरिष्ठ पोलीस निरीक्षक शुभदा शितोळे यांनी पॉक्सो प्रकरण असूनही प्रक्रियेला विलंब केल्याचा आरोप आहे. अखेर शुक्रवारी रात्री उशिरा या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला. चिमुकल्यांवर अत्याचार करणाऱ्या नराधमाला अटक करण्यात आली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, या प्रकरणी बालकांचे लैंगिक गुन्ह्यांपासून संरक्षण (पोक्सो) कायदा आणि भारतीय न्याय संहिता (बीएनएस) कायद्यांतर्गत गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणाचा प्रथम तपास केल्यानंतर आम्ही आरोपीला अटक केली.


शाळा व्यवस्थापनाकडूनही प्रकरणाकडे दुर्लक्ष 


पोलिसांच्या तपासात शाळा व्यवस्थापनाच्या अनेक त्रुटी आढळून आल्या असून निष्काळजीपणाही उघड झाला आहे. मुलींच्या स्वच्छतागृहात महिला कर्मचारी नसण्यासोबतच शाळेतील अनेक सीसीटीव्ही कॅमेरे कार्यरत नसल्याचंही काही पालकांनी सांगितलं. या घटनेमुळे बदलापूरमधील विद्यार्थी सुरक्षा आणि शाळा व्यवस्थापन पद्धतींबाबत गंभीर चिंता निर्माण झाली आहे. भविष्यात अशा घटना घडू नयेत, यासाठी कठोर उपाययोजना आणि अधिक चांगल्या प्रकारे देखरेख करण्याची मागणी पालकांकडून होत आहे.


आरोपींवर फास्ट ट्रॅक न्यायालयात खटला चालवणार : मुख्यमंत्री 


बदलापूर घटनेची अतिशय गंभीर दखल घेण्यात आली असून आरोपीवर कठोरात कठोर कारवाई करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. तसेच, आरोपींवर फास्ट ट्रॅक न्यायालयात खटला चावणार असल्याचंही मुख्यमंत्र्यांनी सांगितलं. तसेच, मुलींवर अत्याचाराची घटना घडल्यास प्रसंगी संस्थाचालकांवर कारवाई करणार अला इशारा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिला आहे. 


बदलापूरच्या घटनेची राज्य महिला आयोगाकडून दखल


बदलापूरमध्ये एका शाळेत सफाई कामगारानं दोन चिमुरड्या मुलींचं लैंगिक शोषण केल्याची घटना घडली आहे. यातील आरोपी अटक असून गुन्हा दाखल करण्यास दिरंगाई करणाऱ्या पोलिसांवरही कारवाई झालेली आहे. शाळेनं संबंधितांना निलंबित केलं आहे. महाराष्ट्र राज्य महिला आयोगानं या प्रकरणाची दखल घेतली आहे. आतापर्यंत झालेल्या तपासाबाबत पोलिसांकडून आयोगानं अहवाल मागवला आहे. तसेच, या घटनेमध्ये तातडीनं योग्य ती कारवाई होईल याबाबत आयोग पाठपुरावा करेल. शाळेत कर्मचारी पुरवणारे कंत्राटदार, शाळा व्यवस्थापन यांनी विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने काळजी घेतली पाहिजे. असे प्रकार होऊ नये यासाठी शाळा व्यवस्थापनाच्या पातळीवर कारवाई झाली पाहिजे, असंही सांगितलं. 


बदलापूर प्रकरणी SIT गठीत, गृहमंत्र्यांचे आदेश 


बदलापूर येथील दुर्दैवी घटनेची चौकशी करण्यासाठी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पोलिस महानिरीक्षक दर्जाच्या वरिष्ठ IPS अधिकारी आरती सिंह यांच्या अध्यक्षतेखाली SIT गठित करण्याचे आदेश दिले आहेत. 
दोषींवर कठोरातील कठोर कारवाई करण्यासाठी, हा खटला जलदगती न्यायालयात चालविण्यासाठी आजच प्रस्ताव सादर करण्याचे आदेश ठाणे पोलिस आयुक्तांना सुद्धा त्यांनी दिले आहेत.


बदलापूर आंदोलनाची टाईमलाईन 



  • सकाळी 7.30 वाजता शाळेसमोर आंदोलन सुरू झालं

  • सकाळी 10 वाजता आक्रमक आंदोलकांनी बदलापूर रेल्वेस्थानकात जाऊन रेलरोको सुरु केला. मध्य रेल्वेवरील कल्याण-कर्जत आणि अंबरनाथवरून बदलापूरकडे जाणाऱ्या अप आणि डाऊन दोन्ही मार्गाच्या रेल्वे सेवा पूर्णपणे बंद.

  • सकाळी 11.10 वाजता मुख्यमंत्र्यांनी एबीपी माझाकडे प्रतिक्रीया देताना संयम ठेवण्याचे आवाहान केलं 

  • सकाळी 11.30 वाजता गुन्हा जलदगती न्यायालयात चालविण्यासाठी आजच प्रस्ताव सादर करण्याचे उपमुख्यमंत्र्यांनी आदेश दिले

  • दुपारी 11.45 वाजता आंदोलकांकडून शाळेचे गेट तोडून आत जाण्याचा प्रयत्न केला.. 

  • दुपारी 12 वाजता  आंदोलकांनी शाळेत जाऊन तोडफोड केली 

  • दुपारी 12.15 वाजता शालेय शिक्षणमंत्री दिपक केसरकर तातडीची पत्रकार परिषद घेऊन आतापर्यंतच्या कारवाईची माहिती दिली.

  • दुपारी 12.40 वाजता पोलिसांनी रेल्वे ट्रॅक मोकळा केला संतप्त आंदोलकांनी दगडफेक सुरु केली 

  • दुपारी 1 वाजता आंदोलक पुन्हा रेल्वेट्रॅकवर आले.. पोलिसांकडून पुन्हा आंदोलकांना समजवाण्याचा प्रयत्न सुरु झाला

  • दुपारी 1.10 वाजता शाळेबाहेर तणाव वाढला.. पोलिसांनी अश्रुधुराच्या नळकांड्या फोडल्या