Uddhav Thackeray admitted to Reliance Hospital : शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर एच एन रिलायन्स रुग्णालयात सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार अँजिओप्लास्टी करण्यात आली आहे. उद्धव यांची आज सकाळी आठ वाजल्यापासून एच एन रिलायन्स रुग्णालयामध्ये हृदयाला रक्तपुरवठा करणाऱ्या रक्तवाहिन्यांची तपासणी डॉक्टरांकडून केली जात होती. या तपासणी दरम्यान ब्लॉकेज आढळून आल्यानंतर अँजिओग्राफीनंतर डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार अँजिओप्लास्टी झाल्याचं सांगण्यात आले. उद्धव ठाकरे आज चेकअपसाठी रुग्णालयात दाखल झाले होते. यापूर्वी, उद्धव ठाकरे यांच्यावर 2012 मध्ये अँजिओप्लास्टी करण्यात आली होती.


दसरा मेळाव्यातून घणाघाती प्रहार 


दुसरीकडे, दोन दिवसांपूर्वी दसरा मेळाव्यातून घणाघाती प्रहार केला होता. काल सुद्धा त्यांनी महाविकास आघाडीच्या पत्रकार परिषदेतून तोफ डागली होती. उद्धव ठाकरे यांनी सत्तेवर येताच धारावी पुनर्विकास प्रकल्पाची निविदा रद्द करू, असे म्हटले आहे. उद्योगपती गौतम अदानी यांच्या कंपनीला ही निविदा प्राप्त झाली आहे.


मुंबईतील दादर येथील शिवाजी पार्कवर शिवसेनेच्या पारंपरिक दसरा मेळाव्याला संबोधित करताना उद्धव ठाकरे म्हणाले की, सरकार धारावीच्या माध्यमातून मुंबईला लुटण्याचा प्रयत्न करत आहे. अदानींना काय दिले नाही? सारी जमीन अदानींची होत आहे. मुंबई आम्हाला अदानीने दिलेली नाही. संयुक्त महाराष्ट्र चळवळीत लढून आपण हे साध्य केले आहे. मी स्वतःसाठी लढत नाही. मी मुंबईसाठी लढत आहे. माझे सरकार येताच मी धारावीची निविदा रद्द करेन.


मुख्यमंत्रीपदाचा निर्णय ठरला? 


दरम्यान, गेल्या अनेक वर्षांपासून दिल्लीमध्ये काँग्रेस वार्तांकन करणारे पत्रकार आदेश रावल यांनी लोकमत हिंदीला दिलेल्या मुलाखतीमध्ये काँग्रेस नेते तथा लोकसभेतील विरोधी पक्ष नेते राहुल गांधी यांनी महाराष्ट्रातील मुख्यमंत्रीपदावर निर्णय घेतल्याचे म्हटले आहे. ऑगस्ट महिन्यामध्ये उद्धव ठाकरे यांनी सहकुटुंब दिल्ली दौरा केला होता. या दौऱ्यामध्ये त्यांनी इंडिया आघाडीतील नेत्यांच्या भेटीगाठी केल्या होत्या. तसेच राहुल गांधी आणि सोनिया गांधी यांची सुद्धा भेट घेतली होती. या दौऱ्यामध्ये उद्धव ठाकरे आणि राहुल गांधी यांच्यामध्ये मुख्यमंत्रीपदावर चर्चा झाल्याचा दावा आदेश रावल यांनी केला आहे.


राहुल गांधी महाराष्ट्रात कोणत्याही बदलाच्या तयारीत नाहीत 


राहुल गांधी सद्यस्थितीत महाराष्ट्रामध्ये कोणताही निर्णय किंवा बदल करू इच्छित नाहीत. त्यामुळे महाविकास आघाडीची राज्यात सत्ता आल्यास मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हेच असतील असंच राहुल गांधी यांनी उद्धव ठाकरे यांना सूचित केल्याचे त्यांचं म्हणणं आहे. दरम्यान, ठाकरे गटाकडून ही बाब जाहीरपणे सांगण्यात यावी आणि मुख्यमंत्री पदाचा उमेदवार जाहीर करावा अशी मागणी ठाकरे गटाकडून होत आहे. मात्र काँग्रेसला याला विरोध असल्याचा आदेश रावल यांनी म्हटले आहे. 


इतर महत्वाच्या बातम्या