Maharashtra Weather Update : राज्याच्या काही भागामध्ये ऑक्टोबर हिटचा (october heat) परिणाम जाणवू लागला आहे. तर काही ठिकाणी पावसाच्या सरी बरसत आहेत. राज्यात ढगाळ वातावरण आणि कडक ऊन्हाचा तडाखा असे वातावरण निर्माण झाल्याने दिवसभर कमालीचा उकाडा जाणवत आहे. अशातच  राज्यातील काही भागात गेल्या काही दिवसांपासून सतत सुरू असलेल्या वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाने (Rain Update) सर्वत्र एकच दाणादाण उडवली आहे. दरम्यान, बुलढाणा (Buldhana) जिल्ह्यात देखील परतीच्या पावसाच थैमान घातल्याचे चित्र आहे. या पावसाचा सर्वअधिक फटाका फळबागांसह धानपिकाला बसला आहे. त्यामुळे शेतकरी पुन्हा एकदा आर्थिक अडचणीत सापडला आहे. 


बुलढाणा जिल्ह्यातील जन जीवन विस्कळीत 


बुलढाणा जिल्ह्यातील मलकापूर शहरातील सखल भागात पुराच पाणी शिरल्याने अनेक भागातील रस्ते पाण्याखाली गेले आहे. त्यामुळे मलकापूर , दाताळा परिसरातील जन जीवन विस्कळीत झाले आहे. तर बुऱ्हाणपूर -जालना मार्ग गेल्या तीन तासांपासून ठप्प असल्याची माहिती पुढे आली आहे. जिल्ह्यात रात्रभर विजेच्या कडकडाटासह मुसळधार पाऊस सुरू होता. त्यामुळे जिल्ह्यातील सर्व धरणे ओहरफ्लो झाल्याची माहिती आहे. परिणामी,  नळगंगा, पेनटाकळी, खडकपूर्णा या तीनही धरणाचे सर्व दरवाजे उघडले आहेत. तसेच नदीकाठच्या शेकडो गावांना सतर्क राहणाच्या प्रशासनाच्या वतीने सूचना देण्यात आल्या आहेत. सोबतच मोताळा, मलकापूर तालुक्यात नळगंगा नदीला मोठा पूर आला आहे असून अनेक गावात पाणी शिरले आहे. शेतीत पुराचे पाणी शिरल्याने शेतीचेही मोठे नुकसान झाले आहे.


संत्रापिकाची मोठी गळ सुरु


सततच्या पावसामुळे बुरशीजन्य डिप्लोडिया आणि कोल्याट्रोटिकम रोगामुळे संत्रापिकाची मोठी गळ सुरु. नागपूर जिल्ह्यातील काटोल, नरखेड, वरुड, मोर्शी, परतवाडा, अचलपूर भागातील 50 टक्केच्या वर संत्रा गळून खाली आला असल्याची माहिती पुढे आली आहे. वातावरणात होत असलेला सततच्या बदलणे नागपूर संत्रा गळतीचा वेग वाढला आहे. दरम्यान, अचानक आलेल्या परतीच्या पावसाने हाता तोंडाशी आलेला घास निघून जात  असल्याने शेतकऱ्यांची दिवाळी अंधारात जाण्याची वेळ आल्याची भीती शेतकऱ्यांनी व्यक्त केलीय. तर  प्रशासनाचे याकडे दुर्लक्ष असल्याचा आरोपही  शेतकऱ्यांनी यावेळी केला आहे. 


परतीच्या पावसानं शेतकऱ्यांचं स्वप्न झालं भुईसपाट


यावर्षीच्या हंगामात भंडारा जिल्ह्यात सहाव्यांदा शेतकऱ्यांना पावसाचा जबर फटका बसला आहे. परतीचा पाऊस काल(रविवार) पुन्हा एकदा भंडारा जिल्ह्यातील मोहाडी आणि तुमसर तालुक्यात बरसला. वादळीवारा आणि विजांच्या कडकटासह आलेल्या या पावसानं कापणीला आलेलं भातपीक अक्षरश: जमीनदोस्त झाला आणि पाण्याखाली आलं. यामुळं दिवाळीच्या तोंडावर हे भातपीक कापणीनंतर विकून कर्जमुक्त होण्याचं शेतकऱ्यांचं स्वप्न आता अधांतरी राहिलं आहे. या परतीच्या पावसानं हलक्या भातपिकाला मोठं नुकसान झालं आहे. आता पुन्हा एकदा शेतकरी कर्जाच्या खाईत लोटण्याची भीती व्यक्त होत असल्यानं राज्य सरकारनं तातडीनं नुकसानीचा आर्थिक मोबदला द्यावा, अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे. 


हे ही वाचा