Uddhav & Raj Thackeray on Barsu Refinery: अवघ्या राज्याचे लक्ष लागून राहिलेल्या दोन ठाकरे बंधूंच्या कोकणातील सभेनंतर भाजप आणि कोकणमधील नेते मंत्री नारायण राणे यांची कोंडी होणार का? अशा प्रश्न उपस्थित झाला आहे महाडमध्ये शिवसेना ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची सभा पार पडली, तर दुसरीकडे रत्नागिरी जिल्ह्यातील खेडमध्ये मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची सभा पार पडली. राज ठाकरे यांनी रिफायनरीला थेट विरोध केला नसला, तरी कोकणी माणसाला कोकणच्या भूमीत जाऊन भावनिक साद घालण्याचे काम केले. दुसरीकडे उद्धव ठाकरे यांनी सुद्धा हो मी बारसू रिफायनरीसाठी पत्र दिलं होतं. मात्र, कुठेही लोकांची सहमती नसेल तर मी प्रकल्प होऊ देणार नाही असे स्पष्ट सुचवले होते. मात्र, प्रकल्पाला संमती मिळताच सरकार पाडण्यात आले का? अशी विचारणा त्यांनी केली.
कोणत्याही परिस्थितीमध्ये लोकांची सहमती नसेल, तर प्रकल्प होऊ देणार नाही, असा स्पष्ट इशारा त्यांनी महाडमधील सभेतमधून दिला. त्यामुळे आता रिफायनरी वाद आणखी चिघळण्याची स्पष्ट चिन्हे आहेत. उद्धव ठाकरे बारसू विरोधात मैदानात उतरल्याने राज काय भूमिका घेणार? अशी चर्चा होती. राज यांनी थेट विरोध न करता कोकणी माणसाला भावनिक साद घालत आणि शेजारच्या गोव्याचा उल्लेख करत अप्रत्यक्षरित्या विरोध सूचित केला. त्यामुळे उद्धव यांच्यावर भाजप शिंदे गटाकडून आणि राणे कुटुंब आणि रामदास कदम यांच्याकडून प्रहार सुरु असताना राज यांच्या भूमिकेमुळे त्यांची कोंडी निश्चित होण्याची चिन्हे आहेत. आजचा दिवस (6 मे) पूर्णतः कोकणसाठी पूर्णत: राजकीय आखाड्याचा दिवस ठरला. याचं कारण होतं दोन ठाकरे बंधूंचा कोकण दौरा आणि बाजूला रिफायनरीच्या समर्थनार्थ भाजपकडून काढण्यात आलेला मोर्चा. आज सकाळी उद्धव ठाकरे यांनी सोलगावमध्ये जात ग्रामस्थांशी चर्चा केली आणि त्यांना सोबत असल्याची ग्वाही दिली.
उद्धव ठाकरे महाड सभेत काय म्हणाले?
उद्धव ठाकरे म्हणाले की, मी पत्र दिल्यानंतर लोकांची सहमती असेल, तरच प्रकल्प होईल असे सांगितले होते. अन्यथा गेट आऊट असे सांगितले होते. सगळं पोलिस दल बारसूत उतरले आहे, घराघरात पोलिस घुसले आहेत. बाथरुममध्येही बंदोबस्त असेल. एवढा बंदोबस्त चीनला लावता असता, तर घुसखोरी झाली नसती. भूमिपुत्रांवर काठ्या चालवताय, प्रकल्प चांगला आहे, तर लाठ्या कशाला? जनतेत जाऊन का सांगत नाही प्रकल्प चांगला आहे म्हणून? तडीपारी, जिल्हाबंदी लावताय लोकांना विश्वासात का घेतल जात नाही? बळाचा वापर होणार असेल, तर प्रकल्प होऊ देणार नाही. संपूर्ण महाराष्ट्र बारसूमध्ये उतरेल.
राज ठाकरे खेड सभेत काय म्हणाले?
दाभोळ प्रकल्प असो, जैतापूर असो, नाणार आणि बारसू असो इथल्या जमिनी अमराठी लोकांनी घेतल्या आणि अव्वाच्यासव्वा भावाला सरकारला विकल्या. तो गब्बर श्रीमंत झाला आणि माझा कोकणी माणूस तसाच राहिला. याचं मला खूप वाईट वाटतं, राग येतो. कोकणातील जमिनी हडपणे, त्यातून बक्कळ पैसा कमवणं इतकंच येथील लोकप्रतिनिधींचे उद्दिष्ट आहे हे विसरू नका. माझी कोकणवासीयांना हात जोडून विनंती आहे की तुम्हाला फसवणाऱ्या ह्या लोकांना एकदा धडा शिकवा, असे आवाहन मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी रत्नागिरीमधील खेडमधील सभेत केले.
राज यांनी कोकणी माणसाला साद घालत रिफायनरी गोव्यात का होत नाहीत? कातळशिल्पांच्या आसपास 3 किमीपर्यंत कोणताही विकास प्रकल्प करता येणार नाही. बारसूच्या रिफायनरी साईटच्या परिसरात कातळशिल्प आहेत, म्हणजे इथे रिफायनरी होऊच शकत नाही. त्यामुळे माझी कोकणातील बांधवाना विनंती आहे की तुम्ही जमीन विकू नका.युनेस्को जगभरातील अनेक हेरिटेज वास्तूंच जतन करते. आता आपल्याकडे कातळशिल्प सापडली आहेत त्यामुळे अशा हेरिटेज वास्तूच्या आसपास कोणताही मोठा प्रकल्प किंवा युनेस्कोच्या परवानगीशिवाय मोठं बांधकाम करता येत नाही.
राणे-भाजपची कोंडी होणार?
राज यांनी रिफायनरीला थेट विरोध न करता कोकणी माणसाला घातलेली साद, उद्धव ठाकरे यांच्याकडून थेट विरोध, स्थानिकांवर पोलिसी बळाचा केलेला वापर यामुळे रिफायनरीचा वाद आणखी चिघळण्याची चिन्हे आहेत. उद्धव ठाकरे बारसूत पोहोचल्यानंतर भाजपकडूनही समर्थनार्थ मोर्चाचे आयोजन करण्यात आले. त्यांच्या निशाण्यावर अर्थातच उद्धव ठाकरे होते. त्यामुळे ज्या स्तरावरून उद्धव य़ांच्यावर राणे कुटुंबाकडून 'प्रहार' केला जातो त्याच पद्धतीने आता राज यांच्या बाबतीत समाचार घेतला जाणार की फक्त उद्धव ठाकरेच टार्गेट राहणार? याकडे आता राजकीय वर्तुळाचे लक्ष असेल. उदय सामंत यांनीही स्थानिकांचा विरोध असल्यास बळजबरी करणार नसल्याचे म्हटले आहे. रामदास कदमांकडून उद्धव यांच्यावर हल्लाबोल सुरु आहे. मात्र, या सर्व खिचडीत आता राज ठाकरेंनी एन्ट्री केल्याने विरोधाची धार कोणत्या दिशेने आणि कोणत्या पद्धतीने असेल याकडेही राजकीय वर्तुळाचे लक्ष असेल.
इतर महत्वाच्या बातम्या