Nashik News : नाशिक (Nashik) जिल्ह्यात रेशनचा काळाबाजार (Ration) या पूर्वी देखील अनेक घटनांमधून अधोरेखित झाला आहे. अशातच राज्यात तांदळाची सर्वात मोठी बाजारपेठ असलेल्या घोटी शहरातील राईस मिलवर छापा टाकण्यात आला आहे. स्थानिक गुन्हे शाखेने छापा मारून 4 लाख 29 हजार 260 रुपये किमतीचा रेशनचा तांदूळ जप्त केला आहे. याबाबत घोटी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
नाशिकसह राज्यभरात रेशनकार्ड (Ration Card) धारकांना दरमहा रेशन पुरविले जाते. यासाठी गोदामाच्या माध्यमातून हा धान्यसाठा संबंधित वितरकांकडे पुरवला जातो. त्यानंतर गावपातळीवर त्याचे वाटप केले जाते. मात्र गेल्या काही वर्षांत यातील धान्यसाठ्यात अफरातफर करून विक्री केले जात असल्याचा प्रकार समोर आला आहे. नाशिक शहरात अशीच एक घटना घडली होती. आता स्थानिक गुन्हे शाखेने इगतपुरी (Igatpuri) तालुक्यातील घोटी शहरात (Ghoti) कारवाई केली आहे. येथील व्यापारी भाकचंद केशरमल पिचा यांच्या राइस मिलमध्ये हा छापा टाकण्यात आला आहे. या कारवाईत टेम्पोत लाखो रुपयांचा रेशनचा तांदूळ (Rice) आढळून आल्याने खळबळ उडाली आहे.
दरम्यान घोटी पोलीस ठाण्यात संबंधित मिल मालक, टेम्पोचालक आणि विक्रेता या तिघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक हेमंत पाटील, सहायक पोलिस निरीक्षक प्रभाकर निकम यांच्या पथकाने या छाप्यात 4 लाख 29 हजार 260 रुपये किमतीचा 16 हजार 900 किलो वजनाचा तांदूळ जप्त केला. अवैध धंद्यांवर घोटी पोलिस ठाण्याच्या हद्दीत कारवाई करीत असताना पोलिस निरीक्षक हेमंत पाटील यांना मिळालेल्या गुप्त बातमीबाबत त्यांनी केडगाव येथून रेशन दुकानातून जमा केलेला जुना तांदूळ एफसीआयचे गोण्यांमधून काढून, गोण्या नष्ट करून हा रेशनचा जुना तांदूळ वेगवेगळ्या कंपन्यांच्या गोण्यांमध्ये भरून तो घोटी गावात खुल्या बाजारात विक्री करिता येत असल्याची माहिती मिळाली होती. त्यानुसार सापळा रचून ही कारवाई करण्यात आली.
पावती वेगळी, टेम्पोत वेगळाच माल
दरम्यान टेम्पो चालकाकडे असलेल्या पावतीप्रमाणे साईल, 171 नग, 10,070 किलो वजन व 2540 रुपये दर असा एकूण 2 लाख 55 हजार 778 रुपये किंमत असलेली चेतन ट्रेडर्स कंपनी, किराणा भुसार मालाचे व्यापारी अशी पावती सादर केली. मात्र, बिलाप्रमाणे ही गाडी चेक केली असता या टेम्पोमध्ये जुना रेशनचा तांदूळ माल दिसून आल्याने त्यांनी पुरवठा विभागातील निरीक्षक पी. डी. गोसावी, पुरवठा निरीक्षक अधिकारी बी. आर. डोणे यांच्या समक्ष टेम्पोची तपासणी केली. टेम्पोमध्ये प्रत्यक्षात 4 लाख 29 हजार रुपये किमतीच्या रेशनच्या जुन्या तांदळाचे सफेद, पोपटी, लाल, आकाशी, नारंगी अशा वेगवेगळ्या रंगांच्या एकूण 290 गोण्या मिळून आल्या.