अहमनदनगरमधील चौंडी येथे अहिल्याबाई होळकर यांच्या जयंतीनिमित्त (शुक्रवार, 31 मे)त्यांना अभिवादन करण्यासाठी उदयनराजे भोसले आले होते. येथे आयोजित जयंतीच्या कार्यक्रमानंतर उदयनराजेंनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी राष्ट्रवादीच्या विलिनीकरणाबाबत प्रतिक्रिया दिली.
उदयनराजे म्हणाले की, राष्ट्रवादीच्या काँग्रेसमधील विलिनीकरणाच्या चर्चेबद्दल मला काहीच माहिती नाही. विलिनीकरणाबाबत माझ्याशी आणि इतर नेत्यांशी चर्चा करावी लागेल. योग्य ती चर्चा करुनच याबाबत निर्णय घेतला जाईल. असा परस्पर निर्णय घेता येणार नाही.
उदयनराजे एवढ्यावरच थांबले नाहीत, ते म्हणाले की, विलिनीकरणाबाबत चर्चा होणे गरजेचे आहे. पक्षाचे विलिनीकरण का करायचे आहे? हे आम्हाला सांगितले पाहिजे. विलिनीकरण करण्याचे ठरवले, तर कोणत्या पक्षात विलिनीकरण करायचे हेदेखील पक्षातील सर्व नेत्यांना विश्वासात घेऊन ठरवायला हवे.
पाहा व्हिडीओ : उदयनराजे काय म्हणाले?
शरद पवारांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षात विलीन होण्यासाठी हालचाली सुरु झाल्याची चर्चा सुरु आहे. त्यासाठीच राहुल गांधी यांनी गुरुवारी नवी दिल्लीतल्या शरद पवारांच्या निवासस्थानी जाऊन त्यांची भेट घेतली. लोकसभेतल्या मोठ्या पराभवानंतर शरद पवारांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा मुख्य काँग्रेसमध्ये विलीन करण्याच्या दृष्टीने राहुल आणि पवार यांच्यात चर्चा झाल्याची माहिती मिळाली आहे.
वाचा : विधानसभेसाठी राष्ट्रवादीत मोठ्या उलथापालथीची शक्यता, शरद पवार नव्या चेहऱ्यांना संधी देणार?
शरद पवारांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष काँग्रेसमध्ये विलीन करण्याचा निर्णय घेतला तर ती इतिहासाची पुनरावृत्ती ठरेल. शरद पवारांनी यापूर्वी 1986 मध्ये त्यांची समाजवादी काँग्रेस, काँग्रेसमध्ये विलीन केली होती. तत्कालीन पंतप्रधान राजीव गांधी यांच्या उपस्थितीत औरंगाबादमध्ये हे विलीनीकरण पार पडलं होतं.
राष्ट्रवादी पक्ष काँग्रेसमध्ये विलीन झाला तर लोकसभा आणि राज्यसभेचे विरोधी पक्षनेतेपद काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या वाट्याला येऊ शकते. काँग्रेसकडे सध्या केवळ 51 खासदारांचे संख्याबळ आहे. लोकसभेचे अधिकृत विरोधी पक्षनेतेपद मिळवण्यासाठी कोणत्याही पक्षाकडे किमान 55 खासदारांचे संख्याबळ असणे आवश्यक आहे. राष्ट्रवादीकडे 5 खासदार आहेत. त्यामुळे राष्ट्रवादी पक्ष काँग्रेमध्ये विलिन केल्यानंतर काँग्रेसच्या खासदारांचे संख्याबळ 55 पेक्षा जास्त होईल, त्यामुळे त्यांना अधिकृत विरोधी पक्षनेतेपद मिळवता येईल.
राष्ट्रवादी पक्ष काँग्रेसमध्ये विलिनीकरणाबाबत शरद पवार म्हणतात...
2014 साली झालेल्या लोकसभा निवडणुकीत काँग्रेसचा दारुण पराभव झाला होता. काँग्रेसने केवळ 44 जागा जिंकल्या होत्या. त्यामुळे काँग्रेसला लोकसभेच्या विरोधी पक्षनेते पदाला मुकावे लागले होते. काँग्रेस नेते मल्लिकार्जुन खरगे यांना लोकसभेचे विरोधी पक्षनेतेपद होते, परंतु काँग्रेसकडे अधिकृत विरोधी पक्षनेतेपद नव्हते.
यंदा झालेल्या लोकसभा निवडणुकीत काँग्रेसने केवळ 51 जागा जिंकल्या आहेत. त्यामुळे यंदादेखील काँग्रेसला लोकसभेचे अधिकृत विरोधी पक्षनेतेपद मिळणार नाही. त्यामुळेच राहुल गांधी राष्ट्रवादीचे काँग्रेसमध्ये विलिनीकरण व्हावे यासाठी प्रयत्न करत आहेत.
VIDEO | मतदानानंतर उदयनराजेंनी चुकीचं बोट दाखवलं | सातारा | एबीपी माझा