मुंबई: प्रवासासोबत प्रत्येकाच्या आठवणी जोडलेल्या असतात. कोणाला बसने प्रवास करायला आवडतो, तर कोणाला ट्रेनने. मुंबई-पुणे या शहरांना जोडणाऱ्या दोन अशाच 'लेजंड्स'चा आज वाढदिवस. डेक्कन क्वीनला आज 89 वर्ष पूर्ण झाली, तर एसटी महामंडळाची लाडकी 'लाल परी'ही 71 वर्षांची झाली. त्याचप्रमाणे पंजाब मेलने आज वयाची 107 वर्ष पूर्ण केली आहेत.


1 जून 1912 रोजी पंजाब मेल तेव्हाच्या बॅलार्ड पियर स्टेशनवरुन सुटली होती. तर 1 जून 1930 रोजी डेक्कन क्वीनने आपला पहिला प्रवास सुरु केला. या दोन्ही ट्रेन तेव्हाच्या ग्रेट इंडियन पेनिनसुला रेल्वेने सुरु केल्या होत्या. आता आपण तिला मध्य रेल्वे म्हणून ओळखतो. दुसरीकडे, स्वातंत्र्यानंतर सुरु झालेल्या एसटी महामंडळाच्या लाल परीने 1 जून 1948 रोजी पहिल्यांदा प्रवास केला.

लालपरी@71

राज्यातील खेड्यापाड्यात, गावागावात पोहचलेली आपल्या सर्वांची लाडकी लालपरी आता 71 वर्षांची झाली. 'गाव तिथे एसटी' 'वाट पाहीन पण एसटीनेच जाईन' ही वाक्यं एसटी प्रवाशांसाठी नवीन नाहीत.

एसटी म्हणजे केवळ प्रवाशांची वाहतूक करणारं साधन नाही. एसटीने सातत्याने सामाजिक बांधिलकी जपली आहे. राज्यावर आलेल्या दुष्काळासारख्या नैसर्गिक आपत्तीत एसटीने मदतीचा हात पुढे केला, तसा आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या, गोरगरीबांच्या मुलींना शिक्षणाच्या प्रवाहात आणण्यासाठीही एसटीने पुढाकार घेतला. लालपरी पासून सुरु झालेला प्रवास एशियाड, हिरकणी, शिवनेरी, शिवशाही ते विठाई अशा विविध मार्गांनी जातो.



डेक्कन क्वीन

डेक्कन क्वीनचा इतिहासदेखील मोठा आहे. डेक्कन क्वीन ही पहिली सुपरफास्ट डिलक्स ट्रेन म्हणून ओळखली जाते. 'दख्खनची राणी' म्हणूनही ती ओळखली जाते. सुरुवातीला तिला केवळ 7 डबे होते. नंतर ते 12 करण्यात आले आणि आता 17 डबे घेऊन ही गाडी धावते.

या गाडीचे वैशिष्ट्य म्हणजे ही भारतातील एकमेव अशी गाडी आहे, जिला डायनिंग कार आहे. म्हणजेच चालत्या गाडीत हॉटेलसारखे बसून खण्याची सोय आहे.

पुणे-मुंबई-पुणे असा प्रवास करणारी ही गाडी दोन्ही शाहरांच्या विकासाच्या दृष्टीने अत्यंत महत्वाची आहे. कित्येक वर्षे डेक्कन क्वीनने दररोज पुणे- मुंबई- पुणे प्रवास करणारे प्रवासी आहेत.



रेल्वे विभाग आणि प्रवासी संघाकडून केक कापून डेक्कन क्वीनचा बर्थडे साजरा करण्यात आला. संपूर्ण रेल्वेला आज सजवण्यात आलं होतं. बँड पथकही बोलवण्यात आलं. मुंबई ते पुणे असा प्रवास करणार्‍यांच्या मनात रुतलेले पारंपरिक पांढरा आणि निळा रंग, त्या जोडीला लाल पट्टी असं रुप कायम ठेवून तिला अत्याधुनिक ‘एलएचबी’ कोचची जोडही देण्यात येणार आहे.

पंजाब मेल

पंजाब मेल तेव्हा मुंबई ते थेट आताच्या पकिस्तानतील पेशावर या शहरापर्यंत धावायची. एकूण 2496 किमीचे अंतर ती 47 तासात पूर्ण करायची. त्यावेळी या गाडीला केवल 6 डबे होते. त्यातील तीनच डबे हे प्रवशांसाठी होते, ज्यात केवळ 96 प्रवासी असायचे.

उर्वरित डबे टपाल आणि मालवाहतूक करायचे. आता हीच गाडी 1930 किमीचा प्रवास 34 तासात करते आणि मुंबई ते फिरोजपूर अशी धावते.