सातारा : प्रजासत्ताक दिनी साताऱ्यात एक वेगळं आणि सातारकरांना सुखावणारं चित्र पाहायला मिळालं. एरवी एकमेकांकडे पाठ फिरवणारे खासदार उदयनराजे आणि आमदार शिवेंद्रराजे भोसले आज पुन्हा एकदा एकत्र पाहायला मिळाले. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्यासोबत हे दोन्ही राजे एकाच गाडीत होते.


आमदार शिवेंद्रराजे यांनी यावेळी गाडीचं सारथ्य केलं. यशवंत हॉस्पिटलच्या उद्घाटनानिमित्त पवार आज साताऱ्यात होते. यावेळी त्यांनी दोन्ही राजेंना एकाच गाडीत बसवलं. यावेळी पवारांनी त्यांना मनोमिलनाचे आदेश दिल्याचंही सांगितलं जात आहे. आता लोकसभा-विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर दोन्ही राजेंचा मनोमिलन होणार का हे पाहावं लागेल. पण साताऱ्यात आज दिवसभर या भेटीचीच चर्चा होत राहिली.


उदयनराजे आणि शिवेंद्रराजे यांच्यात अनेकदा टोकाचे मतभेद झाल्याचं सातारकरांनी अनेकदा पाहिलं. अनेकदा दोघांनी एकमेकांची उणीधुणीही काढली. त्यानंतर दोघांमध्ये मनोमिलन करण्याचे अनके प्रयत्न झाले. मात्र आज दोन्ही राजेंना शरद पवारांनी एकत्र आणले. यावेळी हा प्रयोग यशस्वी होईल का हे पाहावं लागणार आहे. नेत्यांच्या प्रेमापोटी एकमेकांपासून दुभंगलेल्या कार्यकर्त्यांच्या मनाचं काय? हा प्रश्न अनुत्तरित आहे.


राष्ट्रवादीचे खासदार असलेल्या उदयनराजेंनी गेल्या काही दिवसात अनेकदा आघाडीला घरचा आहेर देत युतीचं कौतुक करत तबाव तत्रांचा वापर केला. मात्र भाजपचं कौतुक करताना त्यांनी शरद पवारांचा कधीही अनादर केला नाही. आपण राष्ट्रवादीशीच एकनिष्ठ असल्याचंही त्यांनी वेळोवेळी दाखवण्याचा प्रयत्न केला.