नाशिक / कल्याण : भारतीय प्रजासत्ताक दिन देशात मोठ्या उत्साहात साजरा होत आहे. विविध उपक्रमांनी हा सोहळा साजरा केला गेला. आधुनिक युगात नवनवीन बदल होऊन नवीन संकल्पना पुढे येत आहेत. याचाच प्रत्यय नाशिकमध्ये आला. येथील पंडित कॉलनीमध्ये रोबोटच्या सहाय्याने ध्वजारोहण करण्यात आले. शालेय विद्यार्थ्यांना तंत्रज्ञान अवगत व्हावे यासाठी अशा पद्धतीने ध्वजारोहण करण्यात आलं.


विशेष म्हणजे या ठिकाणी दिल्लीच्या लाल किल्याची प्रतिकृती साकारली गेली होती. इलेक्ट्रॉनिक तंत्राच्या सहाय्याने परेडचे आयोजन करण्यात आले होते. या परेडमध्ये भारतीय सैन्यदलाकडे असणारी विविध लढाऊ विमाने, एअर इंडिया पॅसेंजर प्लेन, भारतीय सैन्य दलातील लढाऊ वाहने, मिसाईल, आणि विविध चित्ररथ असा देखावा साकारण्यात आला होता.

डोंबिवलीत 120 फूट उंच भव्य राष्ट्रध्वज
डोंबिवलीत 120 फूट उंच भव्य राष्ट्रध्वज उभारण्यात आला आहे. आज प्रजासत्ताक दिनानिमित्त डोंबिवलीचे रहिवासी असलेले भारतीय सैन्याचे कर्नल सी. आर. देशपांडे यांच्या हस्ते या राष्ट्रध्वजाचं ध्वजारोहण करण्यात आलं.  डोंबिवलीच्या लोढा हेरिटेज परिसरात लोढा हेरिटेज फेडरेशन आणि संदीप माळी यांच्या पुढाकाराने हा राष्ट्रध्वज उभारण्यात आलाय. आज सकाळी 9 वाजता रिमोटच्या सहाय्यानं ध्वजारोहण करून हा भव्य राष्ट्रध्वज देशाला समर्पित करण्यात आला.

डोंबिवलीकर असलेले भारतीय सैन्याच्या गोरखा रेजिमेंटचे कर्नल सी. आर. देशपांडे यांनी ध्वजारोहण केलं. यावेळी स्थानिक खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्यासह सर्वपक्षीय नेते यावेळी उपस्थित होते. राष्ट्रध्वज डौलानं फडकू लागताच 'भारत माता की जय'च्या घोषणांनी परिसर दुमदुमून गेला.