मुंबई : बेहिशेबी मालमत्ता प्रकरणी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्याविरोधात याचिका दाखल करून त्यांच्या संपत्तीची मागणी करणाऱ्या गौरी भिडे (Gauri Bhide) यांच्याबाबत धक्कादायक माहिती समोर आली आहे. गौरी भिडे आणि त्यांच्या वडिलांविरोधात याआधीच विविध दोन प्रकरणात खटले न्यायालयात दाखल असल्याचे कागदपत्रातून समोर आले आहे. यामुळे गौरी भिडे संदर्भात आता प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहेत. मात्र आपल्या विरोधात कुठलाच खटला नसल्याचा दावा गौरी भिडे यांनी केलाय. 


बेहिशेबी मालमत्ता गोळा केल्या प्रकरणी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या विरोधात आधी मुंबई पोलिस आयुक्त यांच्याकडे तक्रार करून थेट उच्च न्यायालयात गौरी भिडे यांनी याचिका दाखल केली होती. या याचिकेतून उद्धव ठाकरे आणि त्यांच्या कुटुंबीयांच्या संपत्तीची चौकशी करावी अशी मागणी केली होती. परंतु, याच गौरी भिडे आणि त्यांच्या वडिलांच्या विरोधात दोन खटले न्यायालयात असल्याचं कागदपत्रातून समोर आलंय. त्यामुळे ज्यांचे हात आधीच दगडाखाली आहेत त्यांनी ठाकरे कुटुंबीयांवर आरोप करून त्यांची बदनामी करू नये असं शिवसेना ठाकरे गटाच्या आमदार मनीषा कायंदे यांनी म्हटले आहे. 


एका बँकेने खासगी कंपनी विरोधात दाखल केलेल्या याचिकेत कंपनीच्या संचालकासह गौरी भिडे यांचे नाव आहे. तर दुसऱ्या खटल्यामध्ये 2005 मध्ये गौरी भिडे यांच्या वडिलांच्या विरोधात याचिका दाखल करण्यात आलेली आहे. ज्यामध्ये गौरी भिडे यांच्या वडिलांची मालकी असलेल्या प्रिंटिंग कंपनीच्या कर्मचाऱ्यांचे पीएफचे पैसे खात्यात न भरल्याचा आरोप त्यांच्यावर आहे. हा खटला मागील पंधरा वर्षांपासून प्रलंबित आहे.  


दोन्ही खटल्यांसंदर्भात गौरी भिडे यांच्याशी संपर्क साधल्यानंतर आपल्या विरोधात कुठलीच केस नसल्याचं गौरी भिडे यांनी म्हटलं आहे. एका खटल्यात आपण कंपनीच्या संचालकासोबत गॅरेंटर असल्याचं सांगितलं तर दुसऱ्या खटल्यामध्ये कर्मचाऱ्यांच्या पीएफच्या संदर्भात सेटलमेंट होत असल्याचं त्यांनी सांगितलं. 


कोण आहेत गौरी भिडे?


गौरी भिडे या प्रकाशक आहेत. सामना आणि मार्मिक प्रकाशित करणारा ठाकरे कुटुंबियांच्या मालकीचा 'प्रबोधन' प्रकाशनचा छापखाना जिथे आहे, त्याच्या शेजारीच गौरी भिडे यांच्या आजोबांचा 'राजमुद्रा' प्रकाशन हा छापखाना होता. केवळ सामना आणि मार्मिकच्या विक्रीतून एवढी अफाट संपत्ती गोळा होणं, मातोश्री 2 सारखी टोलेजंग इमारती उभी करणं, आलिशान गाड्या, फार्महाऊसेस घेणं निव्वळ अशक्य आहे. कारण आपलाही हाच व्यवसाय, तेवढेच परिश्रम असल्याने मिळकतीत जमीन अस्मानाचा फरक कसा? असा सवाल भिडे यांनी आपल्या याचिकेतून उपस्थित केलाय. 


महत्वाच्या बातम्या


आदित्य ठाकरेंच्या नावाने रिया चक्रवर्तीच्या फोनवर 44 कॉल, सुशांत सिंह राजपूत प्रकरणावरून राहुल शेवाळेंचा गंभीर आरोप