Pune khadakwasla death :  खडकवासला (khadakwasla dam) धरणाच्या पाण्यात बुडून (pune) तरुण-तरुणीचा मृत्यू झाला आहे. सोनापूर (Sonapur) गावाच्या हद्दीत ही धक्कादायक घटना समोर आली आहे. ही घटना कळताच हवेली पोलीस घटनास्थळी दाखल झाले. हवेली पोलिसांनी दोन्ही मृतदेह (Death body) पाण्याबाहेर काढले आहेत. अद्याप मृतदेहांची ओळख पटलेली नाही,  त्यामुळे मृत्यूचं कारणंही अद्याप अस्पष्ट आहे.
 
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, एका स्थानिक नागरिकाला रस्त्याच्या कडेला एक दुचाकी दिसली. आजूबाजूला कोणीही न दिसल्याने त्याने पुढे धरणाच्या पाण्याकडे जाऊन पाहिले असता पाण्याव दोन मृतदेह तरंगताना दिसले. त्याने तातडीने ही माहिती हवेली पोलीस ठाण्याला दिली. या स्थानिकाची खाद्यपदार्थाची टपरी आहे. हा विक्रेता सुट्टीच्या दिवशी आणि शनिवारी-रविवारी आपली खाद्यपदार्थाची टपरी चालवतो. रस्त्याने जाताना त्या स्थानिकाला हा प्रकार दिसला. 
 
दोघांपैकी एक सिंहगड रस्त्यावरील असल्याची शक्यता 
मृतदेहांची ओळख अद्याप पटलेली नाही. पोलिसांनी सगळ्या परिसराची पाहणी केली शिवाय स्थानिक टपरी चालकाने दिलेल्या माहितीवरुन गाडीची देखील पाहणी केली.  गाडीच्या नंबरवरून दोघांपैकी एक जण सिंहगड रस्त्यावरील वडगाव बुद्रुक येथील असावा अशी शक्यता पोलिसांनी वर्तवली आहे. मात्र अजूनही कोणाची ठोस माहिती पोलिसांच्या हाती लागली नाही. तरुणीच्या बॅगमध्ये असलेल्या वहीवर प्रियंका चौगुले असे नाव लिहिलेले आहे.


मृतदेह होते तरगंत 
स्थानिकाला रस्त्याने जाताना एक गाडी खडकवासल्याच्या काठावर दिसली. त्यावेळी स्थानिकाने आजूबाजूला बघितलं असता या परिसरात कोणीही दिसलं नाही. त्यानंतर त्याने पाण्यात बघितल्यावर एक सॅक दिसली. त्यानंतर पुन्हा स्थानिकाने निरखून पाहिलं असता त्याला मृतदेह तरंगताना दिसले. 


संरक्षण भिंत किंवा कुंपण नाही
खडकवासल्याच्या पाणलोट क्षेत्रात यापूर्वीदेखील अशा घटना घडल्या आहेत. त्या ठिकाणी कोणतीही संरक्षण भिंत किंवा कुंपण नाही आहे. खडकवासल्याला जाणारे पर्यटक किंवा तरुण -तरुणी खेळण्यासाठी पाण्यात उतरतात. यावेळी अनेकदा पाण्याच्या खोलीचा अंदाज येत नाही त्यामुळे बुडून मृत्यू होण्याचं प्रमाण जास्त आहे. या पूर्वीही अनेकांना या ठिकाणी जीव गमवावा लागला आहे.


दुर्घटना रोखण्यासाठी उपाययोजनांची गरज
खडकवासला परिसरात अनेक ठिकाणी घातक क्षेत्र आहे. या सगळ्या क्षेत्रात योग्य संरक्षण भिंत किंवा फलक लावण्याची गरज आहे. अनेकांचा मृत्यू होऊनही कोणत्याही उपाययोजना करण्यात आल्या नाहीत. पाटबंधारे विभाग, पोलीस प्रशासन किंवा इतर विभागामार्फत हे अपघात किंवा दुर्घटना रोखण्यासाठी उपाययोजना करण्याची गरज असल्याचं बोललं जात आहे.