मुंबई : अभिनेता सुशांत सिंह राजपूत (Sushant Singh Rajput) प्रकरणावरून शिंदे गटाचे खासदार राहुल शेवाळे (Rahul Shewale) यांनी युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. रिया चक्रवर्तीच्या फोनवर एयू नावाने 44 कॉल आले होते. एयू म्हणजे आदित्य उद्धव ठाकरे असं बिहार पोलिसांनी सांगितलं आहे, असा गंभीर आरोप राहुल शेवाळे यांनी केलाय. लोकसभेत बोलताना राहुल शेवाळे यांनी हा गंभीर आरोप केलाय. परंतु, शिवसेनेच्या नेत्या मनिषा कायंदे यांनी राहुल शेवाळे यांचे हे आरोप फेटाळून लावले आहेत. राहुल शेवाळे यांच्याकडे पुरावे असतील तर त्यांनी सादर करावे, असे आव्हान कायंदे यांनी दिलं आहे.
सुशांत सिंह राजपूत याच्या आत्महत्या प्रकरणावरून आधीपासूनच आदित्य ठाकरे यांच्यावर आरोप करण्यात आले होते. त्यातच आता राहुल शेवाळे यांनी केलेल्या या गंभीर आरोपांमुळे या प्रकरणाला आता वेगळं वळण लागण्याची शक्यता आहे.
Sushant Singh Rajput case : "एयूचा अर्थ आदित्य उद्धव ठाकरे"
"एयूचा विषय खूप गंभीर आहे. एयूचा अर्थ आदित्य उद्धव ठाकरे असा आहे. बिहार पोलिसांनी याबाबत माहिती दिली आहे. या प्रकरणी सीबीआय, बिहार पोलिस आणि मुंबई पोलिसांचा तपास वेगवेगळा आहे. त्यामुळे याची माहिती लोकांना मिळाली पाहिजे", असे राहुल शेवाळे यांनी म्हटले आहे.
Sushant Singh Rajput case : काय म्हणाले राहुल शेवाळे?
"लोकसभेत ड्रग्ज या विषयावर चर्चा सुरू आहे. या चर्चेत अनेकांनी भाग घेतला. माझ्या भाषणाआधी चार ते पाच खासदारांनी सुशांतच्या केसचा उल्लेख केला. तोच विषय मी सभागृहात उपस्थित केला. सुशांत सिंहच्या आत्महत्येनंतर सीबीआय, बिहार पोलिस आणि मुंबई पोलिसांनी तपास केला. परंतु, या तिघांच्या तपासाची माहिती जनतेपर्यंत पोहोचलेली नाही. त्यामुळे जनतेच्या मनात काही प्रश्न निर्माण झाले आहेत. त्या प्रश्नांची उत्तरे जनतेला मिळाली पाहिजेत. ड्रग्जसंबंधात रियाची चौकशी करण्यात आली होती. सुशांत्या मृत्यूपूर्वी रियाला जे कॉल आले होते, त्यासंदर्भात बिहार पोलिांच्या तपासात उल्लेख आहे. रियाला ते कॉल एयू या नावाने आले होते, असे बिहार पोलिसांनी म्हटले होते. परंतु, मुंबई पोलिसांनी एयू म्हणजे रियाची मैत्रिण अनन्या उधास असल्याचं महटलं होतं. मात्र, एयूचा अर्थ आदित्य उद्धव ठाकरे असा आहे, अशी माहिती बिहार पोलिसांनी दिली आहे. सीबीआयने याबाबतची माहिती अद्याप लोकांसमोर आणलेली नाही. त्यामुळे या प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेता या प्रकरणाच्या तपासाची माहिती जनतेला मिळावी म्हणून मी हा मुद्दा आज लोकसभेत उपस्थित केला, असे राहुल शेवाळे यांनी म्हटले आहे.
मुंबईपेक्षा बिहार पोलिसांवर अधिक विश्वास आहे का? खासदार अरविंद सावंत यांचा सवाल
राहुल शेवाळे यांच्या आरोपानंतर ठाकरे गटाचे खासदार अरविंद सावंत यांनी टीकास्त्र सोडलं आहे. मुंबईपेक्षा बिहार पोलिसांच्या तपासावर तुमचा जास्त विश्वास आहे का? असा सवाल उपस्थित केला.
आदित्य ठाकरे सभागृहात नसताना त्यांचं नाव घेणे हा अनुचित हा प्रकार आम्ही पिठासीन अधिकाऱ्यांच्या लक्षात आणून दिला त्यानंतर ते वक्तव्य सभागृहातून वगळण्यात आलेला आहे. ठाकरे गटाच्या विरोधानंतर ते वक्तव्य कामकाजातून वगळण्यात आलंय
मुळात ज्यांच्या चारित्र्याचा पत्ता नाही त्यांनी अशा गोष्टींवर बोलू नये. सीबीआयने क्लीन चीट दिली त्यांच्यावर तुमचा विश्वास नाही का? मुंबईपेक्षा बिहार पोलिसांवर अधिक विश्वास आहे का? असा सवाल अरविंद सावंत यांनी उपस्थित केला.
Sushant Singh Rajput case : मनिषा कायंदेंचं राहुळ शेवाळेंना आव्हान
"राहुल शेवाळे यांना आदित्य ठाकरेंवर बोलण्याचा नैतिक अधिकार नाही. राहुल शेवाळे यांच्याविरोधात एका महिलेनं तक्रारी केल्या आहेत. याची दखल अजून कोणीही घेतली नाही, त्याचं काय झालं? त्या महिलेची तक्रार का घेतली जात नाही? राहुल शेवाळे यांच्याकडे पुरावे असतील तर त्यांनी सादर करावे, असं आव्हान मनिषा कायंदे यांनी राहुल शेवाळे यांना दिलं आहे.