सांगली : सध्या रेमडेसिवीर इंजेक्शनचा मोठा तुटवडा जाणवत आहे. अशा परिस्थितीत देखील उपलब्ध असलेल्या इंजेक्शनचा काळाबाजार होत आहे. सांगलीत देखील असा प्रकार समोर आला आहे. रेमडेसिवीर इंजेक्शनचा काळा बाजार करत असल्याप्रकरणी स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाच्या पथकाने रात्री दोघाना अटक केलीय. यातील एकजण मिरज सिव्हीलमधील ब्रदर असुन दुसरा विश्रामबाग येथील खासगी रुग्णालयातील लॅब असिस्टंट म्हणून कार्यरत आहे.
30 हजार रुपयाला एक इंजेक्शन
मिरज सिव्हील अर्थात शासकीय कोविड रुग्णालयातील ब्रदर सुमित हुपरीकर आणि खासगी लॅब टेक्नीशीयन दाविद वाघमारे अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. मध्यरात्री दोघांना इंजेक्शन विकताना रंगेहाथ पकडण्यात स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाच्या पथकाला यश आलेय. धक्कादायक बाब म्हणजे, या दोघांनी यापूर्वी दोन इंजेक्शन चोरून विकली असल्याचे तपासात समोर आले आहे. यातील एक इंजेक्शन 30 हजार रुपये असे दोन इंजेक्शन एकूण 60 हजार रुपयाला काही दिवसांपूर्वी विकल्याची कबुली आरोपींनी दिली आहे. यामुळे सांगलीत रेमडेसिवीर इंजेक्शनचा काळाबाजर होत असल्याचे उघड झाले आहे.
ही संपूर्ण कारवाई सांगलीच्या स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाचे पोलिस निरीक्षक सर्जेराव गायकवाड आणि सहाय्यक पोलिस निरीक्षक रविराज फडणीस यांच्या पथकाने केली. यामुळे सांगली पोलीस दलाला रेमडेसिवीर इंजेक्शनचा काळा बाजार उघडकीस आणण्यत मोठे यश आले आहे.
केंद्राकडून राज्यात रेमडेसिवीरचा पुरवठा वाढला
कोरोनाचा प्रकोप देशात सर्वाधिक महाराष्ट्रात आहे. राज्यात कोरोनाच्या वाढत्या संसर्गामुळं रेमडेसिवीर, ऑक्सिजनचा तुटवडा निर्माण झाला आहे. यामुळं राज्य सरकारनं केंद्राकडे रेमडेसिवीरचा साठा वाढवून देण्याची मागणी केली होती. राज्यात रेमडेसिवीरच्या तुटवड्यामुळे निर्माण झालेल्या समस्येकडे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केंद्र सरकारचे लक्ष वेधले होते तसेच पंतप्रधानांना देखील पत्राद्वारे विनंती केली होती. आज केंद्राने राज्यासाठी 30 एप्रिलपर्यंत 4 लाख 35 हजार व्हायल्सचा पुरवठा देण्याचे आदेश काढले आहेत. मुख्यमंत्र्यांनी याकरिता पंतप्रधानांचे आभार मानले आहेत. हा पुरवठा पूर्वी 2 लाख 69 हजार व्हायल्स एवढा होता, तो आता वाढवून 4 लाख 35 हजार करण्यात आला आहे.