पुणे : पुण्यातील खेड येथील राष्ट्रवादीचे आमदार दिलीप मोहिते पाटील यांना बदनाम करण्याचा कट फसला आहे. हनी ट्रॅपमध्ये आमदार दिलीप मोहिते पाटील यांना अडकवण्याचा प्रयत्न होता. सातारा तालुका पोलिसांनी तिघांवर गुन्हा दाखल केला आहे.  धक्कादायक बाब म्हणजे हनी ट्रॅपसाठी आमदारांच्या जवळचा असणाऱ्या त्यांच्याच भावकीतील शैलेश पाटील यांचा हात असल्याचं समोर आलं आहे. 


आमचे साताऱ्याचे प्रतिनिधी राहुल तपासे यांनी दिलेल्या माहितीनुसार, पुण्यातील खेड येथील राष्ट्रवादीचे आमदार दिलीप मोहिते पाटील यांना बदनाम करण्याचा कट फसला असून याप्रकरणी तीन जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. धक्कादायक बाब म्हणजे हा हनी ट्रॅपसाठी कधीकाळी आमदारांचा डावा हात समजला जाणारा त्यांच्याच भावकितील शैलेश पाटील यांचा हात असल्याच समोर आलं आहे. या प्रकरणात सातारा तालुका पोलीस ठाण्यात शैलेश मोहिते पाटील, राहुल कांडगे, सोमनाथ शेडगे या तिघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सातारा तालुका पोलिसांनी सोमनाथ शेडगेला अटक केली आहे. काल रात्री शैलेशच्या शोधासाठी पोलिसांचं एक पथक पुण्याला गेलं होतं. मात्र यातील दोघांनाही बेड्या ठोकण्यात पोलिसांना अपयश आलं आहे.  


आमचे पिंपरी चिंचवडचे प्रतिनिधी नाजिम मुल्ला यांनी आमदार दिलीप मोहिते पाटील यांची याप्रकरणी प्रतिक्रिया जाणून घेण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी आमदार दिलीप मोहिते पाटील यांनी बोलताना सांगितलं की, "हनी ट्रॅप रचण्याचा प्रयत्न करण्यात आला, तेव्हा संबंधित तरुणी ही साताऱ्यातील आहे, माझं ते कार्यक्षेत्र ही नाही. त्यामुळे ती माझ्या ओळखीची असण्याचा प्रश्न उद्भवतच नाही. मला माझा पुतण्या आणि फिर्यादी मयूर मोहीतेने सांगितलं तेव्हा या मुलीचं नाव समजलं. राष्ट्रवादी युवक काँग्रेसचा पदाधिकारी शैलेश मोहिते पाटील हा आमच्याच गावातला आहे. पण त्याचा आणि आमचा काहीच संबंध नाही." असंही ते म्हणाले.


शैलेश मोहिते पाटीलला आमदार व्हायचंय?


आमदार दिलीप मोहिते पाटील 2009 च्या विधानसभा निवडणुकीत आमदार झाले तर 2014च्या विधानसभेत पराभूत झाले होते. तेव्हा भावकीतल्या शैलेश मोहितेने दिलीप मोहितेंच्या प्रचाराची धुरा सांभाळली. पण दरम्यानच्या काळात दोघांमध्ये वितुष्ट निर्माण झाले. एकेकाळी दोघे मिळून विरोधकांवर डावपेच रंगवत असत, पण वाद विकोपाला गेला तेव्हापासून हे एकमेकांवर डावपेच खेळू लागले. राजकारण म्हटलं की ठरलेलं सुत्रच असतं. 2019च्या विधानसभेतही ते काहीवेळा पहायला मिळालं, मात्र दिलीप मोहिते पाटील पुन्हा आमदार झाले. हे शैलेशला पचनी पडलेलं नव्हतं. राष्ट्रवादी युवक काँग्रेसचा पदाधिकारी असलेल्या शैलेशने आता स्वतःच आमदार होण्यासाठी प्रयत्न सुरु केलेत. यासाठी चहुबाजूंनी फिल्डिंग लावायला शैलेशने सुरुवात केली आहे. अशातच हे हनी ट्रॅपचे प्रकरण समोर आलं. आमदार होण्याचं स्वप्न पूर्ण करण्यासाठीचा हा एक भाग आहे का? असा प्रश्न खेड-आळंदी मतदारसंघात चर्चिला जातोय.


महत्त्वाच्या इतर बातम्या :