सोलापूर : दशकभरापासून चर्चेत असलेल्या तुळजाभवानी मंदिरातल्या अलंकार गैरव्यवहार प्रकरणी पहिली अटक झाली आहे. तत्कालीन धार्मिक व्यवस्थापक दिलीप नाईकवाडी याला तुळजापूर पोलिसांनी अटक केली आहे. गुन्हा नोंद झाल्यापासून नाईकवाडी तब्बल 1 वर्ष फरार होता. काल त्याला तुळजापूर पोलिसांनी अटक केली. नाईकवाडी यांनी 35 तोळे सोनं, 71 किलो चांदी आणि 71 प्राचीन नाणी गायब केल्याप्रकरणी गेल्या वर्षी 13 सप्टेंबर 2020 रोजी गुन्हा नोंद होता. नाईकवाडी यांच्या 17 वर्षाच्या कालावधीत त्यांनी टप्या टप्यानं पुरातन नाणी गायब केली आहेत. त्यामुळे या काळात त्यांना कोण मदत केली? त्यांचे साथीदार आणि सूत्रधार कोण? ही नाणी सध्या कुठे आहेत, यासह अन्य बाबी तपासात समोर येणार आहे. एबीपी माझानं सातत्यानं अलंकार चोरी प्रकरण उघड करून त्याचा पाठपुरावा केला होता.


गतवर्षी महाराष्ट्राची कुलस्वामिनी आई तुळजाभवानी देवीच्या प्राचीन खजिन्यावर डल्ला मारणाऱ्या तत्कालीन धार्मिक व्यवस्थपकासह अन्य दोषी अधिकाऱ्यांवर तत्काळ गुन्हे दाखल करण्याचे आदेश देण्यात आले होते. दागिने गायब झाल्या प्रकरणी हा पहिलाच गुन्हा होता. तुळजाभवानी मंदिर संस्थांनचे अध्यक्ष तथा जिल्हाधिकारी कौस्तुभ दिवेगावकर यांनी हे आदेश दिले होते. त्यांच्याच काळात मंदिराची जागा आणि दागिने गायब करणार्या विरोधात कारवाई सुरुर झाल्यानं समाधान व्यक्त होत आहे. 


तुळजाभवानी मातेच्या खजिन्यातील 71 ऐतिहासिक आणि पुरातन नाण्यांसह मौल्यवान वस्तू गायब असल्याची तक्रार पुजारी मंडळाचे माजी अध्यक्ष किशोर कल्याणराव गंगणे यांनी त्याचे वकील शिरीष कुलकर्णी मार्फत तत्कालीन जिल्हाधिकारी दीपा मुधोळ मुंडे यांच्याकडे 9 मे 2019 रोजी केली होती, त्यांनतर तत्कालीन जिल्हाधिकारी दीपा मुंडे यांनी तत्काळ याचे गांभीर्य ओळखून चौकशी समिती नेमली होती. पुजारी मंडळांचे माजी अध्यक्ष किशोर गंगणे यांनी तक्रार दिली होती. एबीपी माझाशी बोलताना किशोर म्हणाले की, "पोलिसांत गुन्हे नोंद करण्यासाठी गेल्यावर्षी तुळजापूर तहसीलदार तथा मंदिर संस्थांनचे व्यवयस्थापकांना प्राधिकृत केले असून तत्कालीन धार्मिक सह व्यवस्थापक दिलीप देविदास नाईकवाडी यांच्यावर तुळजापूर पोलीस ठाण्यात गुन्हे नोंद करण्याचे लेखी आदेश दिले आहेत. देवीच्या खजिन्यातील तब्बल 71 प्राचीन नाण्यासह अनेक दागिने गायब आहेत. तुळजाभवानी देवीला अनेक राजे राजवाडे यांनी अर्पण केलेले बहुतांश मौल्यवान आणि प्राचीन दागिने तिजोरीतून गायब करून गैरव्यवहार केल्याचे अपर जिल्हाधिकारी यांच्या 3 सदस्यीय चौकशीत निष्पन्न झाले होते त्यांत नाईकवाडी यांच्यावर ठपका ठेवत सोने चांदीच्या दागिन्यात काळाबाजार झाल्याचे शिक्का मोर्तब केले होते. परंतु तिरही तो वर्षभर पोलिसांना कसा सापडला नाही? या मागे कोण मोठ्या व्यक्ती आहेत? याचा पोलिसांनी शोध घ्यावा."


तुळजाभवानी मातेला निझाम, औरंगजेब, पोर्तगीज यांच्यासह बिकानेर उदयपूर लखनो बडोदा आणि इंदोर या घराण्यांतील राजे महाराजे यांनी त्यांच्या चलनातील पुरातन नाणी देवीचारणी अर्पण केली होती. या नाण्याची नोंद तुळजाभवानी मंदिर संस्थांच्या रेकॉर्डमध्ये 11980 पर्यंत होती मात्र 2005 आणि 2018 मध्ये करण्यात आलेल्या पंचनाम्यात या पुरातन 71 नाण्यांसह प्राचीन सोन्या चांदीच्या वस्तू आणि मौल्यवान अलंकार दप्तरी नोंदीत नसल्याचे उघड झाले होते. गंगणे यांनी माहितीच्या अधिकारात तुळजाभवानी मंदिर संस्थांच्या साठा नोंद दप्तराची मागणी केली होती त्यात 71 पुरातन नाणी गायब झाल्याचे उघड झाले होते, अखेर या प्रकरणात फौजदारी कारवाई होत आहे. 


प्रशासकीय पत्रव्यवहार व लाल फितीच्या कारभारात अडकलेल्या या प्रकरणात नूतन जिल्हाधिकारी तथा मंदिर समिती अध्यक्ष कौस्तुभ दिवेगावकर यांनी लक्ष घालून गुन्हे नोंद करण्याचे आदेश दिले होते. उस्मानाबादचे पुर्वीचे जिल्हाधिकारी प्रविण गेडाम यांच्यानंतर पुन्हा एकदा जिल्हाधिकारी दिवेगावकर यांनी गैरव्यवहार प्रकरणी पुढाकार घेतला आहे


तुळजाभवानी देवीला अनेक राजे महाराजे यांनी सोने चांदी दागिन्यासह नाणी अर्पण केली होती त्याची नोंद मंदिर संस्थांच्या वहीत होती मात्र पदभार स्वीकारताना व देताना अनेक मौल्यवान वस्तू व दागिने गायब करून त्याचा काळाबाजार करण्यात आल्याचे चौकशी समितीत सिद्ध झाले आहे. देवीच्या खजिन्यातील शिवकालीन नाण्यासह इतर संस्थानची नाणी वस्तूवर डल्ला मारला असुन यात मंदिर संस्थांनचे काही अधिकारी घरचे भेदी निघाले आहेत.या घोटाळ्यातील गुन्ह्यात सहभागी अधिकारी यांची व्याप्ती वाढणार असल्याचे दिसते.


तुळजाभवानी देवीचे हे गायब केलेले प्राचीन दागिने आणि 71 नाणी कोणाला देण्यात आले हे तपासात स्पष्ट होणार आहे , यापूर्वी तुळजाभवानी देवीला अर्पण केलेल्या अनेक महागड्या वस्तू, साड्या, चांदीच्या मूर्ती या तत्कालीन मंत्री, राजकारणी आणि उच्च पदस्थ अधिकाऱ्यांना भेट देऊन त्याची मेहेरनजर मिळविण्याचे प्रकार घडले होते. त्यामुळे ही गायब करण्यामागे खरा सूत्रधार व लाभार्थी समोर येणे गरजेचे आहे.