कराड : किरीट सोमय्या यांना कोल्हापुरात जाण्यापासून पोलिसांनी रोखलं आहे. पोलिसांनी विनंती केल्यानंतर किरीट सोमय्या कराडमध्ये महालक्ष्मी एक्सप्रेसमधून उतरले आहेत. पोलिसांच्याच गाडीतून कराडमधील शासकीय विश्राम गृहात ते पोहोचले आहेत. अशातच कराडमधूनच किरीट सोमय्या पत्रकार परिषद घेणार असून आपली भूमिका ते स्पष्ट करणार आहेत. सकाळी साडेनऊ वाजता ही पत्रकार परिषद पार पडेल. या पत्रकार परिषदेनंतर ते कोणते महत्त्वाचे मुद्दे मांडणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.
भाजपचे माजी खासदार किरीट सोमय्या यांच्या कोल्हापूर दौऱ्याला कोल्हापूर जिल्ह्याधिकाऱ्यांना मज्जाव केला होता. तरिही ते कोल्हापूरला रवाना झाले. किरीट सोमय्या सीएसएमटी रेल्वे स्थानकावर दाखल झाले त्यावेळी मोठा पोलीस बंदोबस्त त्याठिकाणी होता. पोलिसांनी त्यांना अडवलं होतं. मात्र सोमय्यांनी पोलिसांना अडवू नका अशी विनंती केली आणि महालक्ष्मी एक्सप्रेसने किरीट सोमय्या कोल्हापूरला रवाना झाले होते. अखेर पोलिसांनी त्यांना कराड रेल्वे स्थानकात रोखलं. रात्रभर हायव्होलटेज ड्रामा पाहायला मिळाला.
कराडमध्ये पोलिसांनी अडवल्यानंतर किरीट सोमय्या म्हणाले...
किरीट सोमय्या म्हणाले की, "ठाकरे सरकार एवढं घाबरलंय मला की, आता मला कोल्हापूर जिल्ह्यात प्रवेशबंदी लावली आहे. माझं भांडण प्रशासन किंवा पोलिसांसोबत नाही. त्यांनी मला सांगितलं आहे की, कराड पोलीस स्टेशनला उतरावं. मी तशापद्धतीनं उतरणार आहे. मी कोल्हापुरात अंबाबाईचा आशीर्वाद घेण्यासाठी जाणार आहे. आज त्यांनी मला थांबवलं, मी दोन दिवसांनी पुन्हा येणार." पुढे बोलताना ते म्हणाले की, "मी घोटाळे समोर आणतोय, हसन मुश्रीफ यांचा पहिला घोटाळा, दुसरा घोटाळा, तिसरा घोटाळा त्यासाठी कोणत्याही गनिमी काव्यानं येण्याची काहीही गरज नाही."
किरीट सोमय्या यांना कोल्हापूर जिल्ह्यात येण्यासाठी मज्जाव
किरीट सोमय्या यांनी कोल्हापूर जिल्ह्यात येऊ नये यासाठी जिल्हा प्रशासनाने देखील आदेश दिले आहेत. जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी याबाबतचे आदेश काढले होते. सर्व पोलीस बंदोबस्त गणेश विसर्जनात व्यस्त राहणार असल्यानं दौऱ्यासाठी बंदोबस्त पुरवायला प्रशासनानं असमर्थता दर्शवली होती. राष्ट्रवादी काँग्रेसकडून होणारा विरोध पाहता दौरा रद्द करण्याची जिल्हाधिकाऱ्यांनी किरीट सोमय्या यांना विनंती होती.
सोमय्यांच्या कोल्हापूर दौऱ्यावरुन हायव्होल्टेज ड्रामा
दरम्यान, काल रात्रीपासून हा हायव्होल्टेज ड्रामा सुरु आहे. किरीट सोमय्या कोल्हापूरला जाणार असं दोन दिवसांपूर्वीच त्यांनी जाहीर केलं होतं. त्यानंतर कोल्हापूरच्या जिल्हाधिकाऱ्यांनी सोमय्यांना नोटीस पाठवली आणि त्यामध्ये नमूद केलं की, हसन मुश्रीफ आणि त्यांचे कार्यकर्ते इथं मोर्चा काढणार आहेत आणि राष्ट्रवादी या मोर्चाचं स्वागत करणार आहे. त्यामुळं या मोर्चाच्या पार्श्वभूमीवर आणि कोरोनाच्या प्रादुर्भावामुळं किरीट सोमय्या यांनी कोल्हापूरचा दौरा टाळावा, अशा पद्धतीचा मजकूर होता. तसेच यामध्ये कोल्हापूर जिल्ह्यात येऊ नये, कोल्हापूर जिल्हा बंदी असा उल्लेख केला होता. याच पार्श्वभूमीवर मुंबई पोलिसांनी काल दुपारपासूनच किरीट सोमय्यांच्या घराबाहेर मोठा बंदोबस्त तैनात केला. तसेच त्यांना ताब्यात घेण्याचाही प्रयत्न केला. विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकरांपासून इतर भाजप नेते तिथं दाखल झाले आणि त्या सर्वांनी किरीट सोमय्या यांना मुंबईतून बाहेर जाण्यापासून कोणीच रोखू शकत नाही, अशी भूमिका घेतली होती. त्यानंतर किरीट सोमय्याही आक्रमक झाले होते.