Coronavirus | देवस्थानांनाही कोरोनाचा धसका; अनेक मंदिरं दर्शनासाठी बंद, वणी गडावरचा चैत्रोत्सवही रद्द

कोरोना व्हायरसचा धोका लक्षात घेत सप्तश्रृंग गडावरील चैत्र पौर्णिमेचा उत्सव रद्द करण्यात आला आहे. तर मुंबईतील सिद्धिविनायक, पंढरपूरमधील विठ्ठल मंदिर, पालीतील बल्लाळेश्वर मंदिर बंद ठेवण्यात येणार आहे.

Continues below advertisement

मुंबई : कोरोना व्हायरसचा धसका राज्यातील देवस्थानांनीही घेतला आहे. पुढील आदेश मिळेपर्यंत तुळजाभवानी देवीचं दर्शन पूर्णपणे बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. नाशिकच्या वणी गडावरचा चैत्रोत्सवही रद्द करण्यात आला आहे तर पंढरपूरच्या विठ्ठल मंदिरातील अन्नछत्रही बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. अष्टविनायक क्षेत्र असलेले पाली येथील बल्लाळेश्वर मंदिरही 31 मार्चपर्यंत बंद करण्याचे आदेश प्रशासनाने दिले आहे. मुंबईतील सिद्धिविनायक मंदिरही पुढील काही दिवस बंद राहणार आहे. मात्र सिद्धिविनायक मंदिर न्यासाकडून देण्यात येणारं वैद्यकीय मदत केंद्र सुरु राहणार आहे.

Continues below advertisement

सप्तश्रृंग गडावरील चैत्र पौर्णिमेचा उत्सव रद्द

उत्तर महाराष्ट्रातील भाविकांचे श्रद्धास्थान आणि साडेतीन शक्तीपीठांपैकी एक असलेल्या वणीच्या सप्तश्रृंगी गडावरील यंदाचा चैत्र पौर्णिमेचा उत्सव रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. महाराष्ट्रात कोरोनाच्या परिस्थितीमुळे अनेक ठिकाणच्या मोठ्या यात्रा, उत्सव खबरदारीचा उपाय म्हणून रद्द करण्यात आल्या आहेत. चैत्र पोर्णिमेची यात्रा ही खान्देशवासियांसाठी खूपच महत्वाची असते. त्यामुळे कसमा पट्ट्यासह खान्देशमधील भाविक तळपत्या उन्हात देवीच्या दर्शनाला पायी जात असतात. केवळ खान्देशच नाही, तर गुजरातमधील भाविक या काळात गडावर येत असल्याने मोठी गर्दी होते. मात्र कोरानेच प्रदुर्भाव लक्षात घेता आज गडावर देवी ट्रस्ट, ग्रामपंचायत,प्रशासन यांच्यात बैठक घेण्यात आली. या बैठकीत यंदा देवीचा चैत्रोत्सव साजरा न करण्याचा मोठा निर्णय घेण्यात आला.

तुळजाभवानी मंदिर दर्शनासाठी बंद

कोरोनाच्या प्रतिबंधासाठी राज्य सरकारने विविध पावलं उचलली आहेत. महाराष्ट्राची कुलस्वामिनी तुळजाभवानी मंदिरातील दर्शन 31 मार्चपर्यंत बंद राहणार आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मंदिर प्रशासनाने हा निर्णय घेतला आहे. या काळात मंदिरातले सगळे विधी बंद असणार आहेत. गर्दी करु नका असे आदेश देवूनही भाविकांनी गर्दी केल्याने मंदिर प्रशासनाने हा निर्णय घेतला आहे.

विठ्ठल रुक्मिणी मंदिरातील अन्नछत्र बंद

गर्दी टाळण्यासाठी विठुरायाचे अन्नछत्र बंद करण्याचा निर्णय मंदिर प्रशासनाने घेतला आहे. त्याऐवजी भाविकांना फूड पॅकेट दिली जाणार आहेत. विठ्ठल मंदिराच्या अन्नछत्रात रोज दीड ते दोन हजार पंगतीने भाविक भोजनास बसत असतात. अशावेळी कोरोनाचा धोका वाढत असल्याने मंदिर प्रशासनाने हा मोठा निर्णय घेतला आहे. कोरोनाच्या दहशतीमुळे विठ्ठल मंदिर मोकळे पडले आहे. दर्शन रांग मोकळी पडल्याने आज भाविक थेट पाच मिनिटात देवाच्या पायापाशी पोहचत आहेत.

पालीतील बल्लाळेश्वर मंदिर 31 मार्चपर्यंत बंद

रायगड जिल्हा प्रशासनाने अष्टविनायक क्षेत्र असलेले पाली येथील बल्लाळेश्वर मंदिर 31 मार्चपर्यंत बंद करण्याचे आदेश दिले आहेत. त्यामुळे रविवारी रात्री 8.30 वाजता बल्लाळेश्वर मंदिर भाविकांसाठी बंद करण्यात आलं आहे. पहिल्यांदाच इतक्या कालावधीपर्यंत मंदिर बंद राहणार आहे. राज्यात साथरोग प्रतिबंधात्मक कायदा लागू झाला आहे. त्यानुसार रायगड जिल्हाधिकाऱ्यांनी बल्लाळेश्वर मंदिरासह महड वरदविनायक मंदिर भाविकांना प्रवेशासाठी बंद केलं आहे.

संबंधित बातम्या
Continues below advertisement
Sponsored Links by Taboola