मुंबई : आगामी निवडणुकांसाठी शिवसेना उद्धव ठाकरे पक्षासोबत युती करण्यासाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनादेखील सकारात्मक असल्याची सूत्रांची माहिती आहे. या आधी उद्धव ठाकरे आणि त्यानंतर आदित्य ठाकरे यांनी मनसेसोबत युतीसाठी आपण तयार असल्याचे संकेत दिले होते. पण जुना अनुभव लक्षात घेता मनसे हळू हळू आणि सावधतेने पाऊल टाकण्याच्या भूमिकेत असल्याची माहिती आहे.
या आधी 2019 निवडणुकीवेळी मनसेकडून शिवसेनेसोबत युतीसाठी प्रयत्न करण्यात आले होते. मात्र तेव्हा उद्धव ठाकरेंकडून कोणताही प्रतिसाद मिळाला नाही. हाच कटू अनुभव लक्षात घेऊन, मनसेकडून कोणतीही घाई न करण्याची भूमिका घेतल्याची माहिती आहे.
नुकतेच आदित्य ठाकरे यांनी महाराष्ट्र हितासाठी कोणत्याही पक्षासोबत युती करण्याची तयारी बोलून दाखवली होती. त्यांना राज ठाकरे यांच्या सोबत युती करणार का? हा प्रश्न विचारण्यात आला होता. त्यावर त्यांनी युतीसाठी तयार असल्याचे संकेत दिले होते. त्यानंतर आता मनसेकडून देखील सकारात्मक प्रतिसाद असल्याची सूत्रांची माहिती आहे.
Uddhav Thackeray Alliance Proposal To MNS : आदित्य ठाकरेंकडून सूचक वक्तव्य
राज ठाकरेंनी उद्धव ठाकरेंसोबत एकत्र येण्याबाबत सूचक वक्तव्य केलं आणि मनसे-सेना युतीची चर्चा सुरू झाली. यात उद्धव ठाकरेदेखील मागे हटले नाहीत. त्यांनीही लगेच युतीच्या चर्चेला प्रतिसाद दिला. मात्र युतीबाबतचं गुऱ्हाळ फक्त माध्यमांमध्येच सुरू असून, प्रत्यक्षात काहीच घडत नसल्याचं चित्र होतं.
अशातच मंगळवारी बोलताना आदित्य ठाकरेंनी राज ठाकरेंचं थेट नाव घेणं टाळलं असलं तरी एका प्रश्नाला उत्तर देताना मनसेला सोबत येण्याची साद घातली. महाराष्ट्राच्या हितासाठी कोणत्याही पक्षाबरोबर एकत्र येण्यास तयार असल्याचं आदित्य ठाकरेंनी स्पष्टपणे सांगितले.
Shiv Sena MNS Alliance : ठाकरेंचे नेते युतीसाठी अनुकूल
आदित्य ठाकरेंसोबतच संजय राऊत, अनिल परब, सुनील प्रभू, अंबादास दानवेंनीही वारंवार युतीसाठीची अनुकुलता दर्शवल्याचं दिसून आलं आहे. मात्र मनसेच्या दुसऱ्या फळीतील नेत्यांनी युतीचा अद्याप प्रस्ताव आला नसल्याचं वारंवार स्पष्ट केलं आहे. मनसे नेते युतीबाबत फारसे अनुकुल दिसत नसल्याचं चित्र आहे. तर इकडे ठाकरेंच्या शिवसेनेच्या नेत्यांपाठोपाठ आता खुद्द पुतण्यानं दिलेली साद आणि युतीच्या तयारीला काका राज ठाकरे प्रतिसाद देणार का हे पहाणं महत्त्वाचं ठरणार आहे.
युतीचा प्रस्ताव माध्यमातून येत नसतो
ठाकरेंच्या प्रस्तावावर बोलताना मनसे नेते यशवंत किल्लेदार म्हणाले की, "आम्हाला हे सगळं माध्यमातून कळत आहे. युतीचा कोणताही प्रस्ताव आला नाही. प्रस्ताव आला तर राज ठाकरे भूमिका घेतील. माध्यमातून प्रस्ताव येत नसतात. याआधी आमचे हात पोळलेले आहेत. त्यामुळे हात पोळल्यानंतर ताक सुद्धा फुंकून प्या असे म्हणतात. त्यातला हा भाग आहे म्हणून सावध भूमिका घेतोय."