Tuljapur News : तुळजाभवानी मंदिर (Tulja Bhavani Temple) संस्थानच्या नावे बोगस वेबसाईट काढून भाविकांची हजारोंची फसवणूक करण्यात येत असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. www.tuljabhavani.in या संकेतस्थळावरुन मंदिरातील वेगवेगळ्या विधींसाठी ऑनलाईन रक्कम मागितली, मागील 2 वर्ष शासकीय पूजा सोडून सर्व अभिषेक विधी बंद आहेत. तरीही या संकेतस्थळावर हे सगळे विधी उपलब्ध आहेत, असं दाखवून अनेक भाविकांना गंडा घालण्यात आला आहे. फसवणूकीच्या तक्रारीनंतर उस्मानाबाद जिल्हाधिकाऱ्यांनी चौकशीचे आदेश दिले आहेत. 


तुळजाभवानी मंदिर संस्थानच्या नावे बोगस वेबसाईट काढून भाविकांची फसवणूक केल्याच्या तक्रारीवरून चौकशी करण्याचे आदेश उस्मानाबादच्या जिल्हाधिकाऱ्यांनी दिले आहेत. वेबसाइट्सवर मंदिरातील विधींसाठी रक्कम ऑनलाईन मागितली जाते. मागील 2 वर्ष शासकीय पूजा सोडून सर्व अभिषेक विधी बंद आहेत. 


एका वेबसाईटवर नवरात्र सप्तशती पठण यासाठी शुल्क आकारण्यात आले आहेत. जिल्हाधिकाऱ्यांकडे दाखल झालेल्या तक्रारीत अज्ञात लोकांनी https://www.tuljabhavani.in/ ही वेबसाइट सुरु करून भाविकांची लूट केली आहे, अशी तक्रार आहे.  या वेबसाइटवर पूजा, प्रसाद सेवा ही कॅटेगिरी दिली आहे. त्यावर क्लिक केलं की, अभिषेक, अलंकार महापूजा, खण - नारळ ओटी पूजा, जागरण गोंधळ, अन्नदान अशा पूजा येतात. त्यानंतर 'पे फॉर प्रसाद' सेवा म्हणून पर्याय येतो, त्यावर क्लिक केलं की, फोन नंबर मागितला जातो आणि नंतर फॉर्म भरून पैसे वसूल केले जातात. वेबसाइट्सवर मंदिरातील विधींसाठी रक्कम ऑनलाईन मागितली जाते. मागील 2 वर्ष शासकीय पूजा सोडून सर्व अभिषेक विधी बंद असूनही ही शल्क आकारणी करण्यात येत होती, ही विशेष बाब आहे. 


दरम्यान, घटस्थापनेच्या मुहूर्तावर कोरोना प्रादुर्भावामुळं बंद असलेली राज्यभरातील धार्मिक स्थळं भाविकांसाठी पुन्हा खुली करण्यात आली आहेत. मात्र, कोणत्याही धार्मिक स्थळी जाताना भाविकांना कोरोनाचे नियम पाळणं बंधनकारक असल्याचे निर्देश प्रशासनाच्या वतीनं देण्यात आले आहेत. 


महत्त्वाच्या इतर बातम्या :