नाशिक : लडाखची सीमा पार करून चीनचे सैन्य भारतात आले, काश्मीरमध्ये शीख हत्याकांड झाले आणि आपल्याकडे लसीचे उत्सव साजरा केले जातात अशी टीका शिवसेना खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी भाजपवर केली आहे. 100 कोटी लसीकरणाचा आकडा खोटा असून फक्त 23 कोटी लस दिल्या गेल्या आहेत, आपण ही गोष्ट पुराव्याने सिद्ध करु. देशातील वाढती महागाई, पेट्रोल डिझेलच्या वाढत्या किमतीवर कोणी बोलत नाही असंही ते म्हणाले. आपल्या नाशिक दौऱ्यावेळी खासदार संजय राऊत यांनी ही टीका केली आहे. 


खासदार संजय राऊत म्हणाले की, "राज्यातील भाजपचे सरकार घालवले आता दिल्लीला कूच करायची. देशात महाविकास आघाडी म्हणून नाही तर शिवसेना म्हणून जाणार. हर्षवर्धन पाटील जे बोलले, ते नशेत नसावे, त्यांना गांजा मिळाला नसावा. ते म्हणतात त्यांना शांत झोप लागते. चंद्रकांत पाटील, फडणवीस, अमित शहा यांची झोप उडाली आहे. यांना सरकारमधून बाजूला काढल्यानंतर आम्हाला शांत झोप लागते."


खासदार संजय राऊत पुढे म्हणाले की, "नाशिक हा शिवसेनेचा बालेकिल्ला होता, आजही आहे. येत्या निवडणुकीत मनपाची सत्ता आणू, पण विधानसभेवर लक्ष घालावं लागेल. विधानसभेत शिवसेनेचा आकडा 100 वर पाहिजे. नशिकमध्ये सेनेचा आमदार नाही ही खंत वाटली पाहिजे. उद्धव ठाकरे यांच्याकडे देशाचे सूत्र द्यायचे असेल तर पक्षाचे आमदार, खासदार वाढले पाहिजे. दादर नगर हवेलीतून आपण निवडणूक लढत आहोत, तिथल्या खासदारांनी मुंबईत येऊन आत्महत्या केली, तिथे आपला उमेदवार निवडून येणार. यापुढे गुजरात आणि इतर राज्यात निवडणूक लढविणार."


मुंबई-ठाण्याच्या पुढे शिवसेना जाणार नाही असे बोलत असताना आपण दिल्लीत धडक मारली असं सांगत संजय राऊत म्हणाले की, "आज सेनेचे 22 खासदार आहेत. देशाचे नेतृत्व करणारा नेता म्हणून उद्धव ठाकरे यांच्याकडे बघितले जाते. ममता बॅनर्जी यांचा पराभव करण्यासाठी मोदींनी 22 अमित शहा यांनी 40 सभा घेतल्या, दंगली घडविल्या, पैशाचा पाऊस पाडला, पण जनतेने ममता बॅनर्जी याना जिंकून दिले. महाराष्ट्राने बंगालचा धडा घेतला पाहिजे. महाराष्ट्र स्वाभिमानी जनतेचं राज्य आहे."


कोणाचे सरकार येणार कोणाला माहीत नव्हते. भाजपने दिलेला शब्द फिरवला आणि लढाईला सुरवात झाली. भाजपने बाळासाहेब ठाकरे यांच्या खोलीत शब्द दिला होता. तो फिरवला, फसवणूक केली म्हणून आम्ही खोटेपणाच्या विरोधात लढलो असं संजय राऊत म्हणाले. 


संजय राऊत म्हणाले की, "रामायण-महाभारत कशामुळे झाले? खोटेपणामुळे झाले. रोज आमच्यावर हल्ले होत आहेत, जणू रोज भ्रष्टाचारचे पीक येतं की काय? महाराष्ट्राची बदनामी थांबवूया. याच नाशिकच्या भुमीतून सावरकर आलेत. त्या सावरकरांची बदनामी करण्याचे काम भाजपने सुरू केलं आहे. सावरकर यांनी माफी मागितली हे भाजपने सुरू केले आहे. आम्ही कोणत्याही आघाडीत असो हिंदुत्व सोडणार नाही. शिवसेनेचे काम करणे ही एक नशा आहे. माझ्यासारखे लाखो शिवसैनिक काम करतात म्हणून शिवसेना  आज आहे."


महत्वाच्या बातम्या :