Temple Dress Code : महाराष्ट्राची कुलस्वामिनी आई तुळजाभवानी (Tulajabhavani)मातेच्या मंदिरात दर्शनासाठी गाभाऱ्यात जाण्यासाठी ड्रेस कोड (Dress Code) लागू करण्यात आला. या निर्णयाचं काही भाविकांनी समर्थन केलं असलं बऱ्याच भाविकांनी नाराजी, रोष देखील व्यक्त केला. तुळजाभवानी मंदिराच्या या निर्णयानंतर महाराष्ट्रातील अनेक मंदिरात ड्रेस कोड लागू करण्यात आला. परंतु यानंतर तुळजाभवानी मंदिर संस्थाननेच ड्रेस कोडच्या निर्णयावरुन यू टर्न घेतला. कपड्यांवरुन भाविकांना कोणतेच निर्बंध घातले नसल्याचं सांगण्यात आलं. एकीकडे ज्या मंदिराकडून ड्रेस कोड लागू करण्यात त्याने निर्णय मागे घेतला, परंतु इतर मंदिरांनी मात्र हा ड्रेस कोडचा निर्णय कायम ठेवला आहे.


भाविकांना कोणतेही निर्बंध नाहीत, ड्रेसकोडच्या निर्णयावरुन तुळजाभवानी मंदिराचा यू टर्न


तुळजाभवानी मातेच्या मंदिरात दर्शनासाठी गाभाऱ्यात जाण्यासाठी लागू करण्यात आलेल्या ड्रेसकोडचा निर्णय 18 मे रोजी मागे घेण्यात आला. तुळजाभवानी मंदिरामध्ये प्रवेशासाठी मंदिर संस्थांच्या वतीने एक नियमावली जारी करण्यात आली होती. त्यावरुन मोठा गदारोळ झाला होता. त्यानंतर तुळजाभवानी मंदिरामध्ये पूजेसाठी अथवा दर्शनासाठी आलेल्या कोणत्याही भाविकांना कोणतेही निर्बंध घालण्यात आले नसल्याचे स्पष्टीकरण तहसीलदार सौदागर तांदळे यांनी दिले आहे. 


जाणून घेऊया कोणत्या मंदिरांमध्ये ड्रेस कोड कायम?   


पुण्यातील 'या' मंदिरात तोकड्या कपड्यांना बंदी


पुणे शहराच्या उपनगरातील वाघोली  येथील वाघेश्वर मंदिराच्या गाभाऱ्यात दर्शनासाठी जाताना शॉर्ट कपड्यांवर बंदी घालण्यात आली आहे. महिलांना वन पीस, शॉर्ट स्कर्ट, शॉर्ट पॅन्ट घालून मंदिरात प्रवेश दिला जाणार नाही. वाघेश्वर मंदिर हे पुरातन मंदिर आहे. येथे दर्शनासाठी भाविकांची गर्दी असते. मात्र शॉर्ट कपडे परिधान करुन दर्शनासाठी येणाऱ्यांची संख्या वाढत आहे. यामुळे पावित्र्य भंग पावत आहे. अन्य भविकांचीही तशी ट्रस्टकडे तक्रार आहे. मंदिराचे पावित्र्य राखले जावे, यासाठी वाघोली विकास प्रतिष्ठानचे अध्यक्ष सातव आणि उपाध्यक्ष दाभाडे यांनी हा निर्णय घेतला आहे, सूचना देणारे फलक मंदिरात लावण्यात आले आहेत. पुरुषांना देखील शॉर्ट पॅन्ट घालून मंदिरात प्रवेश दिला जाणार नाही. या निर्णयाचे स्वागत वाघोलीतील नागरिकांनी आणि भाविकांनी केले.


नागपूरच्या चार मंदिरांमध्ये ड्रेस कोड लागू


महाराष्ट्र मंदिर महासंघाच्या वतीने नागपुरातील चार मंदिरात वस्त्र संहिता लागू करण्यात आली आहे. मंदिरातील पावित्र्य जपण्यासाठी हा ड्रेस कोड लागू केल्याचं महासंघाच्या वतीने जाहीर करण्यात आलं. राज्यातील सर्व शासकीय कार्यालयात ड्रेस कोड लागू आहे, देशातील अनेक मंदिरे, गुरुद्वारा, चर्च, मशिदी आणि इतर प्रार्थनास्थळी ड्रेस कोड लागू आहे, त्याच धर्तीवर राज्यातील मंदिरांमध्ये ड्रेस कोड लागू करत असल्याचं महासंघाचे समन्वयक सुनील घनवट यांनी सांगितलं. महाराष्ट्रातील 300 हून अधिक मंदिरात ड्रेस कोड लागू केला जाणार आहे. तोकडे कपडे घालून मंदिरात आल्यास त्यांना ओढणी, पंचा दिला जाईल, त्यानंतर त्यांना प्रवेश दिला जाईल. यासंदर्भात प्रचार प्रसारही केला जाणार असल्याचं महासंघाच्या वतीने सांगण्यात आलं. काही पुरोगामी लोक किंवा आधुनिक समजणारे लोक विरोध करतील, मात्र इतर धर्मातील लोकांना विरोध केला जात नाही, मग मंदिरातच का असा सवाल उपस्थित करत मंदिराचे पवित्र कायम राहावं हा यामागचा उद्देश असल्याचं घनवट यांनी स्पष्ट केलं.


जळगावातील मंगळग्रह मंदिरातही ड्रेसकोड


अंग प्रदर्शक कपडे, उत्तेजक, असभ्य आणि अशोभनीय वस्त्रधारी, तोकडे कपडे घालणाऱ्यांना मंदिरात प्रवेश दिला जाणार नाही अशाप्रकारचे फलक जळगाव जिल्ह्यातील अमळनेर इथल्या मंगळग्रह मंदिर परिसरात असा फलक लावण्यात आला आहे. तोकडे पकडे घालून अंगप्रदर्शन करणं आणि मंदिरात येणं, हे भारतीय संस्कृतीला शोभून दिसणार नाही. त्यामुळे हा फलक योग्य असल्याचं सांगत मंदिर संस्थानच्या फलक लावण्याच्या निर्णयाचे समर्थन याठिकाणी महिलांनी केलं आहे.


सप्तशृंगगडावर भाविकांसाठी ड्रेस कोड?


नाशिकच्या सप्तशृंग गडावरील आदिमायेच्या मंदिरातही पावित्र्यता जपण्यासाठी भाविकांना ड्रेस कोड लागू व्हावा, त्यासाठी विश्वस्त मंडळातील काही सदस्यांसह सप्तशृंगगड ग्रामपंचायत व ग्रामस्थ व भाविक सकारात्मक असून, लवकरच निर्णय घेण्याचे सूतोवाच सप्तशृंगगडचे सरपंच रमेश पवार, विश्वस्त ॲड.ललीत निकम व ग्रामस्थांनी केले आहे. पर्यटनस्थळांबरोबरच धार्मिक स्थळांना भेट देण्यासाठी आलेले काही भाविक येताना तोकडे कपडे घालून येतात. त्यामुळे अशा भक्तांना आळा घालण्यासाठी सप्तशृंगगडावर भाविकांना ड्रेस कोड लागू करण्याबाबत सप्तशृंग निवासिनी देवी ट्रस्टचे विश्वस्त, ग्रामपंचायत पदाधिकारी व ग्रामस्थ भाविक सकारात्मक व विचाराधीन असून लवकरच त्यावर निर्णय होईल असे सूतोवाच विश्वस्तांनी व्यक्त केले आहे.