Tulja Bhavani Temple : कुलस्वामिनी तुळजाभवानी (Tulja bhavani Temple) मातेच्या दागिन्यांवर (Ornaments) डल्ला कुणी मारला असा प्रश्न आता उपस्थि झाला आहे. तुळजाभवानी मातेचे 8 ते 10 मौल्यवान अलंकार गायब झाले असल्याचे उघड झालं आहे. एका अहवालानुसार, तुळजाभवानीला आतापर्यंत अर्पण करण्यात आलेल्या शिवकालीन दागिन्यांची आणि इतर सर्व मौल्यवान वस्तूंची मोजदाद करण्यासाठी एका समितीची स्थापना करण्यात आली होती. या समितीने मंगळवारी आपला अहवाल सादर केला आणि याच अहवालात देवीचे अनेक मौल्यवान दागिने गायब असल्याचं उघड झालं आहे. 


कुलस्वामिनी तुळजाभवानीच्या दागिन्यांवर डल्ला?


तुळजाभवानी देवीच्या अलंकारांची मोजणी करण्यासाठी जुन्या याद्यांचे संदर्भ घेतले गेले.. 1963, 1999 आणि 2010 साली देवीला अर्पण झालेल्या दागिन्यांच्या याद्या बनवण्यात आल्या होत्या. त्याच याद्यांनुसार दागिने आहेत की, नाहीत याची इन कॅमेरा तपासणी केली गेली. त्यानंतर या अहवालात जे काही समोर आलं त्यानं सगळ्यांनाच धक्का बसला. 


तुळजाभवानी मातेचे 8 ते 10 अलंकार गायब


देवीच्या नित्योपतारातल्या सात डब्यांपैकी दुसऱ्या क्रमांकाच्या डब्यातले 8 ते 10 अलंकार गायब आहेत. यात देवीच्या खडावा, माणिक, मोती, पाचू यांचा समावेश आहे. हे दागिने नेमके कधी गायब झाले, याचा अंदाजही नोंदीवरून बांधता येत नाही. 1963 साली नोंदवलेल्या कांही शिवकालीन अलंकाराच्या नोंदी नव्या नोंदीत आढळल्याच नाहीत. काही पुरातन दागिने काढून त्याठिकाणी नवे दागिने ठेवल्याचाही पंच कमिटीला संशय आहे. 


तुळजाभवानी मातेचे दागिने कुणी चोरले?


देवीच्या दागिन्यांबाबतचा अहवाल जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आला आहे. मात्र दागिने गायब होण्याला महसूल विभाग जबाबदार असल्याचा आरोपही केला जात आहे. तुळजाभवानी मातेची आभुषणं हे फक्त दागिने नाहीत, ती तमाम महाराष्ट्राची भक्ती आहे आणि देवीचे शिवकालीन दागिने हा अध्यात्मिकच नाही. तर, ऐतिहासिक आणि सांस्कृतिक ठेवाही आहे. मुघल, इंग्रज अशा सगळ्या परकीय शासकांच्या हातून हा ठेवा जर आपल्यापर्यंत सुरक्षित पोहोचला. तर, त्याचं जतन करणं हे सरकारचं कर्तव्य होतं, जबाबदारी होती. 


मंदिर प्रशासन आणि महसुल यंत्रणा यात सपशेल अपयशी ठरलं आहे, हे तर या अहवालाने उघडंच झालं आहे. आता हे दागिने कुठे गायब झाले आणि कोणी गायब केले, हे शोधणं तरी प्रशासनाला शक्य होईल का? हे पाहावं लागणार आहे.


संबंधित इतर बातम्या :


Tuljapur: आई तुळजाभवानीच्या अभिषेकासाठी आता 50 रुपयांऐवजी 500 रुपये शुल्क, तुळजाभवानी मंदिर समितीचा निर्णय